मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, आदिवासींचं जीवन, निसर्ग अशा प्रचंड आवाक्याच्या विषयांना सहजपणे पेलणार्या दुर्गाबाई भागवत पाकनिपुणही होत्या. खाद्यसंस्कृतीचा त्यांचा जबरदस्त अभ्यास होता. याविषयी त्यांनी वेळोवेळी सुरेख लेखनही केलं. या लेखनात त्यांची संशोधकाची वृत्ती ठिकठिकाणी डोकावताना दिसते. ’खमंग’ हे त्यांच पुस्तक प्रसिद्धच आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं - ’स्वयंपाकाची आवड मला लहानपणापासूनच होती. माझी आई, आजी, चुलती यांच्याकडून मी स्वयंपाक शिकले. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मला स्वयंपाक करायला जास्त आवडतो. खरं म्हणजे मी चुकून लेखिका झाले; खरं तर स्वयंपाकीणच व्हायची.’ ’माहेर’च्या १९८५ सालच्या अन्नपूर्णा विशेषांकात दुर्गाबाईंनी पाकक्लेवर एक रसाळ लेख लिहिला होता. तोच इथे पुनर्मुद्रित केला आहे.
मला संपादकांनी पाककृतींबद्दल खुसखुशीत, हलकेफुलके लिहायला सांगितले आहे. हलकेफुलके म्हणजे दुसर्याला तोंडे चमत्कारिक करून नकली हसविण्याची कलाच वाटते मला. ती अवगत असणार्यांशी माझे कुठल्याही तर्हेने भांडण नाही, पण मला वाटते की माझ्या तर्हेने मी सहजशैलीत वाचनीय होईलसे लिहिलेले बरे.
स्वैपाक ही पोटपूजा आहेच, पण ती अन्नपूर्णेची आदिकलाही आहे. मन, काळीज नि पोट सुखवणारी, डोळ्यांना आनंद देणारी, रसांची ती धात्री आहे. गंधांची ती उधळण करते. नाना रुपड्यांना आपल्या छंदावर नाचायला लावते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत तिला रसवंती म्हणतात. रसवंतीचे ’रसोई’ हे एक रूप. जणू आपल्या आपणच निसर्गघटनेप्रमाणे शिजून तयार होणारा विधी म्हणून याला स्वयंपाक म्हणतात. सैपाक हे त्याचे घरगुती नाव. अन्नपूर्णेचे हे शास्त्र आहे, तिची ही सहजसाध्य कला आहे. तिच्या कष्टांची सुंदर परिणती आहे. खाणार्यांची तुष्टी नि पुष्टी हे या पाककलेचे एकमेव ध्येय आहे.
मी देवदेव करणारी नसले तरी अन्नपूर्णेची भक्त आहे. उत्तम पाककृती करणार्या अन्नपूर्णेच्या भक्तिणींना मी मनोभावाने मानते. या भक्तिणी मात्र फुटक्या शेगडीवर रस्त्याच्या कडेला बसून सुंदर भाकर्या हातावर करताना दिसतात. मोठमोठ्या समारंभांसाठी मांडे करताना दिसतात. पाच-पाच फूट लांब शेवयांची सुते वळताना दिसतात. तर्हेतर्हेची पक्वान्ने करताना दिसतात. सांडगे-पापड तन्मय होऊन करताना दिसतात. त्यांची तन्मयता, कार्यकुशलता मला मोहित करते. एकदा एका महारी कथेत स्वैपाक करणार्या स्त्रीचे वर्णन केलेले ऐकले. ’लव्यासारखी लवली, भोव्यासारखी भोवली’. अशा या लवलव करणार्या रांधपिणीने ’एकेका भाजीला सात-सात फोडण्या घातल्या’. दोनतीन फोडण्यांपर्यंतच्या कृती मला माहीत आहेत, पण सात-सात फोडण्या या कथेतच ऐकल्या. पण त्या फोडण्या कसकसल्या होत्या, ते गूढ राहिल्याने मला अजून फोडण्यांच्या कलेचा उलगडा झाला नाही.
माझी एक चुलती होती. तिला आम्ही ’बी’ म्हणत असू. तिचा स्वैपाक अप्रतिम व्हायचा. (ती गेल्यावर आमचे जेवण तुटले.) मी तिला विचारले, "बी, तुझा स्वैपाक इतका छान कसा होतो गं? तू काय घालतेस? ’बी’ने उत्तर दिले, "काही नाही गं, थोडासा जीव घालते." तेव्हा स्वैपाकाचा प्राण किंवा खुबी म्हणजे जीव घालणे आहे, हेच खरे. एकेकीचा हात म्हणतात ते यालाच. करणारणीची करणी नि खाणार्यांची तृप्ती करणारी पाककृती कलेचे रूप घेते. ती नसल्यास स्वैपाक म्हणजे पचकाच होतो.
आपल्या देशाच्या प्राचीन परंपरेप्रमाणे उत्तम रांधपी व रांधपिणी चार. नलराजा, भीमसेन, पार्वती आणि सीता. म्हणजे पाककलेत पुरुषांनीही आपला वाटा चोख उचलला आहे बरे! स्त्रीमुक्तीवाल्यांनी याचा जरूर विचार करावा. नलराजाच्या नावावर ’नल पाक-रहस्य’ नावाचे संस्कृत पुस्तक आहे. हे उघड मध्ययुगीन असले तरी ते पाकशास्त्रावरचे पहिले पुस्तक असून सामिष व निरामिष अशा दोन्ही कृती त्यात आहेत.
जातवारीने पाहिले तर ही चारी माणसे ब्राह्मणेतर म्हणजे क्षत्रिय वर्गातली आहेत. यांत सर्वांत लोकप्रिय पार्वती आहे. बंगालमधल्या कुमारिका व्रत करताना ’उमार मत रांधुनी हब’ (मी उमेसारखी रांधपीण व्हावं) अशी कामना करते. पण सर्वांत हुशार द्रौपदी. श्रीकृष्णाच्या मार्फत तिने सूर्याकडून थाळी मिळवली. थाळीच्या गुणामुळे तिचा स्थालीपाकही नावाजला गेला. काही न करता सारे केल्याचे श्रेय तिला मिळाले. भीम मात्र बिचारा जाईल तिथे आचारी म्हणून राबराब राबला नि खादाड म्हणून ख्याती पावला.
तेव्हा रांधण्याचा गुण स्वत:ची जीभ नि पोट यांच्यावर नियंत्रण ठेवल्यासच लोकांना मान्य होतो, असे दिसते. पण यातही एक गोम आहे. ज्याची जीभ चोखंदळ असते, ज्याला चांगलेचुंगले खायला आवडते, त्याचाच स्वैपाक रुचकर होऊन मान्यता पावतो. व्यवहारात याचा पडताळा येतोच. तेव्हा खाण्याचा आणि खाऊ घालण्याचाही गुण अंगी असला तरच जीवनाला लज्जत येते. सामाजिक बांधिलकीला याची गरज नाही, असे कोण म्हणेल?
1 comments:
रुचकर,खुसखुशीत, चविष्ट लेख आहे. खूपच छान!
Post a Comment