इंद्रधनुष्य (पेज थ्री) - मंगला गोडबोले

on Monday 19 September 2011

स्त्रियांना विनोद कळत नाही, आणि त्यांना विनोद करता येत नाही, असा एक समज मराठी वाचकांमध्ये पूर्वापार आहे. रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ अशा लेखकांनी त्यांच्या लेखनांतून, मुलाखतींमधून या समजाला चांगलंच खतपाणी घातलं. शकुंतला फडणीस, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंगला गोडबोले यांनी मात्र सातत्यानं दर्जेदार विनोदी लेखन करत या समजाला छेद देण्याचं काम उत्तमरीत्या केलं.

'झुळूक', 'पुन्हा झुळूक', 'नवी झुळूक', 'सहवास हा सुखाचा', 'आडवळण' , 'गुंडाबळी', 'जिथली वस्तू तिथे', 'पोटाचा प्रश्न' आणि 'ब्रह्मवाक्य' असे एकाहून एक सरस विनोदी कथा - ललितसंग्रह लिहिणार्‍या मंगला गोडबोले वाचकांना परिचित आहेत. मंगला गोडबोल्यांचा 'पेज थ्री' हा नवाकोरा कथासंग्रह मेनका प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मिश्कील, विनोदी कथांचा हा संग्रह आहे. जन्माला आल्यासारखं आपण एकदा तरी पेज थ्रीवर झळकावं, असं वाटणार्‍या काकू, पळून जाऊन सिनेस्टाइल लग्न करण्याची कांक्षिणी असलेली चि. सौ. आणि आभाळभर पसरलेलं इंद्रधनुष्य आपल्या मुलानातवंडांनी बघावं, अशी इच्छा बाळगणारी गृहिणी या कथांमध्ये भेटतात. या कथा म्हणजे एका अर्थानं आधुनिक उच्च मध्यमवर्गीय मराठी घरांमधली संसारचित्रं आहेत. अजूनही हा वर्ग बदलत्या समाज-संस्कृतीशी जुळवून घेण्याची धडपड करतो आहे. एकीकडे आधुनिकतेचं आकर्षण, तर दुसरीकडे ती पेलताना होणारी दमछाक, ही फरफट माणसांना काय काय करायला लावते, हे मंगला गोडबोल्यांनी या कथांमध्ये अतिशय रंजकपणे मांडलं आहे.

'पेज थ्री' या मेनका प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या मंगला गोडबोल्यांच्या कथासंग्रहातली 'इंद्रधनुष्य' ही कथा...



हे पुस्तक ऑनलाइन विकत घेण्यासाठी - http://menakaprakashan.com/books/page-three/ किंवा
http://kharedi.maayboli.com/shop/Page3.html





Page3.jpg


इंद्रधनुष्य

"करुणाऽऽ टेलिव्हिजन नीट दिसत नाहीये गं तुझा", आजींच्या खोलीतून निदान दहाव्यांदा पुकारा आला तेव्हा करुणाला उठणं भाग पडलं. एकतर टेलिव्हिजन ‘तिचा’ नव्हता आणि दुसरं म्हणजे आजकाल आजींना काहीच नीट दिसत नव्हतं. साधं संडास-मोरीपर्यंत जातानाही वाटेत चारदा ठेचकाळायच्या, कशाला तरी अडखळायच्या. कपातला चहा बशीत ओततानाही सांडलवंड करायच्या, पण त्यांच्या (अंधुकत्या) दृष्टीने या सगळ्या गोष्टी गौण होत्या. टीव्ही हा जीवनाधार! जागेपणी समोर सतत तो दिसलाच पाहिजे. रिअ‍ॅलिटी शो असो, क्रिकेट मॅच असो, हरवल्याचा शोध असो, समोरच्या एकवीस इंची पडद्यावर चित्रं हललीच पाहिजेत. आज दुपारपासून बहुधा ती हलायची थांबली असावीत म्हणून त्या अस्वस्थ होत्या.
"करुणाऽ"
"----"
"क्काय्ये?"
"जरा बघ ना इकडे. टीव्हीवर मुंग्या येताहेत."
‘हो, पण सारखं ते सांगून सांगून तुम्ही माझ्या मेंदूला मुंग्या आणू नका.’
हे वाक्य अर्थातच करुणा मनात बोलली होती. कोणती वाक्यं जनात बोलायची आणि कोणती मनात बोलायची याचा पस्तीस वर्षांचा अभ्यास होता तिचा. (नुकताच तिच्या लग्नाचा पस्तिसावा वाढदिवस पार पडला होता.)
"मला नाही येत टीव्ही दुरुस्त करता."
"मग माणसाला बोलाव."
"संध्याकाळी यांना आल्यावर सांगते."
"संध्याकाळी?... अरे देवा... तोवर माझं काय होणार?"
"होईल व्हायचं ते. मी काय करू?"
"गच्चीत जाऊन बघ ना जरा. त्या अँटेनाचं काय झालंय का? कुठे पतंगबितंग त्यालाला अडकलाय का? वार्‍यानं पडलाबिडला आहे का? मागे एकदा नाही का, पोरांनी पतंगांच्या काटाकाटीमध्ये आपल्या टीव्हीचा आख्खा अँटेनाच खाली आणला होता?... मोठे पतंग उडवताहेत... इकडे लोकांना टीव्ही दिसत नाही त्याचं काहीच नाही यांना..." आजींचा तळतळाट सुरू झाला. त्यांच्या टीव्हीसुखाच्या आड कुणीही येणं त्यांना अजिबात खपत नसे, आणि त्यांचं टीव्ही बघणं भंगणं हे करुणाला परवडत नसे. टीव्ही बघत असल्या, की त्या तिला कमी हाका मारायच्या. पुढची हाक येण्याच्या आत ती दुखर्‍या गुडघ्यासह जितकं लगबगीनं जाता येईल तितक्या लगबगीनं गच्चीकडे निघाली. मोठ्या हौसेनं कोणे एके काळी हा टेरेस फ्लॅट घेतला होता. स्वत:ची स्वतंत्र गच्ची असलेला फ्लॅट; पण अलीकडे आठ-आठ दिवसांमध्ये गच्चीत जाणं होत नसे. रोज सकाळची शाळा संपल्यावर कार्तिक तिच्या घरी यायचा. बँक सुटल्यावर संध्याकाळी नंदिता त्याला इथून आपल्या घरी घेऊन जायची; पण मधल्या त्या पाच-सहा तासांमध्ये कार्तिकबुवा होमवर्क आणि कॉम्प्यूटर गेम्समध्ये पार बुडालेले असायचे. आवर्जून गच्चीवर जाण्याची हौसही त्याला नसायची आणि वेळही नसायचा. लाडाकोडाच्या नातवंडांचं खाणंपिणं, अभ्यास-हस्तव्यवसाय वगैरे बघण्यात तीही गढलेली असायची. एकेकाळी मुलींच्या मित्रमैत्रिणींनी भरपूर वापरलेली गच्ची आता काहीशी वैराणच असायची. दर तीन-चार दिवसांनी मोलकरणीकडून झाडून घेण्यासाठी उघडली जाईल तेवढीच! आणि कधीकाळी आजींच्या टीव्हीनं मान टाकली तर...

करुणानं गच्ची उघडून पाण्याच्या टाकीवर उभारलेल्या त्या अँटेनाच्या गुढीकडे नजर टाकली. क्षणभर काहीच नीट दिसलं नाही. वरती पतंग लटकलाय? नसावा बहुधा. नाहीच. त्याऐवजी एका प्रकाशाची तिरीप डोळ्यांत घुसली. बाजूला झाली. वार्‍याची झुळूक आली. गेली. क्षणभर एक मोठ्ठा ढग रुबाबात इकडून तिकडे गेला आणि नजरेसमोर आलं इंद्रधनुष्य! आकाशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सप्तरंगी कमान! भर दुपारी, पावसाळा संपल्यावरच्या काळात, अगदी अनपेक्षित असं; पण नेटकं, अर्धगोलाकार इंद्रधनुष्य! करुणाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. ही काय वेळ आहे का इंद्रधनुष्य दिसण्याची? इतके देखणे रंग... इतका सुबक आकार... करुणाच्या मनात आनंदाची एक लहरशी उमटून गेली. लहान असती तर टाळ्या वाजवत उड्या मारल्या असत्या. आता वयोमानानं आणि आकारमानानं ते शक्य नव्हतं, पण हा चमत्कार कोणाला तरी सांगावा, हे दृष्टिसुख चार लोकांमध्ये वाटून टाकावं हे तर शक्य होतं. पुन्हा एकदा डोळे भरून इंद्रधनुष्य पाहून तिनं गच्चीतून पुकारा सुरू केला.
‘‘कार्तिक, ए कार्तिक, लवकर वर ये.’’
‘‘काय आहे गं आजी?’’
‘‘वरती आहे एक मजा. ये लवकर.’’
‘‘...’’
‘‘कार्तिक, काय करतोयस?’’
‘‘कार रेस. आज मी त्या बी. एम. डब्ल्यूला जिंकून आणतोच बघ.’’
‘‘आणशील रे. ते सोड. पटकन वर ये. इंद्रधनुष्य पडलंय ते बघायला ये.’’
‘‘तू पडलीयेस का?’’
‘‘पडायला काय झालीये धाड?’’
‘‘पडली नाहीयेस ना? मग राहू दे.’’
आपल्याला इंद्रधनुष्याची काही पडलेली नाहीये हे दाखवून देण्याइतक्या निरीच्छ आवाजात कार्तिक म्हणाला. नाहीतरी तो एकदा कॉम्प्यूटरावरच्या लुटुपुटूच्या मोटारींच्या लुटूपुटूच्या रेसमध्ये रंगला की खाण्यापिण्याचीही शुद्ध राहत नसे त्याला; पण आज हा सृष्टीचा चमत्कार त्यानं बघायला हवा, असं वाटून करुणा लगबगीनं आली आणि त्याला भरभरून सांगायला लागली.
‘‘इथे माऊसशी कसला खेळतोयस मन्या? बघ... कसलं सुंदर इंद्रधनुष्य उमटलंय आकाशात. सातही रंगांची कमान आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत. क्वचितच दिसतो बरं का असला सृष्टीचा चमत्कार. चल लवकर नाहीतर ते जायचंबियचं उगाच. संध्याकाळी मम्मीला सांगता येईल आपल्याला. आज आजीच्या गच्चीत अशी धम्माल झालेली...’’

