’मेनका’चा पर्यटन विशेषांक

on Friday, 1 July 2011

गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या रूढ संकल्पना बदलल्या. लोकांच्या हाती पैसा आला. इंटरनेटमुळं चुटकीसरशी माहिती उपलब्ध झाली, आणि मराठी माणसानं पर्यटनाचा गांभीर्यानं विचार करायला सुरुवात केली. दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आठदहा दिवस सिमला, कुलू, मनाली, किंवा दक्षिण भारत ’उरकायचा’ असा प्रघात मोडून नवनवीन पर्यटनस्थळं यादीत समाविष्ट झाली. ट्रॆव्हल कंपन्यांबरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र जाण्याकडे ओढा वाढला तसं कंपन्यांनीही आपली सेवा सुधारली, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना राबवल्या. प्रेक्षणीय स्थळं बघण्याबरोबरच इतिहास, समाज, संस्कृती, साहित्य यांच्याशी तोंडओळख व्हावी, स्थानिक खाद्यपदार्थांची मजा लुटता यावी म्हणून पर्यटन कंपन्या आणि पर्यटकही जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागले. अगदी आइसलंड, अंटार्क्टिका, आफ्रिका यांचाही पर्यटनस्थळांमध्ये समावेश झाला.



’मेनका’चा जुलै महिन्याचा अंक हा पर्यटन विशेषांक. इतिहासाच्या समृद्ध खुणा वागवणार्‍या, जगप्रसिद्ध चित्रकारांच्या आणि शिल्पकारांच्या कलाकृती अभिमानानं मिरवणार्‍या, निसर्गसौंदर्यानं मुसमुसलेल्या पर्यटकांच्या लाडक्या युरपबद्दल ’एक्स्प्लोअर युरोप’ हा खास विभाग या अंकात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या केट-विल्यम्स विवाहाचं ऒंखोदेखं वर्णन हे या विभागाचं खास आकर्षण. गेल्या काही वर्षांत पर्यटनाची कारणंही बदलली. स्थानिक संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी, फक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, साहसी खेळांसाठी, अगदी औषधोपचार करून घेण्यासाठीसुद्धा पर्यटन केलं जाऊ लागलं. पर्यटनाच्या या बदलत्या स्वरूपांची माहिती करून देतो ’पर्यटनातले नवे ट्रेंड्स’ हा स्वाती वाळिंबे यांचा लेख. भारतातल्या विस्तारणार्‍या पर्यटनाची ओळख करून दिली आहे रघुनंदन कुलकर्णी यांनी ’विस्तारणारं इनबाऊंड टुरिझम’ या लेखात. ’सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय नाईक हे अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबरोबर शासकीय दौर्‍यांमध्ये सहभागी झाले होते. ’अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसंगे..’ या लेखात त्यांनी या दौर्‍यांचे आपले अनुभव सांगितले आहेत. याशिवाय मकाऊ, जॊर्डन. श्रीलंका या हटके पर्यटनकेंद्रांची इत्थंभूत माहिती, प्रवासातली खाद्यंती, आणि ’मेनका’च्या वाचकांचे प्रवासातले अविस्मरणीय अनुभव आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकरशी मनमोकळ्या गप्पा!

घराबाहेर पडून नवनवीन अनुभव घेण्यास उत्सुक असलेल्या पर्यटकांना ’मेनका’चा पर्यटन विशेषांक नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे.

’मेनका’चे वर्गणीदार होण्यासाठी कृपया http://menakaprakashan.com/subscriptions/ हा दुवा पहा. शिवाय ’वाचकविस्तार’ योजनेतही आपल्याला सहभागी होता येईल.

 ’मेनका’चं बदललेलं स्वरूप आपल्याला कसं वाटलं, हे आम्हांला जरूर कळवा. आमचा पत्ता - masik.menaka@gmail.com

0 comments:

Post a Comment