भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटले आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचं दालन समृद्ध झालं. आरा, हुसेन, बाकरे, रझा, सुझा यांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपाची स्थापना केली. तय्यब मेहता, अकबर पदमसी यांसारखे चित्रकारही नंतर या ग्रुपाचे भाग झाले. मात्र या कलाकारांवर युरोपीय चित्रकलेचा प्रभाव असल्याचे आरोपही केले गेले. असं असलं तरी आधुनिक भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नेण्यात या चित्रकारांचा फार मोठा वाटा होता, हे नक्की.
युरोपीय प्रभाव नाकारून भारतीय मुळांमध्ये रुजलेली चित्रं काढणारेही काही चित्रकार कार्यरत होते, आणि अशा चित्रकारांमध्ये श्री. मनजीत बावांचं स्थान फार मोठं आहे. मनजीत बावांची चित्रशैली अनोखी आणि त्यांची चित्रंही अप्रतिम सुंदर. बावांची शैली अमूर्त असली तरी त्यांची चित्रं अतिशय वास्तव वाटतात. त्यांच्या आकृत्या काहीशा फुगीर असतात, आणि त्यामुळे त्यांची चित्रं एकाच वेळी वास्तव आणि अमूर्त वाटतात. त्या चित्रांमधलं जगही जादुई वाटतं. या चित्रांना पुराणकथांचा, इतिहासाचा, लोकसंस्कृतीचा, सुफी काव्याचा आधार असला तरी ही चित्रं पारंपरिक नाहीत. या चित्रांना स्वतःचा एका बाज आहे. ही चित्रं वरवर खूप साधी वाटतात. पण तशी ती साधी मुळीच नाहीत. बावांच्या चित्रचौकटीतून एकाच वेळी अनेक प्रतिमा आपल्याला दिसतात. या चित्रांचं साधेपण आपल्याला हातोहात फसवतं. बावांची चित्रं अतिशय जिवंत असतात. कुरणात चरणार्या गायी, बासरी वाजवणारा कृष्ण किंवा हीर, तांडवनृत्य करणारा शंकर बघताना आपल्याला बासरी, घंटेची किणकिण, मृदंग ऐकू येतात. अनेक चित्रांमधली गंभीर शांतताही जाणवून जाते.
युरोपीय चित्रशैलीतले राखाडी आणि तपकिरी रंग न वापरता अस्सल भारतीय रंग वापरणार्या बावांच्या चित्रांतले रंग एकाच वेळी अनेक भावभावना प्रकट करतात. हे रंगही खास. ऑकर पिवळा, चमकदार हिरवा, किरमिजी, तेजस्वी मोरपंखी, निळा हे अस्सल भारतीय रंग बावांनी कायम वापरले आहेत. 'हे रंग भारतीय मनाला कायम भुरळ घालतात. भारतीय मनोवस्थेला अतिशय ओळखीचे असे हे रंग आहेत, आणि म्हणून माझ्या चित्रांमध्ये आपसुकच ते वापरले गेले', असं बावांनी लिहून ठेवलं आहे.
बावांच्या चित्रांत निसर्गाला महत्त्वाचं स्थान आहे. झाडं, प्राणी, पक्षी, ढग त्यांच्या चित्रांत नेहमी दिसतात. संगीतही त्यांच्या चित्रांतून हजेरी लावतं. अनेकविध वाद्यं आणि वादक त्यांनी रेखाटले आहेत. त्यांतही बासरी त्यांना सर्वांत जवळची. बासरी वाजवणारा कृष्ण आणि हीर, ही बासरी ऐकणारी कुत्री अशी त्यांची काही चित्रं आहेत. बावा उत्तम बासरी वाजवायचे, पन्नालाल घोषांकडे ते अनेक वर्षं शिकत होते, याचा हा प्रभाव असावा.