करुणाचा उत्साह तिच्या आवाजात मावत नव्हता. कार्तिक मात्र या कशानंही हलत नव्हता. ना मनानं, ना शरीरानं. करुणाची बरीचशी शारीरिक, शाब्दिक लगबग करून झाल्यावर तो ढिम्मपणे तिला म्हणाला, ‘‘टेक ए चिलपिल आजी. इंद्रधनुष्य आलंय ना?’’
‘‘मग? अरे, ते काय रोज रोज येतं का? आपल्याला हवं तेव्हा येतं का? तुम्हाला भूगोलात शिकवलं असेल ना... इंद्रधनूचे रंग... तां... ना... पि... हि... वगैरे... प्रकाशाचा किरण कसा भेदला जातो... सात रंग कसे दिसतात...’’
‘‘आय नो इट बाय हार्ट, आजी.’’
‘‘अरे, पण नुसती पोपटपंची वेगळी, डोळ्यानं बघणं वेगळं, नाही का? तुझी आई लहान होती तेव्हा बघत असायची ढगांकडे, पाखरांकडे, इंद्रधनुष्याकडे. ते गेलं की रडूच यायचं तिला, एवढ्यात का गेलं म्हणून.’’
‘‘शी मस्ट बी क्रेझी. एवढं काय त्या इंद्रधनुष्याचं? आपल्या कॉम्प्यूटरवरचा स्क्रीन सेव्हर म्हणूनही इंद्रधनुष्यच टाकलंय तिनं. हे बघ. इंद्रधनुष्य. अ‍ॅट द क्लिक ऑफ द माऊस. हे बघ. तुझं आकाशालं इंद्रधनुष्य तरी एवढं छान आहे का?’’ कार्तिकनं खरोखरच मिनिटभरात कॉम्प्यूटरावर इंद्रधनुष्याचं चित्र आणून दाखवलं. त्याच्या खाली एक काव्यमय वाक्य वगैरे सुद्धा होतं. नुसतं चित्रण नाही. नुसता रंगरेषांचा खेळ नाही. पुढे शब्दखेळही. सगळं त्याच्या हाताशी. फक्त निर्जीव. खर्‍या आकाशाची पार्श्‍वभूमी नसलेलं, खरा ऊनसावलीचा खेळ सोबतीला नसलेलं.
‘‘कार्तिक...’’ तिनं त्याच्याकडे कळवळून पाहिलं. त्याच्या ते लक्षातही आलं. तो रेसच्या निर्णायक वळणावर चालला होता.
‘‘या जॅपनीज गाड्या कुणाला हार जात नाहीत. कमॉन... ए... ए... टक्कर होईल... ओह्... वाचला...’’
तो स्वत:शीच खुशीनं बोलत होता. बसल्या जागी उड्या मारत होता, मुठी वळत होता. एकूणच त्याच्या काररेसच्या उत्तेजनापुढे आणखी कोणतंही उत्तेजन-एक्साईंटमेट त्याच्यापर्यंत पोचणार नव्हती, हे जाणवल्यावर करुणा वैतागून म्हणाली, ‘‘नको येऊस जा. तुझ्या मम्मीलाच फोन करून देते ही गुड न्यूज. ती बघेल बँकेच्या अंगणात येऊन; नाहीतर खिडकीतून. ती तुझ्यासारखी अरसिक नाहीये.’’

करुणानं नंदिताच्या मोबाईलवर फोन लावला. तर पहिल्याच सेकंदाला तिनं तो उचलला.
‘‘नंदेऽ इंद्रधनुष्य.’’
‘‘काय गं आई?’’ दबका आवाज आला. ‘‘कार्तिकनं काही उद्योग करून ठेवला का?’’
‘‘नाही अगं, पटकन बाहेर बघ. इंद्रधनुष्य आलंय आकाशात. तुझी ब्रँच घराच्या इतकी जवळ आहे, तेव्हा म्हटलं, आपल्या घरी दिसतंय ते तुझ्या तिथेही...’’
‘‘असेल बाई, पण मी आता मीटिंगमध्ये आहे.’’
‘‘हो का? सॉरी बरं का. पण मी काय म्हणतेय, तेवढ्यात पटकन खिडकीशी जाऊन एक नजर टाकलीस तर...’’
"आमच्या खिडक्यांना जाड जाड सनफिल्म्स लावल्या आहेत आई. बाहेरचं काही दिसत नाही. लोकांनी काम सोडून बाहेर बघत बसू नये, हीच अपेक्षा आहे ना.’’
‘‘मग गच्चीत, पटांगणात वगैरे कुठे जाता आलं तर... जरा पोरकटपणाचं होतंय का हे? माझं असला फोन करणं वगैरे?’’
‘‘तो प्रश्‍न नाहीये आई. सिक्यूरिटीच्या दृष्टीनं आमची गच्ची कायम बंद असते आणि आवारात आहे निम्मा मांडव... निम्मी वाहनांची गचडी. ठेवू फोन?... एक मोठ्ठं नवं सॉफ्टवेअर विकत घेण्यासंबंधी चर्चा चाललीये. त्याच्यापुढे कुठलं इंद्रधनुष्य आणि कुठलं काय?’’
‘‘खरंय. मला वाटलं होतं एकदा तसं. पुन्हा म्हटलं, तुला सांगितलंही नाही असं नको. छान काही वाचलं-ऐकलं-पाहिलं की तुम्हा मुलींची आठवण येते गं. वाटतं, आपण एकटीनं आनंद घेऊ नये. तुम्हा दोघींना सामील करून घ्यावं... लग्नापासून ती बसलीये कॅनडात जाऊन... निदान तुझ्याशी तरी...’’

पलीकडून फोन बंद झाला किंवा नंदितानं केलाही असेल. करुणा खिडकीच्या जागी गजाला नाक चिकटेल इतकी वाकून दूरवर बघून इंद्रधनुष्याचा अदमास घ्यायला लागली.
‘‘काढलास का गं पतंग... एवढा वेळ लागला आहे त्या अर्थी...’’ आतून तगादा लागला तेव्हा त्रासून ती म्हणाली, ‘‘पतंगबितंग काही नाही आहे हो. तुम्ही उगाच तेवढाच नाद धरू नका. मी इंद्रधनुष्य पाहत होते.’’
‘‘मग टीव्ही का नीट दिसत नाहीये?’’
‘‘मला काय माहिती? मी बिघडवलाय का तो?’’ करुणा आतल्या दिशेनं बोलत होती तरी तिची नजर बाहेरच होती. खालून शेवंता जाताना दिसली, तेव्हा तिच्यात पुन्हा उत्साह संचारला. ‘‘बाहेर चाललीस का गं शेवंता?’’
उत्तर आलं नाही. शेवंता नटूनथटून लगबगीने कुठेतरी निघाली होती. शेवंता त्यांच्या वॉचमनची बायको होती. ती आणि तिचा नवरा शाहू हे दोघं आवारातच मागे एका झोपडीवजा खोलीत राहायचे. तो सोसायटी राखायचा. माळीकाम करायचा. ती आसपास दोनतीन घरी कामं करायची. मुळशीजवळच्या खेड्यातून इथे राहायला आले तेव्हा दोघं अगदी गावंढळ होते, पण शहराचं वारं लागल्यावर त्यांना बदलायला, सुधारायला काही वेळ लागला नाही. त्याच्याकडे मोबाईल आला. ती कपाळावर कुंकवाची उभी-आडवी-तिरपी वगैरे नक्षी काढायला शिकली. आताही त्याच थाटात तिला जाताना पाहून करुणानं टोकलं.
‘‘काय गं? कुठे लग्नकार्याला निघालीस की काय?’’
‘‘चांगल्या कामाला जातेय, वहिनी. टोकून नाट लावू नका.’’
‘‘अगं, नाट कुठला आलाय? उलट चांगला शुभशकुन दाखवतेय समज. वर पाहिलंस का? किती सुंदर इंद्रधनुष्य आलंय?’’
‘‘बरं बरं.’’
‘‘बरं बरं काय... वर बघ ना...’’
‘‘नको. फार वर बघितलं की केसं विस्कटतात.’’
‘‘विस्कटू देत. इतकं सुंदर इंद्रधनुष्य वर्षानुवर्षांत एखाददाच दिसतं बरं का. केस रोजचेच आहेत तुझे.’’
‘‘इंद्रधनुष्य का? मग ह्याच्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.’’
शेवंताच्या घरात बर्‍याच गोष्टी नव्हत्या. पक्कं सिमेंटचं छत नव्हतं; पण टीव्ही होता, आणि तो दिवसभर चालू ठेवण्याची पद्धतही होती. नवरा-बायको अत्यंत निष्ठेनं टीव्हीवर दिसेल ते बघत. मग त्याच पद्धतीनं विचार करत. त्याच भाषेत बोलत.
‘‘याच्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत’’, हे नाचगाण्यांच्या रिऍलिटी शोमधलं वाक्य शेवंतानं असंच उचललं होतं. एखाद्या दिवशी मन लावून अंगण झाडलंन तरी म्हणायची, ‘‘कसं चक्क केलंय की नाही? याच्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.’’ कुणी पाहुणे येणार असले की स्वयंपाकघरात मदत करायला करुणा तिला बोलवायची. तेव्हाही ‘‘आज वड्यांची चटणी फार बेस्ट झालीय वहिनी. तिच्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत’’, असं म्हणायची. एकदा टाळ्या वाजवून मोकळं झालं की पुढे काही करायला नको असंही मानायची. इंद्रधनुष्याला ती अत्युच्च दाद देऊन झाल्यावर पुढच्या कामाला लागायला ती मोकळी झाली.
करुणानं तिला दटावलं, ‘‘सदा कसली गं तुझी वसवस? जरा बघ वर... केवढी रंगांची मज्जा आलीये आकाशात... इंद्रधनुष्य काही रोज रोज नसतं येत.’’
‘‘तोच तर वांधा आहे ना... आज एकदा आलंय त्याचा फायदा घेतला पाहिजे’’, शेवंता तरातरा फाटकाच्या दिशेनं जात म्हणाली.
करुणाच्या मनात चिडचिड सुरू झाली. आपण जीव तोडून सांगतोय त्याचं तिला काहीच नाही. एवढं काय महत्त्वाचं काम असणार आहे बाहेर? तिनं नुसताच पुकारा केला, ‘‘शेवंता...’’
‘‘आता अडवू नका वहिनी. आज दिवसभर ‘इंद्रधनुष्य’ची टीम गावात यायची होती. सकाळपासून रांगा लागल्या आहेत बायकांच्या. मला कामं संपवून जाई जाईपर्यंत ही वेळ उजाडली. माहीत नाही, आता नंबर लागतो तरी की नाही ते...’’
‘‘कशासाठी नंबर लावायचा?’’
‘‘‘शी’ टीव्हीच्या स्पर्धेसाठी. नवा, फक्त बायकांचा चॅनेल निघाला नाहीये का... ‘शी’ टीव्ही?... त्यांनी लावलीय स्पर्धा.’’
‘‘तू भाग घेणारेस?’’ करुणानं विचारलं.
‘तुला भाग घेऊ देणार आहेत का बये?’ असं तिला खरं म्हणजे विचारायचं होतं, पण तिचा इतकं थेट बोलण्याचा स्वभाव आणि सराव नव्हता.
‘‘बघते ना, पैठणी आणि मंगळसूत्र मिळतं का ते. बक्षीसं भारी लावलीयेत त्या लोकांनी. बसला मटका तर बसला.’’
‘‘पण तू करणारेस काय?’’
‘‘मेंदी! मेंदीची डिझाइन्स काढून दाखवणार आहे. ‘इंद्रधनुष्य’मध्ये बायकांसाठी सात कला दिलेल्या आहेत नेमून. मेंदीची डिझाइन्स, कुंकवाचे प्रकार, पोलक्याचे गळे, साडी नेसण्याच्या तर्‍हा... नुसतं घर घर काय करता वहिनी? जरा बाहेर इंटरेस्ट दाखवत चलाऽऽ म्हणजे आपोआप कळले सगळं... असल्या एकेक भारी भारी आयडिया काढतात हे लोक... मी तर म्हणते, यांच्या आयडियांवर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत...’’
शेवंता म्हणाली आणि स्वत:च टाळ्या वाजवत फाटकाच्या बाहेर पडली. मुख्य रस्त्याला लागली. घरी बसणार्‍या स्त्रीला कुणीही येताजाता फटकारलं तरी चालतं या नियमानुसार तीही जाता जाता फटकारून गेली हे करुणाला समजलं, पण तिनं ते फारसं मनावर घेतलं नाही. असं सोम्यागोम्याचं म्हणणं मनाला लावून घेतलं असतं, तर... तर... तिला रोज आत्महत्या कराव्या लागल्या असत्या आणि रोज पुनर्जन्म घ्यावा लागला असता. एवढं सीरियलबाज जगायला ती शेवंता थोडीच होती?

आकाशाकडे नजर टाकताना तिला जाणवलं, एकीकडून एक मोठा ढग आकाश ओलांडायला निघाला होता. त्याच्याखाली हलके हलके आकाशाचा एकेक तुकडा जात होता. शाळेतला भला मोठा फळा एखाद्या मास्तरांनी डस्टरनं पुसायला घ्यावा आणि फळ्यावरची एकेक अक्षरं त्याखाली बुजत जावीत, असं चाललं होतं. इंद्रधनुष्य जाणार की काय? करुणा एकदम सावध झाली. पुन्हा गच्चीत गेली. इंद्रधनुष्याची कमान होती, पण एका बाजूचे रंग फिकट व्हायला लागले होते. त्यामुळे एकमेकांमध्ये मिसळतही चालले होते. सर्वांत खालची तांबडी रेषा ठळक... पुढे हिरव्या-पिवळ्यातील गल्लत... असेच मिसळतील आणि एका क्षणी आकाशासारखे होऊन जातील. कुठून आले? माहीत नाही. कुठे जातील? माहीत नाही. काही वेळ होते हे नक्की! तो वेळ आपण पाहिला हेही नक्की. करुणा गच्चीत कठड्याला रेलून एकटक आकाशाकडे बघत बसली.

‘‘आजीऽ, फोन किती वाजतोय. लक्ष कुठेय तुझं?... मला शेवटी गेमला पॉज करून फोन आणून द्यावा लागला माहितीये...’’ कार्तिक गच्चीत येत म्हणाला. त्याच्या हातात फोन होता आणि कपाळावर आठ्या होत्या. त्याची कॉम्प्यूटरसमाधी भंगली की एखाद्या ऋषिमुनिसारखा क्रोधायमान व्हायचा तो. नंदिता त्याला शाळेत सोडून बँकेत जायची आणि संध्याकाळी बँकेतून घरी जाताना त्याला घरी घेऊन जायची. या मधल्या वेळात करुणानं त्याची कितीही सरबराई केली तरी तो छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर असाच गुरगुरायचा. तो आणि कॉम्प्यूटर यांच्यामध्ये काहीही आलेलं त्याला सहन व्हायचं नाही. त्याला चुचकारत करुणानं फोन हातात घेतला तेव्हा त्याच्या आजोबांनी म्हणजे करुणाच्या नवर्‍यानं त्याचाच धागा पकडत खेकसायला सुरुवात केली.
‘‘काय हे? किती वेळ फोन वाजतोय? होतीस कुठे तू?’’
‘‘गच्चीत.’’
‘‘बेल ऐकू आली नाही का?’’
‘‘च्यक्.’’
‘‘या वेळी? गच्चीत?’’
‘‘खूप छान इंद्रधनुष्य आलंय. तुम्हीपण बघायला हवं होतंत.’’
‘‘कशासाठी?’’
‘‘कशासाठी काय? प्रत्येक गोष्ट कशातरी ‘साठी’ असते का? छान दिसलं. बघत बसले. म्हटलं, तुम्हाला काही बघायला मिळणार नाही. आपण तरी डोळे भरून बघून घ्यावं.’’
‘‘एवढं होतं तर फोटो काढून ठेवायचास त्याचा. तुला गेल्या वर्षी वाढदिवसाला लेटेस्ट मोबाईल घेऊन दिला मी. त्यात कॅमेरा आहे. फोटो निघतो.’’
‘‘मला नाही काढता येत.’’
‘‘कसा येईल? कधी काही नवं शिकायचा, समजून घ्यायचा प्रयत्न केलाय?... घरात एवढी लेटेस्ट इक्विपमेंट आणत असतो मी... पैसे खर्चायची, शिकवायची सगळी तयारी आहे आपली, पण तुम्ही फक्त आकाशाकडे बघत बसायचं ठरवलंत तर लोक काय करणार?’’
‘‘काम काय होतं?’’
‘‘जा, पटकन खाली जाऊन तुझा तो मोबाईल घेऊन ये. छानपैकी फोटो काढून ठेव त्या इंद्रधनुष्याचा. मी सांगतो कसा काढायचा तो.’’
‘‘आत्ता नको.’’
‘‘मग कधी? इंद्रधनुष्य गेल्यावर?’’
‘‘ते तसंही जाणारच आहे. खाली जाऊन आधी मी चष्मा लावणार. मग मोबाईल हातात घेणार. तुम्ही रागावत, रागावत, हे बटण दाब, ते बटण दाब वगैरे फर्मानं काढणार. मी चुकतमाकत करणार. काहीतरी गोंधळ करणार.’’
‘‘मग करू नये गोंधळ.’’
‘‘मुद्दाम कोण करतंय? पण व्हायचा तो होणारच. त्यात खरं इंद्रधनुष्यही जायचं आणि फोटोही हुकायचा.’’
‘‘मग बसा बघत. इंद्रधनुष्य बघून झालं पोटभर, की आमच्या पोटाची चिंता करा. तिघांना घेऊन येतोय घरी. ड्रिंक्सबरोबरचं तंत्र तुम्ही बघा. जेवायला आम्ही बाहेर जाऊ. ठीक आहे?’’
कार्तिकच्या आजोबांनी तिला प्रश्‍न विचारला खरा, पण त्यांचे प्रश्‍न ही तिच्या लेखी थेट विधानंच असत. जसं आताचं होतं. ‘वरती आकाशात भलेही इंद्रधनुष्य आलेलं असेल, त्याचं ते ठीक आहे, पण माझ्या मित्रांची सरबराई ठाकठीक होणं हे माझ्या दृष्टीनं जास्त गरजेचं असेल. तस्मात त्या तयारीला लागावं ही आज्ञा.’
नाइलाजानं करुणा जिन्यावरून खाली यायला लागली, तर पहिल्या पायरीजवळ आजी उभ्या. एका हातात बूट. तर दुसर्‍या हातात साडीच्या निर्‍या धरलेल्या. भयभीत नजर, जिन्याकडे लागलेली.
‘‘हे काय? तुम्ही इथे?’’
‘‘गच्चीवर जावं म्हणत होते.’’
‘‘तुम्ही? कशाला?’’
‘‘इंद्रधनुष्य पाहायला. छान उमटलंय म्हणत होतीस ना?’’
‘‘हो.’’
‘‘मला पाहायचंय.’’
‘‘खिडकीतून बघा.’’
‘‘तसं चुटपुटतं नको. पूर्ण पाहायचंय. त्याच्याखाली उभं राहायचंय. शेवटचं किती वर्षांपूर्वी बघितलं होतं; आठवत नाही. पुन्हा कधी बघू शकेन, असं वाटत नाही. म्हणून म्हटलं, आजच...’’
‘‘तुम्हाला काय दिसणार एवढ्या लांबचं?’’
‘‘जेवढं दिसेल तेवढं.’’
‘‘आणि वरपर्यंत जाणार कशा?’’
‘‘तू नेशीलच की, धरून धरून.’’
आजींपाशी सगळ्या प्रश्‍नांना उत्तरं होती. खरं म्हणजे त्यांच्यापुढे खास काही प्रश्‍नच नव्हता. जायचं म्हणजे जायचं. एकदा ठरवलं म्हटल्यावर चालत, रांगत, सरपटत, कशाही प्रकारे त्या गेल्याच असत्या. त्या धडपणे गच्चीत जाऊन तेवढ्याच सुखरूप खाली येईपर्यंत करुणाचंच अवघड होतं. हताश होऊन ती निमूट पायरीवर बसली. आजींच्या पायात बूट घालून देणं, त्यांची साडी वर खोचून देणं, त्यांना आधाराला आपला खांदा देणं हे सगळं तिनं ओळीनं केलं. एकेक पायरी चढताना त्यांची भरपूर दमछाक होत होती. त्यांची तंत्रं सांभाळताना ती मेटाकुटीला येत होती, तरीही दोघींची वरात एकेक पायरी सर करत होती. शेवटी दोघी गच्चीच्या दरवाजात पोचल्या तोवर चांगली बारा-पंधरा मिनिटं खर्च झाली होती आणि मुख्य म्हणजे आकाशाची पाटी कोरी करकरीत होती. इंद्रधनुष्याची कुठेही, काहीही निशाणी उरली नव्हती. जणू काही ते उमटलंच नव्हतं.
डोक्यावरच्या निळ्यासावळ्या आभाळाचा आणि त्याचा कुठे काही लागाबांधा नव्हता. आजी अंदाजानं मान ताणून, वर करून इकडेतिकडे बघत होत्या. हे पाहून तिला कसंसंच झालं.
‘‘अगं बाई, इंद्रधनुष्य गेलं वाटतं... मी एवढ्या हौसेनं तुम्हांला वरपर्यंत आणलं... आणि... अरे अरे..’’ करुणा मनापासून हळहळली. आजींनी तिची समजूत काढल्यागत म्हटलं.
‘‘अगं, चालायचंच. नाहीतरी तू काय इंद्रधनुष्य धरून का ठेवणार होतीस?...’’
‘‘तरीपण... माझ्यामुळे... तुम्हांला त्रास...’’
‘‘सोड. इथे कुणाला केवढी इंद्रधनुष्याची हौस होती?... पण खाली चैन पडेना. वाटलं, टीव्हीचा अँटेना खरंच धड आहे ना, खरंच पतंगबितंग त्याला लटकलेला नाही ना ही एकदा खात्री करून घ्यावी... तू नीट बघशील... न बघशील...’’
खरं म्हणजे याच्यावर जोरदार टाळ्या व्हायला हव्या होत्या, पण तेवढीही उमेद करुणामध्ये उरली नाही. याच्यावर जोरदार रडावंसं वाटलं, पण तेही बेटं आलं नाही. कोर्‍या आकाशाहून जास्त कोर्‍या मनानं करुणानं आजींना धरून धरून सुखरूप खाली आणलं. खुर्चीत बसवून त्यांना जरा स्थिरस्थावर केल्यावर त्या म्हणाल्या. ‘‘चऽऽलाऽऽ! आमच्या दृष्टीने ही म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणाच झाली म्हणायची. तुझी पण दुपार मजेत गेली. मनसोक्त रंग पाहून घेतलेस की नाही? तुझ्या त्या इंद्रधनुष्याचे?’’
‘‘घेतले’’, अशा अर्थानं करुणानं फक्त किंचित मान हलवली. एवढ्या वेळात कुणाकुणाचे आणि कसेकसे रंग पाहिले, हे त्यांना सांगून काय उपयोग होता?