मनजीत बावांचा जन्म १९४१ साली पंजाबातल्या धुरी या गावी झाला. पुढे हे कुटुंब दिल्लीला स्थायिक झालं. मनजीत कुटुंबात सर्वांत लहान. त्यामुळे त्यांचे लाडही भरपूर झाले. त्यांच्या मोठ्या भावांनी कायमच त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं. स्वभावतः असलेली निसर्गाची ओढ आणि हे स्वातंत्र्य यांमुळे बावा पौगंडावस्थेत, तरुणपणी भारतभर फिरले. अनेक अनुभव गोळा केले. चित्रकलेची आवड लक्षात आल्यावर मोठ्या भावांच्या पाठिब्याने बावांनी दिल्लीच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे बी. सी. संन्याल यांसारखे ज्येष्ठ शिक्षक त्यांना लाभले. मात्र बावांमधल्या चित्रकाराला खरा आकार दिला तो अबनी सेन यांनी. अबनीबाबूंचं हे ऋण बावा कायम मान्य करत आले.
मेनका प्रकाशनानं मनजीत बावांच्या 'इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. मूळ इंग्रजी शब्दांकन इना पुरी यांनी केलं होतं. मराठी अनुवाद स्वाती देशपांडे यांनी केला आहे. या आत्मचरित्रात मनजीत बावांचे चित्रकलेविषयीचे विचार आहेतच, पण महत्त्वाच्या आहेत त्या त्यांच्या आयुष्यातल्या घटना. त्यांचं बालपण, त्यांचं घर, सायकलीवरून त्यांनी केलेली भटकंती, परदेशातले प्रवास, इंग्लंडमधले दिवस, लग्न, घटस्फोट, अपंग मुलगा, डलहौसीचे दिवस यांमुळे एका विलक्षण प्रतिभावान चित्रकाराची चित्रं नव्याने समजतात. या चित्रांमागची प्रेरणा कळते.
मनजीत बावा स्वतःला संग्राहक मानायचे. अनुभव, कथा, प्रवास या सगळ्यांचा संग्राहक. या संग्रहातूनच बावांची सुंदर चित्रं साकारली गेली. इतर कुठल्याही चित्रकाराच्या चित्रांप्रमाणेच बावांच्या चित्रांतही त्यांचं आयुष्य, त्यांचे अनुभव उतरले होते. पिकासो, गोगँ यांच्या आयुष्यातल्या स्त्रिया कॅन्व्हासावर उतरल्या. भुपेन खख्खर यांची चित्रंही त्यांच्या लैगिकतेवर भाष्य करणारी. मनजीत बावांच्या चित्रांमधूनही त्यांचं समृद्ध आयुष्य डोकावलं. आणि म्हणूनच बावांचं जगणं कळलं की त्यांची चित्रंही मनाला जास्तच भिडतात.
मनजीत बावांच्या 'इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या आत्मचरित्रातली ही काही पानं...
हे पुस्तक विकत ऒनलाइन विकत घेण्यासाठी - http://kharedi.maayboli.com/shop/In-Black-and-White.html
किंवा http://menakaprakashan.com/category/books/ इथे बघा.
भगतसिंग मार्केटमधल्या एका साध्याशा घरातल्या त्या खोलीत वीस एक जण दाटीवाटीने बसले होते. मनजीतही त्यांतलाच एक! सर्वांच्या उरात एकच इच्छा होती, प्रसिद्ध चित्रकार अबनी सेन ह्यांना भेटण्याची...शेवटी एकदाची मनजीतची पाळी आली. धोती-कुडता घातलेल्या, मध्यम चणीच्या अबनीबाबूंना पाहताच मनजीतला जाणवली ती त्याची भेदक नजर...असे डोळे त्याने आजवर कुणाचेच पाहिले नव्हते. त्या वेळी मनजीतचं वय असावं जेमतेम पंधराएक वर्षांचं...दहावीत शिकणारा मनजीत वयाने लहान होता तरीही त्याला स्वतःच्या मनातली कलाक्षेत्राची ओढ निश्चितपणे जाणवायला लागली होती. त्याच क्षेत्रात काम करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती, तसं त्याने मनमोहनना बोलूनही दाखवलं होतं, किंबहुना पटवलं होतं. मनमोहनही त्याच क्षेत्रातले. एस.एड. डिपार्टमेंटमध्ये त्यावेळी ते एक कमर्शिअर आर्टिस्ट म्हणून नोकरीला होते. मनजीतमधल्या कलागुणांची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. शिवाय ते स्वतःदेखील अबनीबाबूंचे विद्यार्थी होते. म्हणूनच ते मनजीतला अबनीबाबूंच्या वर्गाला घेऊन आले होते.