(प्रथम प्रसिद्धी : चारचौघी दिवाळी अंक २००८)

***

पेज थ्री


मंगला गोडबोले
मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या - १६८
किंमत - १५०
***



हे पुस्तक ऑनलाइन विकत घेण्यासाठी - http://menakaprakashan.com/books/page-three/ किंवा
http://kharedi.maayboli.com/shop/Page3.html


***

कलर्स ऑफ अब्सेन्स

on Monday 12 September 2011



जहांगीर साबावालांच्या चित्रांशी ओळख होऊन आता पंधरा वर्षं होतील. अनोळखी, असुरक्षित वाटायला लावणार्‍या वातावरणात त्या चित्रांनी माझ्या मनातली भीती दूर केली होती. मला आश्वस्त केलं होतं. जहांगीर आर्ट गॅलरीत तेव्हा साबावालांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. पेपरात मोठ्ठी बातमी होती. जहांगीर साबावाला हे नाव अपरिचित असलं, तरी त्या बातमीसोबत असलेलं चित्र मला फार आवडलं. बराच वेळ त्या चित्राकडे मी बघत बसलो होतो. मग लगेचच्या रविवारी भर पावसात मी ते प्रदर्शन बघायला गेलो. मुंबईत शिकायला येऊन  तीनचार दिवस झाले होते फक्त. पण त्या बातमीतल्या चित्रानं लावलेली ओढ जबरदस्त होती. प्रदर्शनात जेमतेम पंधरावीस चित्रं मांडली असतील. अनेक चित्रांमध्ये त्रिकोणी, चौकोनी प्रतलं होती. ही प्रतलं म्हणजे डोंगरांचे, चेहर्‍यांचे, झाडांचे हिस्से होते. त्यांचेच भाग होते. त्या वस्तूंचे काप करून ते एकत्र चित्रांत मांडले होते. त्या वस्तूंच्या वेगवेगळ्या बाजू एकाच वेळी समोर आल्या होत्या. एकच वस्तू एकाच वेळी किती वेगवेगळ्या दृष्टीनं बघता येते, हे ती चित्रं सांगत होती. या शैलीला क्यूबिस्ट शैली म्हणतात, हे नंतर कळलं. अर्थात त्या शैलीबद्दल माहीत नसूनही काही फरक पडला नाही. कारण त्या चित्रांमध्ये क्यूबिझमचा इतका भन्नाट वापर केला होता, की शैलीचा अडसर न होता, चित्रकार थेट संवाद साधू शकत होता. तिथल्या प्रत्येक चित्रानं मला खिळवून ठेवलं. खूप आल्हाददायक रंग होते त्यांतले. डोळ्यांना सुखावणारे. आक्रस्ताळेपणा, आक्रमकता त्या चित्रांमध्ये मुळीच नव्हती.

ही चित्रं रेखाटणारे साबावाला गॅलरीच्या एका कोपर्‍यात उभे होते. भवताली चाहत्यांचा गराडा. पण चेहर्‍यावर प्रौढीचा लवलेशही नाही. लुकलुकणारे डोळे, साल्वादोर दालीच्या मिशीसारखी मिशी, सिल्कचा व्यवस्थित खोचलेला शर्ट आणि कॅराव्हॅट असे साबावाला त्यांच्या चित्रांइतकेच लोभस वाटत होते. साबावाला आणि त्यांची चित्रं मग मला बरेच दिवस पुरले. साबावाला नंतर भेटले ते त्यानंतर पाच वर्षांनी. मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पिकासोच्या अस्सल कलाकृतींचं प्रदर्शन भरलं होतं. अलोट गर्दी लोटली होती. बराच वेळ रांगेत उभं राहून मी दालनात प्रवेश केला, आणि समोर साबावाला दिसले. लहान मुलांना पिकासोची चित्रं समजवून सांगण्यात गुंग झाले होते ते. तीनचार तासांनी माझं प्रदर्शन बघून झालं तरी ते त्याच उत्साहानं नव्यानं आलेल्या रसिकांना पिकासो, मातिझ, त्यांची क्यूबिस्ट शैली असं सगळं समजावून सांगत होते. साबावालांची चित्रं मग मला जास्तच आवडू लागली.



साबावालांची सुरुवातीच्या काळातली चित्रं विलक्षण होती. या चित्रांमधल्या मानवी आकृत्या स्पष्ट नव्हत्या. बरेचदा चित्रांमध्ये त्यांचा केवळ भास व्हायचा, किंवा कॅनव्हासाचा अगदी थोडा भाग त्यांनी व्यापला असायचा. ही चित्रं नीरव शांततेची, एकटेपणाची जाणीव करून द्यायची. मग हळूहळू साबावालांच्या चित्रांतली माणसं ठळक होत गेली. त्यांचे अवयक क्वचित स्पष्ट दिसू लागले. पण तरीही ही चित्रं बघताना या चित्रांमधली माणसं फार दूर आहेत, त्यांना एकटंच राहावंसं वाटतं, असंच जाणवत राहायचं. या माणसांना त्यांच्या चिंता, काळज्या आहेत, हेही कळायचं. ही माणसं कमकुवत असतील, लवकर मोडून पडणारी असतील अशा काय काय शक्यता जाणवायच्या. पण या माणसांची द्वंद्वं, त्यांच्या लढाया, दु:खं कधी अंगावर यायची नाहीत. भडकपणे ती प्रेक्षकाला हादरवायची नाहीत. साबावालांची एक्स्प्रेशनिस्ट आणि क्यूबिस्ट शैलीतली लॅण्डस्केपंही प्रचंड गाजली. त्यांनी चितारलेला समुद्रही अनेकांना भावला. त्यांच्या लॅण्डस्केपांमधले रंग अतिशय सौम्य होते. ही चित्रं बघितली ही मन शांत होई. त्यांनी काढलेल्या समुद्राचं पाणीही नितळ असे. रंग आणि प्रकाशाचा सुरेख मिलाफ या चित्रांमध्ये असायचा. एक आभा या चित्रांमधल्या डोंगरांभोवती, नद्यांभोवती, समुद्रांभोवती, ढगांभोवती असायची. त्यामुळे हा निसर्ग कालातीत वाटे. मजा म्हणजे, ही चित्रं क्यूबिस्ट शैलीशी जवळीक दाखवणारी असली, तरी ती या मातीतली, अस्सल भारतीय वाटत. क्यूबिझमचा संबंध हा मोडतोडीशी असतो. वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळ्या बाजू दाखवताना चित्राच्या विषयाची मोडतोड होते. हा विध्वंस बरेचदा क्यूबिस्ट चित्रांमध्ये उठून दिसतो. हा विध्वंस काहीतरी नवं घडवण्याचा प्रयत्न करत असतो. साबावालांच्या चित्रांमधला विध्वंस मात्र थेट जाणवायचा नाही. त्यांच्या चित्रांमध्ये या विध्वंसातून नव्या कल्पनांना जन्म दिलेला असायचा. नवा विचार मांडलेला असायचा. हा नवा विचार प्रेक्षकांपर्यंत विध्वंसाची जाणीव करून न देता पोहोचे. साबावालांच्या चित्रांमधले रंग ही एक खास बाब होती. आधी लिहिल्याप्रमाणे ते भारतीय होते, सौम्य होते. पण तरीही त्यांचं एक खास वेगळेपण होतं. हे रंग कधीकधी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व जाणवून देत.

साबावालांची चित्रं पलायनवादी असतात, असाही आरोप केला गेला. खर्‍या भारताशी त्यांच्या संबंध नाही, सतत उच्चभ्रू समाजात वावरल्यामुळे त्यांच्या चित्रांत लोकांच्या समस्या दिसत नाहीत, कायम बेगडी रोमॅण्टिसिझमच ते रंगवतात, असं त्यांचे टीकाकार म्हणत. पण हे फारसं खरं नव्हतं. साबावालांनी भारतातल्या समस्यांचं दर्शन जरी घडवलं नाही (प्रत्येक चित्रकारानं आपल्या चित्रांतून समाजातली दु:खं चितारलीच पाहिजेत, असं म्हणणं मूर्खपणाचंच आहे!), तरी त्यांच्या चित्रांत इथली माणसं होती. इथला भवताल होता. इथला संघर्षही होता. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातले बदल साबावालांनी बघितले होते. त्या काळच्या ताणतणावांचे ते साक्षीदार होते. हा काळही त्यांच्या चित्रांमध्ये उमटला. काळाप्रमाणे त्यांची चित्रंही बदलली. अगदी निसर्गचित्रांमध्येही हा बदल संयतपणे दिसून आला. साबावालांच्या नंतरच्या चित्रांतलं आभाळ हे छपरासारखं दिसतं. विश्वाला सामावून घेणारं.



साबावालांची चित्रं त्यांच्या समकालीनांच्या चित्रांपेक्षा जरा वेगळी होती. एम. एफ. हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून बदलता भारत दाखवला. असंख्य वेगवेगळे विषय हाताळले. तय्यब मेहतांसारख्या काहींनी भारतातले सामाजिक कप्पे समोर आणले. सहा दशकांच्या कारकिर्दीत साबावालांनी मात्र निसर्ग, माणसं आणि या दोहोंच्या अनेक शक्यता कॅनव्हासावर जिवंत केल्या. त्यांच्या चित्रांमध्ये क्यूबिझमनं अस्सल देशी रंगसंगतीशी मस्त घरोबा केला होता. अतिशय जिवंत, ताज्या, भारतीय रंगांमधली ती चित्रं होती.

जहांगीर साबावालांचा जन्म १९२२ साली एका गर्भश्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मातुल आजोबा म्हणजे सर कोवासजी जहांगीर. तंबाखूच्या व्यापारात या कुटुंबानं अमाप पैसा मिळवला होता. मुंबई विद्यापीठातल्या अनेक इमारती, लंडनमधली अनेक कारंजी या कुटुंबानं बांधली होती. मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी, पुण्याचं जहांगीर रुग्णालय यांना सर कोवासजी जहांगीर यांचंच नाव दिलं आहे. साबावालांच्या मातु:श्री, बाप्सी साबावाला हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. बाहुल्यांचा प्रचंड मोठा संग्रह त्यांनी केला होता. ताज महाल हॉटेलाच्या जिन्यावर त्यांनी एकदा घोडा चढवला होता. साबावाला त्यामुळं वैचारिकदृष्ट्या अतिशय मुक्त अशा वातावरणात वाढले. नवनव्या कल्पनांना त्यांच्या घरात मुक्त प्रवेश होता. विचार करण्यावर आडकाठी नव्हती.  आपल्या आईबरोबर लहानपणी साबावालांनी भरपूर प्रवास केला. भारत, युरोप त्यांनी पालथा घातला. या प्रवासातच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. औपचारिक कलाशिक्षणासाठी त्यांनी नंतर जे. जे. कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी मिळवल्यानंतर साबावाला काही काळ लंडनमध्ये राहिले, आणि नंतर त्यांनी पॅरिस गाठलं. इथे त्यांच्यातल्या चित्रकाराला मोकळं आकाश मिळालं. क्यूबिस्ट शैलीशी चांगलीच ओळख झाली. तर्‍हतर्‍हेची माणसं त्यांना तिथे भेटली. अनेक नव्या ठिकाणांशी त्यांची मैत्री झाली. नव्या कल्पनांचं, विचारांचं स्वागत करणार्‍या या शहरानं खर्‍या अर्थानं साबावालांमधल्या चित्रकाराला प्रेरणा दिली. पॅरिसमध्ये असतानाच १९५२ साली त्यांची काही चित्रं व्हेनिसच्या द्वैवार्षिक कलाप्रदर्शनातही मांडली गेली.



१९५७ साली साबावाला आपल्या पत्नीसह भारतात परतले, आणि समकालीन कलाचळवळीत आपलं स्थान निर्माण केलं. भारतातल्या कलाप्रेमींना त्यांच्या चित्रांबद्दल आपुलकी निर्माण झाली होतीच. १९५२ साली साबावालांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन मुंबईच्या ताज महाल हॉटेलातल्या एका खोलीत भरलं होतं. एम. एफ. हुसेनांच्या मदतीनं त्यांनी आपली चित्रं मांडली होती. हे पहिलंच प्रदर्शन तसं बर्‍यापैकी गजाली. काही चित्रंही विकली गेली. मग नंतर देशविदेशात त्यांच्या चित्रांची पन्नासेक प्रदर्शनं भरवली गेली. २००५ साली दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात त्यांच्या चित्रांचं सिंहावलोकन आयोजित करण्यात आलं. त्यांची अनेक चित्रं भरपूर किमतीला विकली गेली. ’आता मला मी मोठा चित्रकार झाल्यासारखा वाटतो आहे’, असं ते तेव्हा गमतीत म्हणाले होते. साबावाला खूप मोठे चित्रकार झाले, तरी त्यांनी त्यांचं माणूसपण सोडलं नाही. त्यांचा मूळचा ऋजु स्वभाव कधी लोपला नाही. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांतल्या लोकांशी ते कायम आपुलकीनंच वागले. त्यांचं हे प्रेमळ वागणं कधीच कोणाला खोटं वाटलं नाही. ’एक सहृदय कलाकार’ अशीच त्यांची ओळख कायम राहिली.

सां जुआं द ला क्रूझची एक कविता साबावालंना फार आवडे.

The conditions of a solitary bird are five: The first, that it flies to the highest point; the second, that it does not suffer for company, not even of its own kind; the third, that it aims its beak to the skies; the fourth, that it does not have a definite colour the fifth, that it sings very softly.

या कवितेतल्या पक्ष्याचं वर्णन साबावालांना चपखल लागू होतं. आकाशात उंचच उंच भरारी घेणार्‍या, ऋजु, स्वत्व जपणार्‍या पक्ष्यासारखे असलेले साबावाला आपल्या चित्रांमधून कायम स्मृतीत राहतील.



(लेखात वापरलेल्या चित्रांचा प्रताधिकार संबंधितांकडे सुरक्षित. चित्रं वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घेतली आहे.)

ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून!!!

on Monday 5 September 2011

पाचसहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एका परिचितांना भेटायला त्यांच्या कोचिंग क्लासात गेलो होतो. बारावीच्या परीक्षेची तयारी या क्लासमध्ये करून घेतली जाई. शंभर मुलांची एक बॅच. सर्व विद्यार्थी दहावीत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले. या मुलांशी सहज गप्पा मारत बसलो होतो. ’तुमच्यापैकी इंजीनियरींगला जाण्याची किती जणांची इच्छा आहे?’ असं विचारल्यावर बहुतेक सर्वांनीच हात वर केले. बारापंधरा मुलांना मेडिकलला जायचं होतं. इंजीनियरींगच का, या प्रश्नावर ’कॉम्प्युटर आवडतो’ (!), असं उत्तर मिळालं. अनेकांनी ’आईबाबा म्हणतात म्हणून’ असंही सांगितलं. डॉक्टर व्हावंसं वाटणार्‍या बहुतेक सर्वांचेच आईवडील डॉक्टर होते. दुसर्‍या दिवशी सहज माझ्या शाळेत डोकावलो तर मुख्याध्यापिकांच्या खोलीत आणि बाहेरही पालकांची बरीच गर्दी होती. चढलेले अनेक आवाज आणि आमच्या मुख्याध्यापिका त्यांना शांत करण्याच्या प्रयत्नात. शाळेत आम्हांला ’गुलमोहर रीडर’ नावाचं एक पाठ्यपुस्तक होतं. इंग्रजीतील उत्कृष्ट पुस्तकांमधले निवडक वेचे, कथा या पाठपुस्तकात होत्या. मुलांना वाचनाची गोडी लागावी, उत्तम इंग्रजी वाङ्मयाशी तोंडओळख व्हावी हा या पुस्तकमालिकेचा हेतू होता. मराठीतल्या ’वाचू आनंदे’सारखीच ही पुस्तकमालिका होती. शाळेच्या परीक्षेत मात्र या पुस्तकातून प्रश्न विचारले जात नसत. नेमकं याच कारणामुळे त्या दिवशी पालकांनी आमच्या शाळेवर चक्क मोर्चा आणला होता. बोर्डाच्या परीक्षेसाठी या पुस्तकाचा काहीच उपयोग नाही, मग हे पुस्तक अभ्यासक्रमात कशाला, असं सर्वच पालकांना वाटत होतं. याबद्दल अगोदरच अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र तरीही या विषयाचा तास शाळेनं सुरूच ठेवला. शाळेवर मोर्चा आणून मुख्याध्यापिकांशी भांडण्याशिवाय त्यामुळे पालकांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी मुलांचं भवितव्य महत्त्वाचं. त्या दिवसानंतर अर्थातच ’गुलमोहर रीडर’ आमच्या शाळेत शिकवणं बंद झालं.

या दोन अनुभवांनी मला बरंच अस्वस्थ केलं. आपल्या मुलाला काय शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे, आयुष्य कशाप्रकारे जगायचं आहे, याचा निर्णय पालकच घेत होते. आपल्या मुलांनाही विचार करता येतो, निर्णय घेता येतात, हे निर्णय कदाचित चुकीचे असतील पण या चुकांतून ते काहीतरी शिकतील याचा या पालकांना सपशेल विसर पडला होता. नंतर लक्षात आलं की, या काही अपवादात्मक घटना नव्हत्या. आपल्या मुलांसाठी रस्ता आखण्याच्या कामात बहुतेक सर्वच पालक गुंतले होते. मुलांची आवड, त्यांचा कल, त्यांची गती या कशाचाच विचार केला जात नव्हता.  इंजीनियर किंवा डॉक्टर व्हायलाच हवं, चुकून मार्कं कमी मिळाले आणि बीएस्सी किंवा बीएला ऍडमिशन घ्यावी लागली तर आपल्या आयुष्यात फक्त अंधार, असा विचित्र ग्रह बहुतेक सर्वच मुलांनी करून घेतला होता. आपल्याला मनापासून आवडणारी गोष्ट आपण करिअर म्हणून निवडू शकतो आणि इंजीनियर किंवा डॉक्टर होता आलं नाही, झालं नाही तरी काहीच बिघडत नाही, हे त्यांना कोणी सांगितलंच नव्हतं. अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडेही एक जग आहे, या जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, चित्रं आहेत, संगीत आहे, खेळ आहे, निसर्ग आहे, याचा सगळ्यांनाच विसर पडला होता. या पार्श्वभूमीवर मला सतत आठवत राहिला तो समित साहनी आणि त्याचं ’सिद्धार्थ घराबाहेर पडला, त्यानं आपली बुद्धी जागती ठेवली, डोळे उघडे ठेवले आणि त्याला बुद्धत्व प्राप्त झालं. आखलेल्या मार्गावरून झापडं लावून चालणं खूप खूप सोपं असतं, आणि दुर्दैवानं आपण तेच चटकन स्वीकारतो’, हे वाक्य.