त्यावेळी कुठे कुणाला माहिती होतं की, त्याच खोलीत मास्टरमोशाय, म्हणजे अबनीबाबूंकडून मनजीतच्या कलागुणांना जादूचे पंख लाभणार होते म्हणून. कुम्होरांच्या मागे त्या जादूगार राजाच्या शोधात जाण्याची त्याला गरजच पडणार नव्हती. त्या छोट्याशा खोलीत, भविष्यात, त्यालाच कलेच्या मोहिनीची जादू प्राप्त होणार होती.
अबनी सेन हे मूळचे कलकत्त्याचे. दिल्लीला येण्यापूर्वी काही काळ त्यांनी लखनौमध्ये चित्रकलेचं अध्यापन केलं होतं. दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी रायसीना स्कूल इथे अध्यापकाची नोकरी धरली. दिवसा चित्रकलेचे शिक्षक म्हणून शाळेत काम करायचं व संध्याकाळी घरी त्याच विषयाची शिकवणी, असा त्यांचा दिनक्रम असे. शाळेतल्या पगाराला तेवढीच जोड! संध्याकाळच्या शिकवणीवर्गात खास करुन उच्च वर्गातल्या महिलांचा समावेश असायचा. सनदी अधिकार्यांच्या मुली, बायका... वेळ घालवायचं साधन म्हणून चित्रकला शिकायला येत. मनजीतने अबनीबाबूंच्या वर्गात नाव घातल्यानंतर त्याला वाटायला लागलं की, आपले गुरु त्या बायकांच्या कामाकडेच जास्त लक्ष देतात... माझं काम फारसं बघतही नाहीत, किंबहुना माझ्याकडे काहीसं दुर्लक्षच करतात. परंतु खरी परिस्थिती अशी होती की, मनजीतमधल्या चित्रकलागुणांची, त्याच्या कौशल्याची अवनीबाबूंना पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ते त्याच्या प्रगतीचं दुरुन निरीक्षण करु इच्छित होते... कलामार्गावरची वाटचाल त्याची त्याला करू देऊ पहात होते.. त्याला एखादी सूचना द्यावीशी वाटेल तेव्हाच ते मध्ये पडायचे...
काम करवून घेण्याच्या बाबतीत मात्र अबनीबाबू अतिशय कडक होते. त्यांनी मनजीतला त्यांच्या संग्रहातली सर्व कलाविषयक पुस्तकं नजरेखालून घालायला लावली. उद्देश हा की जगभरातल्या महान चित्रकलामहर्षींची त्याला ओळख व्हावी! मनजीतने बहुधा त्यांच्याकडेच प्रथम लिओनार्दो दा विंची, रॅफेल रुबन्स, मोने, मातिस ह्या व इतर दिग्गजांबद्दल ऐकलं होतं. मास्टरमोशाय मनजीतला अतिशय कठीण असे स्वाध्याय देत असत. दुसरं असं की नेमून दिलेलं काम पूर्ण करण्याकरता त्याला अवधी मिळायचा तोही अगदी थोडा! काम आणि कामाचा अवधी नेहमीच व्यस्त प्रमाणात...उदा. एका दिवसात पन्नास रेखाकृती बनवून देणं. एकदा तर कमालच झाली. मनजीतला एका आठवड्याच्या आत दोनशे रेखाटने करण्याची गुरुची आज्ञा मिळाली. विशेष म्हणजे ही दोनशेच्या दोनशे चित्रं काढायची होती एकाच विषयावर- अश्वराज अर्थात घोडे! मग काय मनजीतने सरळ जाऊन जवळपासच्या एका तबेल्यात मुक्काम ठोकला. टांगेवाले रात्री काम आटोपून आपले घोडे तिथे बांधण्याकरता आणत असत. काम संपवून आल्यामुळे ती मंडळी विड्या फुंकत गप्पा मारत बसलेली असायची. मनजीतचं काम मात्र तेव्हा कुठे सुरू व्हायचं... उकिडवा बसून तो एकापाठोपाठ एक चित्र बनवत राहायचा. तबेल्यात कंदील लावलेले असायचे, त्या कंदिलाच्या उजेडात भिंतीवर गूढशा सावल्या पडायच्या. दिवसभराचे थकलेभागले घोडे चूपचाप, गळून गेलेल्या अवस्थेत उभे असायचे. तिथे कुणीतरी अनोळखी व्यक्ती येऊन बसली आहे ह्याचा मात्र त्या प्राण्यांनी जराही बाऊ केला नाही. मनजीतला दिलेली एक आठवड्याची मुदत संपायच्या आधीच त्याला त्या घोड्यांची नावं, त्यांच्या खाण्याच्या आवडी सगळं माहीत होऊन गेलं. घरून तो खास त्यांच्याकरता खायला म्हणून गाजर, चणे वगैरे घेऊन जायचा.