समित साहनी या पस्तिशीच्या तरुणानं अंदमानला ’बेअरफूट’ या नावानं स्कुबाडायव्हिंग स्कूल सुरू केलं आहे. भारतात स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टर होण्यासाठी प्रशिक्षण देणार्‍या फक्त दोन संस्था आहेत, त्यांपैकी ’बेअरफूट’ ही एक. तिथंच असलेलं त्याचं ’बेअरफूट रेझॉर्ट’ही जगभरात प्रसिद्ध आहे. अंदमानच्या विकासासाठी, स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी, तिथल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गेली सातआठ वर्षं समित अहोरात्र मेहनत करतो आहे. मात्र समित अधिक प्रसिद्ध आहे ते लेखक म्हणून. ’ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून - ट्रॅव्हल्स बॅक टू इंडिया’ हे त्याचं भन्नाट प्रवासवर्णन काही वर्षांपूर्वी बरंच गाजलं. समित इंग्लंडहून भारतात आला त्याची ही गोष्ट. लंडन - दिल्ली हा प्रवास विमानात एकदाही न बसता करायचा, असं समितनं ठरवलं. रेल्वे, बोट, घोडे, पाय अशी प्रवासाची साधनं वापरून सात देशांतून प्रवास करत त्यानं दिल्ली गाठली. त्याच्या प्रवासवर्णनात त्याला आलेले धमाल अनुभव तर आहेतच, पण माणस जोडणं, त्यांना समजून घेणं ही अवघड कला समितनं किती उत्तम साधली, हेही हे प्रवासवर्णन वाचून कळतं. समितनं लिहिलेलं प्रवासवर्णन जितकं रोचक तितकंच त्याचं आयुष्यही.

समितचा जन्म कोलकात्याचा. दहावीपर्यंतचं शिक्षण झालं डून स्कूलमध्ये. तो अकरावीत असताना त्याचे आईवडील चेन्नईला स्थायिक झाले, आणि दिल्लीच्या एका महाविद्यालयात घेतलेला प्रवेश रद्द करून समित आईवडिलांकडे राहायला आला. उदारीकरणाचं वारं त्यावेळी नुकतंच वाहू लागलं होतं. परंपरांना घट्ट चिकटून असणार्‍या चेन्नईनं आपले दरवाजे किलकिले करायला सुरुवात केली होती. १९९० साली चेन्नईत ’डाउन अंडर’ या नावानं पहिला नाईटक्लब सुरू झाला, आणि समितनं या क्लबात डीजे म्हणून नोकरी पत्करली. समित तेव्हा पंधरा वर्षांचा होता. संगीताची आवड लहानपणापासूनच होती. शाळेत असताना त्यानं अनेक गाणी लिहिली होती. उत्तम गिटारवादक म्हणून तो शाळेत प्रसिद्ध होता. दहावीच्या वर्षात त्यानं एका मित्राच्या भावाकडून डीजे होण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा चेन्नईला उपयोग झाला. पुढली पाच वर्षं समितनं त्या क्लबात डीजेइंग केलं. दिवसभर कॉलेज आणि रात्री क्लब. समित सांगतो - ’नाईटक्लबात वाट्टेल ते प्रकार चालतात, तुमचा मुलगा तिथे वाईट संगतीत पडेल, असं माझ्या आईवडिलांना अनेकजण सांगत, पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. नाईटक्लब बंद झाल्यावर सर्व आवरून घरी यायला पहाटेचे तीन वाजत. पण याबद्दलही कधीच त्यांनी नापसंती दाखवली नाही. दारू, सिगारेट, ड्रग्ज यांपासून मी लांब होतो, याची त्यांना खात्री होती. मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी गैरफायदा घेणार नाही, याचीही त्यांना खात्री असावी. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मी डीजे असण्याला अजिबातच विरोध केला नाही. अकरावीपासून बीए होईपर्यंत मी डीजेइंग केलं. अभ्यासाबद्दल एकदाही ते मला बोलले नाहीत. भारतातला मी सर्वांत तरुण डीजे होतो, याचा त्यांना अभिमानच होता.’

बारावीनंतर समितनं चेन्नईच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिरस्त्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा मेडिकलला न जाता त्यानं अर्थशास्त्रात पदवी मिळवायचं ठरवलं. बारावीत उत्तम गुण मिळवले असूनही. संगीताची आवड असली, एक उत्तम डीजे म्हणून भारतभरात नाव झालं असलं तरी गिटार वाजवणं, डीजेइंग करणं यांत त्याला करिअर करण्याची इच्छा नव्हती. पदवी मिळवल्यानंतर व्यवस्थापनक्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यानं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी घेतला. घरच्या घरी अभ्यास करून त्यानं एमबीएची प्रवेशपरीक्षा दिली आणि अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत त्याला प्रवेश मिळाला. समितनं अहमदाबादमधली दोन वर्षंही अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक उद्योग करण्यात घालवली. जमेल तेवढा गुजरात त्यानं सायकलीवरून पालथा घातला. तिथल्या लोककलांचा अभ्यास केला. सारंगी वाजवायला शिकला.

अभ्यासक्रम संपत आला आणि समितनं नोकरीसाठी परदेशात जायचं ठरवलं. परदेशी जाऊन भरपूर पैसा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका वेगळ्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून. तीनचार वर्षं परदेशात राहायचं, भरपूर भटकायचं आणि भारतात परत यायचं, असा त्याचा बेत होता. त्या काळी परदेशी कंपन्यांनी भारतात शिरकाव करायला सुरुवात केली असली तरी अशा कंपन्यांमध्ये आयआयएमच्या विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळवणं सोपं नव्हतं. या कंपन्या आयआयएमच्या कॅम्पसला मुलाखतींसाठी येत नसत. समितनं एकाही भारतीय कंपनीत नोकरीसाठी अर्ज तर केला नाहीच, पण दोन अमेरिकन कंपन्यांनी देऊ केलेल्या नोकर्‍याही नाकारल्या. त्याला जायचं होतं इंग्लंडला, कारण तिथे राहून युरोप पालथा घालणं, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन संस्कृतींशी तोंडओळख करून घेणं शक्य होतं. ’अर्न्स्ट ऍण्ड यंग’ या कंपनीत समितला नोकरी मिळाली आणि तो इंग्लंडला गेला. पहिल्या वर्षभरातच त्यानं ऑक्सफर्ड विद्यापीठातून चार्टर्ड अकांउंटन्सीची एक पदविकाही मिळवली.

’इंग्लंडमध्ये मी पाच वर्षं राहिलो’, समित सांगतो. ’तिथे माझ्या लक्षात आलं की, परदेशात नोकरीसाठी किंवा शिकायला येणारे भारतीय आपल्याच कोषात राहतात. नवीन संस्कृतीशी ओळख करून घेणं, त्या संस्कृतीतील उत्तम गोष्टी अंगिकारण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हणजे किती छान आणि सोपं आहे. पण तसे कुठलेच प्रयत्न केले जात नाहीत. अनेक वर्षं वेगळ्या देशात राहूनही आपण त्यांची भाषा शिकत नाही, त्यांचे पारंपरिक पदार्थ चाखून बघत नाही. त्यांचा इतिहास, त्यांच्या लोककला यांकडे तर आपण ढुंकूनही बघत नाही. त्यामुळे असेल कदाचित पण इंग्लंडमध्ये मी फार कमी भारतीयांशी मैत्री करू शकलो. भटकलो मात्र मी भरपूर. मी रोज कमीत कमी दोन तास ओव्हरटाइम करत असे. या जादा कामाचे पैसे न घेता वर्षाच्या शेवटी या जास्तीच्या तासांचा हिशोब करून तेवढी सुट्टी मी घेई. या ओव्हरटाइममुळे दरवर्षी कमीत कमी दोन महिन्यांची सुट्टी मला मिळत असे. या सुट्टीचा मी चांगलाच उपयोग करून घेतला. मी अख्खा युरोप पालथा घातला. नोकरीत मला बर्‍यापैकी चांगला पगार होता. माझ्या गरजा अतिशय कमी. त्यामुळे प्रवासही कमी खर्चात होई. इंग्लंडमधल्या पाच वर्षांपैकी एक अंपूर्ण वर्ष मी अशाप्रकारे भटकण्यात घालवलं.’

इंग्लंडमधली पाच वर्षं संपली आणि समितला ब्रिटिश सरकारकडून एक पत्र आलं. त्याला इंग्लंडमध्ये राहण्याचा व नोकरी करण्याचा कायमचा परवाना देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती.  इंग्लंडमध्ये राहून नोकरीची पाच वर्षं पूर्ण करणार्‍या सर्वच उच्चशिक्षित परदेशी नागरिकांना असं पत्र पाठवलं जात असे. अशा कर्मचार्‍यांची इंग्लंडला तेव्हा गरज होती. बहुतेक सर्वच भारतीय या पत्राची आतुरतेनं वाट बघत असत. समितनं मात्र ते पत्र मिळाल्यावर भारतात परत जायचं ठरवलं. त्याला परदेशात स्थायिक होण्यात अजिबातच रस नव्हता. युरोप पुरेसा बघून झाला होता. पाच वर्षांत त्यानं भरपूर पैसे कमावले होते. आता भारतात परत गेलो नाही, तर पुढे कधीच परत जाता येणार नाही, हे तो जाणून होता. पत्र मिळाल्याच्या दुसर्‍या दिवशी त्यानं नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि भारतात परत जायची तयारी सुरू केली.

भारतात गेल्यावर काय करायचं, हे मात्र अजून ठरलं नव्हतं. त्यामुळे हाताशी भरपूर वेळ होता. सरळ लंडन - दिल्ली विमान पकडून भारतात परतणं समितला मंजूर नव्हतं. लंडनला विमानात बसून काही तासांत भारतात पोहोचण्यात काय मजा? भारतात परत जाताना विमानप्रवास करायचाच नाही, असं त्यानं ठरवलं. इंग्लंडहून भारतात येण्यासाठी तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असा एक मार्ग आहे. तुर्कस्तान आणि इराणमधून हजारो वर्षांपासून भारतात व्यापारी येत होते. मुघल राजे भारतात आल्यानंतर इंग्लंडहून अनेक विद्वान, व्यापारी, राजदरबाराचे दूत याच मार्गानं घोड्यांवरून किंवा चालत भारतात आले. समितला मात्र या मार्गानं येणं शक्य नव्हतं. समित भारतीय. त्याला अफगाणिस्तानाचा आणि पाकिस्तानाचा व्हिसा मिळणं अशक्य होतं. मग समितनं दुसरा मार्ग शोधला. इंग्लंडहून डेन्मार्क, नॉर्वे, सायबेरिया, मंगोलिया या देशांतून चीनमध्ये जायचं. तिथून विक्रम सेठच्या पावलांवर पाऊल टाकत तिबेट, नेपाळ आणि भारत. (चीनच्या नानजिंग विद्यापीठात शिकत असताना सुप्रसिद्ध लेखक श्री. विक्रम सेठ यांनी तिबेट - नेपाळ - भारत असा प्रवास केला होता. ’फ्रॉम हेवन लेक’ या नावानं त्यांनी सुरेख प्रवासवर्णन लिहिलं आहे.) पाच वर्षांत जमा केलेलं सर्व सामान त्यानं विकून टाकलं, पाठीवरच्या सॅकमध्ये मावतील इतकेच कपडे बरोबर घेतले आणि इंग्लंडला कायमचा रामराम ठोकला.