मनजीतने रात्रीचा दिवस करून चित्रं काढली अन् आपल्या गुरुंकडे नेली - पण छे! मास्टरमोशाय त्याच्या मेहनतीमुळे जराही प्रभावित झाले नाहीत, उलट चित्रांच्या कागदांची चळत तुच्छतेने लाथाडून ते म्हणाले, "ही जेमतेम एकशे ऐंशी चित्रं आहेत, मी सांगितलेल्या पेक्षा वीस चित्रं कमी! आणि हे काय घोड्यांचे पाय की काठ्या! इतके दुबळे आणि बारीक?" आठवड्याभराची मनजीतची मेहनत धुळीस मिळाली अन् तीही अख्ख्या वर्गासमोर...त्याचा चेहरा शरमेने लालेलाल होऊन गेला. काही वेळाने बाकीचे विद्यार्थी गेल्यावर जरा बिचकतच तो मास्टरमोशायकडे गेला आणि त्याने सांगितलं की त्यांनी सांगितल्यापेक्षा वीस चित्रं कमी होती खरी, पण इतके जास्त कागद खरेदी करू शकण्यासारखी त्याच्या घरची परिस्थिती नव्हती त्यामुळे त्या संदर्भात काही करणं जरा अवघड होतं परंतु घोड्यांचे पाय रेखाटण्याचं योग्य तंत्र मात्र त्याला नक्की शिकून घ्यायचं होतं...अबनीबाबूंनी लगेच त्याला सल्ला दिला की, कुठल्याही प्राण्याचं चित्र काढताना त्याचे पाय अतिशय महत्त्वाचे असतात...ते संपूर्ण चित्र 'पाया'वर आधारलेलं असतं. शब्दशः मनजीतला चित्रकलेतला पहिला धडा मिळाला तो असा...जो त्याच्या मनात कायमचा कोरला गेला. आपण जर पूर्ण शरीर रेखाटणार असलो तर पायाकडून सुरुवात करावी, जर फक्त चेहराच चितारायचा असेल तर मात्र डोक्यापासून. त्यांनी शिकवलेल्या धड्याचं प्रात्यक्षिक सुरू झालं होतं. त्यांनी प्रथम मागचे आणि पुढचे पाय त्यानंतर धड आणि शेवटी शीर अशा क्रमाने ते चित्र पूर्ण केलं, पण हा केवळ पहिला धडा होता. पुढचे काही दिवस ह्या विषयावरचे त्याचे पाठ चालूच राहिले.
कागद खरेदी करण्याची मूळ समस्या मात्र 'जैसे थे'च होती. त्या काळात एक रुपयात दहा कागद मिळत असत. म्हणजे दहा पैशाला एक! चित्रकलेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मनमोहन दर महिन्याला मनजीतला वीस रुपये देत. त्या मानाने महिनाभराच्या कागदांची किंमत बरीच जास्त होती. कधीकधी वरखर्चातून वाचवून बीजी पंधरा रुपये देत. तेवढ्यात त्याला आपला खर्च भागवायचा असे. पैसे सिनेमा, पाणीपुरी ह्यांवर खर्च करायचे का चित्रकलेकरता...पण तोवर मनजीतचा विचार पक्का झाला होता. त्याने मिळतील ते पैसे चित्रकला साहित्यावर खर्च करायला सुरुवात केली. मास्टरमोशायच्या वर्गांना जाणंही त्याला खूपच आवडत असे. बाकीचे विद्यार्थी आठवड्यातून तीनदा जात, मनजीतची मात्र रोजची हजेरी असे. कधीकधी नवं नवं काढलेलं चित्र गुरुंना दाखवायला फक्त म्हणूनही तो जात असे. दुसर्या दिवसापर्यंत थांबणार कोण! गुरुंपुढे आपली कला सादर करायला त्याचं मन अगदी अधीर झालेलं असे.