समितनं त्याचा परतीचा प्रवास ’ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून - ट्रॅव्हल्स बॅक टू इंडिया’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. पेंग्विन पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकात अनेक मराठी प्रवासवर्णनांमध्ये असते तशी ऐतिहासिक किंवा स्थलदर्शनाची माहिती खच्चून भरलेली नाही. हे पुस्तक म्हणजे समितला आलेल्या अनुभवांचं, भेटलेल्या असंख्य माणसांचं सुरेख शब्दचित्र आहे.   समित जगाकडे अतिशय निकोप नजरेनं पाहतो. माणसांच्या रंगावरून, भाषेवरून, पेहरावावरून तो त्यांना लेबलं चिकटवत नाही. तो या माणसांशी मनापासून संवाद साधतो, त्यांच्यातलाच एक बनून राहतो. त्यामुळे त्याला आलेले अनुभवही अस्सल आहेत. या संपूर्ण प्रवासात समितनं आपली खरी ओळख क्वचितच कोणाला करून दिली. तो शाळेत होता तेव्हा त्याच्या आवडत्या शि़क्षिकेनं त्याला सांगितलं होतं - ’यू कॅन बी व्हॉट यू वॉन्ट टू बी’. हे वाक्य कायम लक्षात ठेवणारा समित कधी भारतातला योगशिक्षक झाला, तर कधी बॉलिवूडच्या मसालापटांचा दिग्दर्शक. कधी अणुशास्त्रद्न्य तर कधी चिन्यांना इंग्रजी शिकवणारा शिक्षक. नॉर्वेत हेलसिंकीला हॉटेलात जागा न मिळालेला समित एका बागेतल्या बाकड्यावर झोपला होता. पहाटे चार वाजता त्याला पोलिसांनी उठवलं. तिथे त्याच्यासारखेच काही प्रवासी झोपलेले. कोणी स्पॅनिश तर कोणी अमेरिकन. पोलिसांनी समितची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की, समित हा भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार. त्याचं विमान चुकलं, म्हणून त्याला नाइलाजानं बागेत येऊन झोपावं लागलं. ’कबड्डी’ हा खेळ कसा खेळतात हे त्या पोलिसांना ठाऊक नव्हतं. समितनं मग त्यांना कबड्डीचे धडे दिले. बागेतले इतर प्रवासीही त्यांना सामील झाले, आणि सकाळी पाच ते सात या वेळेत नॉर्वे पोलिस विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड असा कबड्डीचा सामना रंगला.

ट्रान्स-सायबेरियन रेल्वेतल्या प्रवासात समितला भारतीय चित्रपट आणि त्यातही मिथुन चक्रवर्ती आणि भप्पी लहिरी यांची महती कळली. जगातल्या सर्वांत लांब रेल्वेमार्गावरून प्रवास करताना, आणि पुढे रशियात अनेक ठिकाणी समितला मिथुनसारखा ’डिस्को’ करण्याचा आग्रह झाला. ’जिमी जिमी’ हे गाणं तर त्यानं शेकडो वेळा म्हणून दाखवलं. किंबहुना रशियाच्या सीमेवर पोलिसानं त्याला ’जिमी जिमी’ म्हणून दाखवल्यानंतरच प्रवेश करू दिला. मंगोलियातल्या भटक्या घोडेस्वारांबरोबर समित मनसोक्त भटकला. त्यांच्या वस्तीवर जाऊन राहिला. चीनमधली प्रेक्षणीय स्थळं तर बघितलीच, पण चिनी मनोवृतीही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तिबेटच्या मार्गावर भेटलेल्या पाकिस्तान्यांशी बोलला. त्यांच्यातला एक पाकिस्तानी ट्रक ड्रायव्हर भारताला शिव्या देऊ लागताच त्याला ’शांततेचे धडे’ देऊन गप्पही केलं. तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीयांना परवाना मिळवणं अतिशय अवघड. विक्रम सेठनं परवाना देणार्‍या कार्यालयात ’आवारा हूं’ हे गाणं म्हणून परवाना मिळवला होता. समितनंही हेच गाणं म्हणून परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या अधिकार्‍यानं परवाना नाकारल्यावर ’जिमी जिमी’ म्हणून बघितलं. तरीही परवाना मिळत नाही म्हटल्यावर तो एका अमेरिकनाच्या परवान्यावर आपला फोटो लावून तिबेटला गेला. मानससरोवर, तिबेटी लोक, ल्हासा यांचं अतिशय धमाल आणि क्वचित हृद्य वर्णन समित्नं केलं आहे.

नेपाळला पोहोचल्यावर समितनं आपल्या प्रवासाबद्दल शांतपणे विचार केला. इथून तिथून माणसं सारखीच, हे त्याला पुरेपूर कळलं. प्रेमानं आदरातिथ्य करणारे मंगोल, ’एकेकाळी आमचा देश केवढातरी मोठा होता..आमची संस्कृतीसुद्धा सर्वश्रेष्ठ’, असं म्हणणारे रशियन, नातीच्या लग्नाच्या काळजीत असलेले चिनी आजोबा समितला फार जवळचे वाटले. भारतीयांचा ’चलता है’ म्हणून आयुष्यातल्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावही मग त्याला खटकला. अवतीभवती काय घडतं आहे, त्याचे किती भयानक परिणाम होऊ शकतात, यांचा विचार न करता आपण भारतीय निर्णय घेतो, किंवा निर्णय घेणं टाळतो, स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्याला किंमत देत नाही, वेगळं पडण्याच्या भीतीनं वेगळं बोलण्याचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं टाळतो, हे समितला उमगलं. समित दिल्लीला आला तो अनेक अनुभव जमा करून. ’या अनुभवांमुळे शहाणं होण्यास मात्र अजून बराच वेळ लागेल’, असं त्यानं लिहून ठेवलं.

समित भारतात परतला तेव्हा ’आता पुढे काय’, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. पुन्हा नोकरी करण्यात त्याला रस नव्हता, पण नक्की काय करायचं, हेही त्याला कळत नव्हतं. भारतात परतल्यावर वर्षभरानं समितनं आपल्या प्रवासाबद्दल लिहायचं ठरवलं. लंडनहून परतीच्या प्रवासात आलेले अनुभव मित्रांना, नातेवाइकांना सांगत असताना त्याला हे सगळे अनुभव लिहून काढण्याचा आग्रह होत असे. आपण पुस्तकबिस्तक लिहून लोकांच्या घरातली रद्दी वाढवायची नाही, असं त्याने पक्कं ठरवलं होतं. ’तू तुझ्या प्रवासाबद्दल लिही’, असं कोणी म्हटलं की तो सरळ विषय बदले. मग हळूहळू लोकांचा आग्रह थांबला तसं त्याला प्रवासवर्णन लिहावंसं वाटू लागलं, आणि चार कपडे पाठीवरच्या सॅकमध्ये टाकून पुस्तक लिहिण्यासाठी तो परत घराबाहेर पडला. पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं समितनं भारत उभाआडवा पिंजून काढला. तीन महिने हिमालयात जाऊन राहिला. समित इंग्लंडला होता त्या काळात भारतात बरेच बदल झाले होते. या नव्या, बदललेल्या भारताशी नव्यानं ओळख करून घेत समितनं पुस्तक लिहायला सुरुवात केली. पुस्तकाचा शेवटचा भाग त्यानं अंदमानला लिहिला. समितच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा. त्याच्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा.



२००२ साली समित अंदमानला गेला तेव्हा तिथे पर्यटकांची अजिबातच गर्दी नसे. आठवड्याला तीन विमानं पोर्ट ब्लेअरला उतरत. तिथले सगळे समुद्रकिनारे आपल्या खाजगी मालकीचे असल्यासारखे वाटत. समित अंदमानच्या प्रेमात पडला. तिथला समुद्र, तिथली बेटं, माणसं या सगळ्यांनी त्याला भुरळ घातली. तिथे राहून त्यानं आपलं पुस्तक पूर्ण केलंच, शिवाय ’पुढे काय?’ या प्रश्नाचं उत्तरही शोधलं. सहा महिन्यांनी समित अंदमानला कायमचा स्थायिक होण्यासाठी आला. तिथे राहून तिथल्या पर्यटनाला चालना देण्याची, स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करण्याची त्याची योजना होती. अंदमानच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना मात्र समितला हे करणं जमेल, याबद्दल खात्री नव्हती. आवश्यक ती मदत करण्याची त्यांची तयारी होती, पण ’अंदमानला राहणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, इथे मुद्दाम कोण पर्यटनासाठी येईल?’ असा त्यांचा सवाल होता. समितनं प्रयत्न करण्याचं ठरवलं. भारत सरकारच्या पर्यटन खात्यानं समितला पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दाखवली. तरीही सगळ्या परवानग्या घेण्यात, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात दोन वर्षं गेली. २००५ साली समितचं ’बेअरफूट रेझॉर्ट’ अंदमानच्या हॅवलॉक बेटावरच्या राधानगर समुद्रकिनार्‍यावर सुरू झालं. निसर्गाशी असलेली बांधिलकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून रेझॉर्टची नाव ’बेअरफूट’.