अबनीबाबू आपल्या विद्यार्थ्यांना प्राणिसंग्रहालयात, शहरातल्या प्राचीन स्मारकांकडे आवर्जून घेऊन जात. उद्देश हा की त्यांनी वास्तवातून कलानिर्मिती शिकावी! आपल्या स्टुडिओमध्ये ते प्रात्यक्षिकांद्वारे स्थिर, एका जागी बसलेल्या मॉडेलवरून चित्रनिर्मिती कशी करावी हे अत्यंत कुशलपणे समजावून देत. त्यांनी मनजीतला केवळ चित्रकलाच शिकवली असं नाही; त्यांनी त्याला जीवन, तत्त्वज्ञान आणि संगीत ह्यांसंबंधी ज्ञानदेखील दिलं. अबनीबाबूंचा मोठा मुलगा रंजन त्यावेळी दिल्लीच्या हिंदू कॉलेजात शिकत होता. त्याची आणि मनजीतची एकदम छान दोस्ती जमली. ते एकत्र बसून पेंटिंग करायचेच शिवाय मोकळा वेळही एकमेकांच्या संगतीत घालवायचे. मात्र त्यावेळी मनजीत चित्रकलेच्या क्षेत्रात नवखा होता, तर रंजन मात्र त्याच्या मानाने बराच पुढे...त्यामुळे रंजन मनजीतसमोर आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याच्या जोरावर भरपूर भाव खात असे. मनजीत त्यावेळीतरी त्याच्यापेक्षा वरचढ होऊ शकत नव्हता. पंजा लढवण्यात मात्र मनजीत त्याला लीलया हरवायचा...त्याच्या हातातल्या ताकदीमुळे त्याचं नाव लोहासिंग असं पडून गेलं. पोलादी पुरुष जणू! अबनीबाबूंनी दोघांना एक जबाबदारी दिली होती. प्रात्यक्षिकांच्या वर्गाकरता मॉडेल म्हणून काम करू इच्छिणार्या व्यक्ती शोधण्याची...इथेही मनजीतचंच पारडं जड ठरायचं. कारण रंजनची बोलण्याची ढब अशी काही होती की कुणी त्याच्या बोलण्याकडे, विनंतीकडे जराही लक्ष द्यायचं नाही. मनजीत मात्र मॉडेल पटवण्यात तरबेज होता. कधी एखाद्या साधूबाबांना तर कधी रस्त्यावरच्या एखाद्या बघ्याला घेऊन यायचा. फक्त दोन रुपये मोबदल्यात!
थोड्याच काळात मनजीत अबनीबाबूंचा आवडता विद्यार्थी बनला. मनजीतकडे अंगुलीनिर्देश करून ते इतर विद्यार्थ्यांना सांगत, "पाहिलंत कसा तन-मन हरपून काम करतोय ते? तुम्ही पण असंच केलं पाहिजे...तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण तुमच्या चित्रातल्या विषयाकरता जगला पाहिजे. तुमचे शंभर टक्के प्रयत्न चित्र काढण्याकरता दिले पाहिजेत..." कधी असं कौतुक मनजीतच्या पदरी पडायचं तर कधी त्याची चित्रं पाहिजे तितकी चांगली बनली नाहीत म्हणून त्याला बोलणी बसायची, पण तोवर मनजीतही आपल्या गुरुंना चांगलं ओळखू लागला होता. त्यांचा खराब मूड सुधारायला मग तो तिथल्या जुन्या रेकॉर्ड प्लेअरवर त्यांची आवडती गाणी वाजवत (लावत) असे, की मग गुरुजींचा मूड ठीक व्हायचा. मुझे बता रे साकी.../मेरा चैन गया/मेरी नींद गयी...अबनीबाबूंच्या रागावरचा हा रामबाण उतारा.
मनजीतचे अबनीबाबूंकडचे वर्ग असे चालू असताना त्याच्या कुटुंबाने पुन्हा एकदा घर बदललं अन् सर्व मंडळी राजाबझार विभागात राहायला आली. सरकारी नोकरीतल्या इक्बालचं हे नवं सरकारी निवासस्थान. घर कसलं बंगलाच होता तो. राहायची जागा फारशी मोठी नसली तरी आजूबाजूला आवारात खूपच मोकळी जागा होती. झाडांची, बागकामाची आवड असणार्या मनजीतला ही पर्वणीच! घरातली बाकीची मंडळी घर लावण्यात व्यस्त होती, बीजी स्वयंपाकघरावर लक्ष केंद्रित करून होत्या...घरचं जेवण लवकरात लवकर सुरू व्हावं म्हणून - त्या वेळी मनजीतचं लक्ष होतं बाग फुलवण्याकडे.
एका आठवड्यात त्याने जवळच्या फळबागांतून रोपं आणून बागेत लावूनसुद्धा टाकली. मोसंबी, डाळिंब, केळी, पेरू, पपई...अगदी आंब्याचे झाडसुद्धा लावलं त्याने. शिवाय जोडीला फुलझाडंही लावली होती. पण काही काळाने लक्षात आलं की त्याच्या भरपूर मेहनतीनंतरसुद्धा (किंवा कदाचित मेहनतीमुळेच) पेरू आणि केळ्यांशिवाय कुठल्याच झाडांना फळं लागली नाहीत. पण केळ्याचं झाड मात्र सर्वांगाने बहरलं होतं. केळ्याचं झाड तर लगडलं होतंच, पण केळफुलंही येऊ लागली होती. केळफुलांची भाजी ही तर बंगाली स्वयंपाकातली खासियत. अबनीबाबूंच्या पत्नीने त्याला बंगालच्या पदार्थांची आवड, गोडी लावली होती. त्यामुळे मनजीत ती केळफुलं अबनीबाबूंच्या घरी पोचवत असे. शिवाय केळ्याच्या झाडाचं खोड आणि कच्ची केळीसुद्धा. बर्याच वर्षांनी त्या घरावरून जायचा त्याला योग आला. पाहतो तो काय - त्याने ज्या झाडांना फळं येण्याची आशासुद्धा सोडून दिली होती, ती झाडं झक्कपैकी फळांनी लगडलेली दिसत होती अन् एकदम त्याच्या ध्यानात आलं, ते घरही आता दुसर्या कुणाचंतरी होतं आणि ती झाडंही...
***
२९ नोव्हेंबर १९२८ला राणी महलानोबिस ह्यांना लिहिलेल्या पत्रात रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं, "आजकाल बाहेर फिरताना मी डोळे उघडे ठेवून भोवतालच्या, विविध आकाराच्या दुनियेतल्या गोष्टी देखील टिपत राहतो...तेव्हा सगळीकडे रेषांचंच राज्य दिसतं. झाडांकडे बघितल्यावर देखील इतके विविध आकार, रेषा, सापडत जातात. मला आता हे ध्यानात आलंय की, सृष्टीचा हा पसारा म्हणजे विविध आकारांची एक दिंडीच आहे जणू! माझ्यातल्या कलावंताची लेखणी निसर्गातल्या ह्या विविध आकारांचा खेळ पुन्हा काबीज करू पाहते... कुठल्याही भावनोद्दीपक किंवा बुद्धीवादी पद्धतीने नाही तर केवळ ह्या आकारांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने!"