पस्तीस खोल्यांचं हे रेझॉर्ट जगभरातल्या प्रवाशांचं आवडतं आहे. पर्यटकांमुळे, पर्यटनामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी इथे विशेष काळजी घेतली जाते. या रेझॉर्टला जोडूनच समितनं एक स्कुबाडायव्हिंग स्कूल सुरू केलं आहे. स्कुबाडायव्हिंगचा काहीच अनुभव नसलेले पर्यटक इथे येतातच, शिवाय स्कुबाडायव्हिंग शिकवण्यासाठी प्रशिक्षकांनाही इथे तयार केलं जातं. गेल्या काही वर्षांत समितच्या संस्थेतून वीस स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टरांनी प्रशिक्षण घेतलं आहे. स्कुबाडायव्हिंगची वाढती लोकप्रियता आणि लोकांच्या हातातला वाढता पैसा यांमुळे अनेक तरुणांचा ओढा स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टर होण्याकडे आहे. अंदमानला येणारे पर्यटकही समुद्राखालचं जग बघण्यास उत्सुक असतात. समुद्रातल्या प्रवाळांना, इतर जिवांना त्रास न देता त्यांचं सौंदर्य न्याहाळण्यास समित पर्यटकांना शिकवतो. समित अंदमानला गेला त्याला आता सात वर्षं झाली. अंदमान आता बरंच बदललं आहे. रोज आठ विमानं पोर्ट ब्लेअरला उतरतात. पर्यटकांचा ओघ दरवर्षी वाढतोच आहे. स्थानिकांनाही आता या पर्यटनातून पैसा मिळतो आहे. या सार्‍यांत समितचा मोठा वाटा आहे. अंदमानला परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले आहेत. असंख्य भारतीय पर्यटकही समितच्या रेझॉर्टला पुन:पुन्हा भेट देतात. पर्यटनामुळे निसर्गाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून समितनं पर्यटकांना आखून दिलेले नियम आता अंदमानातले बरेच रेझॉर्टचालक पाळतात.

समितचा एकूणच प्रवास मोठा विलक्षण आहे. त्यानं स्वत:चा मार्ग स्वत: शोधलाच, पण हे करताना समाजाचाही विचार केला. पर्यावरणरक्षणासाठी, अंदमानाच्या विकासासाठी त्यानं जे प्रयत्न केले आहेत, त्याला खरंच तोड नाही. समित सांगतो - ’मी काही खूप मोठं काम केलेलं नाही. अंदमानला आलो, तेव्हा इथलं सौंदर्य दिसलंच, पण इथली गरिबीही दिसली. भारताचा भाग असूनही अगदी वेगळा पडलेला हा प्रदेश होता. सरकारी अधिकारीही इथे यायला नाखूश असत. जे थोडेफार पर्यटक येत, त्यांचीही गैरसोय व्हायची. इथल्या प्रशासनालाही परिस्थिती बदलण्याची इच्छा नव्हती. सुरुवातीची दोन वर्षं मला बरीच धावपळ करावी लागली. पण त्यामुळे माझ्यानंतर अंदमानला येऊन पर्यटनक्षेत्रात काम करणार्‍यांचा मार्ग सोपा झाला. आता पर्यटकांची संख्या खूप वाढली आहे, तसंच निसर्गरक्षणाबद्दलची जाणीवही वाढीस लागली आहे. स्कुबाडायव्हिंग करताना आपण प्रवाळांचं नुकसान करू शकतो, हे प्रत्येक पर्यटकाच्या डोक्यात मी घट्ट बसवलेलं असतं. त्यामुळे पर्यटक खूप काळजीपूर्वक वावरतात. निसर्गाची काळजी घेणं, हे सर्वांत महत्त्वाचं, आणि तेच आम्ही अंदमानला करत आहोत.’

’अनेकांना माझ्या एकंदर आयुष्याबद्दल कुतुहल असतं. म्हणजे आधी डीजे, मग अहमदाबादच्या आयआयएमसारख्या जगविख्यात संस्थेतून पदवी, ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदविका, लंडनमधलं कॉर्पोरेट क्षेत्र, माझं पुस्तक आणि आता अंदमान. मी काही वेगळं करायचं, असं ठरवून निर्णय घेतले नाहीत. त्या त्या वेळी मला जे योग्य वाटत गेलं, तेच मी केलं. यांत माझ्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे. निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयांची जबाबदारी पेलण्याची क्षमता मला आईवडिलांकडून मिळाली, असं मला वाटतं. त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, आणि त्या स्वातंत्र्याची किंमतही मला शिकवली. माझ्या निर्णयांमध्ये त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. पण प्रत्येक निर्णय घेताना परिणामांचा विचार करण्याची सवयही त्यांनी लावली. आज माझे मित्र कोट्यवधी रुपये कमावतात, पण मी काही गमावलं आहे, असं मला अजिबात वाटत नाही. उलट मला बरेच वेगवेगळे अनुभव घेता आले, जगभरात भटकता आलं, माणसं बघता आली, याचं खूप समाधान आहे. सध्या जग इतकं झपाट्यानं बदलतं आहे. रोज आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाणं मला माझ्या प्रवासामुळे खूप सोपं झालं. अंदमानात म्हणूनच मी खूप सुखी आहे.’

समितला जाणवलेले काळानुरुप होणारे बदल हे स्वाभाविक असतात. या चांगल्यावाईट बदलांचा समाजावर परिणाम होतच असतो. या बदलाचा वेगही कमीजास्त होतो. बदलाचा वेग भोवंडून टाकणारा असेल तर स्वतःची ओळख शोधण्यासाठीही वेळ मिळत नाही. आपल्याला स्वतंत्र विचारशक्ती लाभली आहे, आपण आपली स्वतःची वाट शोधू शकतो, स्वतःचं वेगळं विश्व उभारू शकतो याचा मग आपल्याला विसर पडतो. आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटातली पिढी याचं उत्तम उदाहरण आहे. केबल, मोबाइल, इंटरनेट, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यांच्याशी फार लवकर ओळख झालेली ही पिढी. त्यामुळे असेल कदाचित, पण वेग आणि स्पर्धा यांना तोंड देणं हे या पिढीचं एक महत्त्वाचं काम होऊन बसलं. पुढे जाताना श्वास घेण्यासाठी थांबणंही अवघड झालं. आपल्याला काय येतं, काय आवडतं, काय करायला आवडेल, यांचा विचारच केला गेला नाही. 'स्कोप' कशाला आहे आणि कुठल्या क्षेत्रात 'सॅच्युरेशन' झालेलं नाही, यांवर कॉलेजातली, शाळेतली मुलं आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवू लागली. यात कोणालाही काही गैर वाटलं नाही, कारण आमची ही पिढी भरपूर पैसा मिळवत होती, आहे. वाढत्या मागणीमुळे हा भरघोस मेहनताना मिळतो, हे मात्र कुणालाच कळलं नाही. ती आपली कुवतच आहे, असा समज करून घेण्यात आला. त्यामुळे काहीशा उद्दामपणे या पिढीची वाटचाल सुरू राहिली. माहिती-तंत्रज्ञानाचं युग अवतरलं, बाजारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. कामाचं स्वरूप चाकोरीतलं असल्यानं आणि इतर क्षेत्रांचा विचार करायला पुरेसा वावच नसल्यानं एकांगीपणा, आत्मकेंद्रीपणा वाढत गेला. साचलेपणा आला. वैचारिक वाढ खुंटली. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, आमच्या पिढीत मूलभूत अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माणच झाली नाही. शाळा-कॉलेजांत प्रगती करणार्‍यांनी नोकरी-व्यवसायांतही प्रगती केली. पण या भौतिक प्रगतीच्या जोडीनं बौद्धिक प्रगती क्वचितच झाली.

तसंही भौतिक प्रगतीच्या मागे धावणारा समाज व्यक्तीतील उपजत गुणांचा विकास होऊ देण्यास घाबरतो. खेळ, साहित्य, कला यांच्यामुळे भौतिक प्रगती होत नसल्याच्या समजातून त्यांच्याकडे आपसूकच समाज दुर्लक्ष करतो. असा समाज एकांगी असतो. या समाजानं भौतिक प्रगती केली तरी त्या समाजाचं खुजेपण लपत नाही. या खुजेपणातून पुढच्या पिढीनंही वेगळी वाट धरू नये, यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्याकडे खेळ, संगीत, नृत्य यांतल्या प्रावीण्यापेक्षा परीक्षेतले मार्क अधिक महत्त्वाचे समजले जातात. बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा मेडिकलला प्रवेश न घेता कलाशाखा किंवा विज्ञानशाखा निवडणारा विद्यार्थी निर्बुद्ध समजला जातो. चित्रकलेत रस असणार्‍याला सॉफ्टवेअरमध्ये 'काहीतरी' करण्याचा आग्रह धरला जातो. दुर्दैव असं की, बहुतेक तरुण या दबावाला बळी पडतात. लहानपणापासून स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हळूहळू गमावलेली असतेच. त्यातच पैसा हे मोठं आकर्षण असल्यानं आपल्याला नक्की काय आवडतं, हा विचार केलाच जात नाही, करू दिला जात नाही. खरं म्हणजे आपल्याला हव्या त्या क्षेत्रात उत्तम काम करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत आणि या आवडत्या क्षेत्रात काम करून भरपूर पैसेही कमावता येतात. पण दुर्दैवानं समोर पडलेल्या लाकडापासून प्रत्येकजण एकसारख्या खुर्च्या तयार करतो. त्या लाकडापासून सुंदर शिल्पही तयार करता येतं, हे फार थोड्यांना कळतं. कुठलीही दोन माणसं कधीच सारखी नसतात. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, त्यांच्यात असलेली कौशल्यं वेगळी. मग प्रत्येकानं सारखंच काम केलं पाहिजे, हा आग्रह का?

कॉलेजात असताना मी दुर्गाबाई भागवतांकडून एक गोष्ट ऐकली होती. श्री. गो. रा खैरनारांना एकदा दुर्गाआजींनी विचारलं, "खैरनार, तुम्ही इतकं काम करता, अनेकांच्या इमारती जमीनदोस्त करता, तुम्हांला ही शक्ती मिळते कुठून?" खैरनार म्हणाले, "दुर्गाबाई, मी लहान होतो तेव्हा माझे वडील मला नेहमी सांगायचे, ’तू तुला हवं ते कार आयुष्यात, पण जे करायचं ते प्रामाणिकपणे आणि उत्तम कर. तुला कोणी दादरच्या चौपाटीवर उभं राहून लाटा मोजायला सांगितलं, तरी त्या कामाला तू नाही म्हणू नकोस. पण लाटा अशा मोज की प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, लाटा मोजाव्यात त्या खैरनारांच्या पोरानंच’". दुर्गाबाईंनी जे सांगितलं तेच राजवाड्यातलं सुख त्यागून घराबाहेर पडलेल्या सिद्धार्थनंही सांगितलं - ’आयुष्याचं ध्येय शोधणं हेच खरं आयुष्याचं ध्येय’. बुद्धीला झापडं लावली नाहीत, तर हे ध्येय शोधणं फार अवघड नाही!