आपल्या भावाच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून मनमोहन सर्व प्रयत्न करू इच्छित होते. रमणीय भूप्रदेशांची चित्र रेखाटण्याचा अनुभव घेता यावा म्हणून कधी ते त्याला दिल्लीबाहेर सूरजकुंड इथे घेऊन जायचे, तर कधी उत्कृष्ट वास्तुरचना कागदावर चितारण्याचा सराव व्हावा म्हणून कुतुबमिनारला. कधीकधी तर दोघं भाऊ मिळून दिल्लीबाहेर इतर राज्यांतही सायकलीवरून भ्रमंतीला निघायचे. कधी वाळवंटाचा अनुभव, कधी जंगलातली दृश्यं, तर कधी पर्वतराजींची व्याप्ती कागदावर उतरवत त्यांचा प्रवास चालू असायचा. ह्यामुळेच की काय, एक चित्रकार बनण्याकरता निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, निसर्गातील विविध रंगांचा अनुभव घेणं फार महत्त्वाचं आहे, हे मनजीतला कलासाधनेच्या सुरूवातीच्या काळातच ध्यानात आलं होतं.
रभातसमयी, शांत निर्मनुष्य रस्त्यांवरून सायकलीची रपेट करण्यात मनजीतला काही वेगळाच आनंद मिळत असे. पक्ष्यांची गोड किलबिल आणि सायकलच्या टायर्सचा 'स्स, स्स' असा तालबद्ध आवाज एवढं सोडलं तर बाकी सारं कसं शांत शांत असायचं. अंधाराचं साम्राज्य पूर्णपणे संपलेलंही नसायचं. मनजीतच्या सायकलफेरीची सुरुवात त्याही आधी झालेली असायची. मनजीतच्या सायकलवरचा दिवा अंधार्या रस्त्यावर जणू एक प्रकारचं तेजोमंडल तयार करत असे, अन् मनजीत त्या मंडलाचा पाठलाग करत पुढे पुढे जात असे. एकदा का सूर्यबिंब उदयाला येऊ लागलं की आजूबाजूचा देखावा एकदम बदलून जायचा. नाटकाच्या फिरत्या रंगमंचावर कसा झटकन बदल होतो तसा. अंधाराच्या गडद रंगांची जागा आता वेगवेगळ्या प्रसन्न रंगांनी घेतली जायची...तांबडं फुटलेलं आकाश, हिरवीगार भातशेती, निळ्या-करड्या रंगाचं क्षितिज... रंगांची ही निसर्गदत्त उधळण मनजीतला मोहवून टाकायची. अगदी तरूण वयात पाहिलेले हे रंग पुढे त्याच्या आयुष्यात अजूनच गडद होत गेले...प्रात:काळच्या त्या स्वच्छ, ताज्या मोकळ्या हवेत मनजीतच्या चित्तवृत्ती बहरून जात असत...त्याला एक सुखद आनंदानुभव मिळत असे. दिवस वर येऊ लागला की मग तो जरा सावलीची जागा शोधून नाश्त्याकरता दलिया बनवायचा अन् पोटपूजा झाली की भराभर आजूबाजूच्या देखाव्यांनी स्केचबुक भरायला सुरूवात करायचा. त्याच्या ह्या चित्रांत एक खास शैली आढळते. रंग आणि प्रकाशाचं तंत्र वापरून चित्राचा विषय फक्त व्यक्त करण्याच्या ह्या तंत्रात चित्रातले छोटे मोठे बारकावे दाखवले जात नाहीत, परंतू चित्रविषयाचा परिणाम मात्र पुरेपूर असतो. त्याच्या ह्या चित्रांतून अगदी उंच माडांवर बसलेले लाल शेपटीचे पोपट, मैना, सुतार हेदेखील चितारले जायचे. निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेलं हे दान मनजीत भरभरून घेत असे...संध्याकाळ्च्या वेळी ’घराकडे आपुल्या’ निघालेल्या पक्ष्यांच्या कूजनाने वातावरणात एक प्रकारचं मधुर संगीत गुंजत राहायचं, त्यावेळी मनजीत आपली पथारी पसरून आकाशाकडे टक लावून पाहत राहायचा. अगदी अंधाराचं साम्राज्य पसरून तारका त्या कृष्ण्पटलावर दिसू लागेपर्यंत.
निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा, सायकलीवरून भटकत नवनवे देखावे टिपत राहण्याचा आणि त्यांना कागदावर उतरवण्याच्या सवयीने लवकरच मनजीतचं आयुष्य व्यापून टाकलं. बरेचदा तो एकटाच सायकल काढून निघायचा किंवा कधीकधी रंजनला बरोबर चलण्याचा आग्रह करायचा. दिवसभर पेडल मारत ते सायकलवरून फिरत राहायचे...मध्येच पोटपूजेला थांबायचे. साधी डाळ तांदुळाची खिचडी किंवा दलिया असं काहीतरी बनवायचं, खायचं की झालं पुन्या सायकलींवर स्वार. दिवसभराच्या रपेटीने दमले भागलेले ते जीव रात्रीपुरता एखादा गुरुद्वारा शोधायचे. गुरुद्वारातल्या सेवकांचा मनजीतला खूप चांगला अनुभव येत असे. ह्या प्रवासी दुकलीशी ते खूपच आपुलकीने वागत. त्यांना गरमागरम दाल-रोटी खाऊ घालत. कधीकधी तर शिरासुद्धा असायचा. जेवताजेवता मनजीत आपल्या भटकंतीच्या कहाण्या सांगून त्यांचं मनोरंजन करत असे. जेवणानंतर सेवकांपैकी कुणीतरी खोली दाखवून द्यायचे अन् मग हे श्रांत जीव अंथरुणावर अंग टाकून द्यायचे... की संपला दिवस!
हे सायकल भ्रमंतीचे दिवस मनजीतच्या चांगलेच आठवणीत राहिले. अशीच एक संस्मरणीय सायकल यात्रा होती आग्रा-मथुरा-वृंदावनाची! त्या वेळी रंजनचे मामादेखील ह्या दोघांबरोबर जायला निघाले. मात्र त्यांचा वेष सायकल प्रवासाकरता काहीसा विसंगत होता. त्यांनी सूट घातला होता. असो. मनमोहननी हातखर्चाकरता म्हणून मनजीतला पंचाहत्तर रुपये देऊ केले होते, पण मनजीतने त्यातले घेतले फक्त पंचवीस आणि त्यातूनही प्रवासाच्या शेवटी सात रुपये वाचवून परत आणले होते. कमीत कमी खर्चात गुजराण करण्याचं तंत्र त्याला तोवर आत्मसात झालं होतं. अर्थात गुरुद्वारातल्या आणि गावातल्या लोकांच्या पाहुणचारामुळे एक झालं की त्याला कधीही भुकेलं राहावं लागायचं नाही आणि काही नाही तर त्याचं स्वतःचं फिरतं स्वयंपाकघर त्याच्याबरोबर असायचंच. स्टोव्ह, रॉकेल, डाळ, तांदूळ, मीठ-मसाला... जवळपासच्या शेतातल्या भाज्या मिळायच्या. मुळे, गाजर, पालक, मटार ह्यातलं काहीतरी घालून छानपैकी खिचडी, पुलाव बनवायचा अन् फस्त करायचा हा झकास पर्याय होताच. त्यामुळे स्वस्त, मस्त आणि पौष्टिक जेवण तयार व्हायचं, अगदी थोड्या वेळात!
सायकलवरून फिरताफिरता मनजीतला इतक्या गोष्टी पाहायला मिळायच्या... भातशेती, कुरणांत चरणार्या गाई, ओढ्यातल्या पाण्यात डुंबणार्या म्हशी, वनराई, खेडी... सृष्टीतला खजिनाच जणू त्याच्यासमोर खुला व्हायचा अन् मग त्याच्या लक्षात आलं की ह्या चराचर सृष्टीत विविध आकार, विविध रचना, विविध रुपांतून अस्तित्वात आहेत आणि त्यांचा शोध आपण घ्यायला पाहिजे. ह्या खजिन्यातून आपल्याला बरंच काही सापडण्याची शक्यता आहे. त्याच्याही नकळत ह्या प्रवासातून, भ्रमंतीतून त्याच्या मनातल्या चित्रमय जगतात विविध प्रतिमांची सतत भर पडत गेली अन् पुढच्या काळात प्रतिमालेखनाद्वारे मनजीतच्या कलाकृतींतल्या अस्थिविरहीत, फुगीर आकारांतून ह्या प्रतिमा पुन्हा पुन्हा सामोर्या येत राहिल्या. कमनीय आकारांच्या संकेतानुसार काढलेल्या चित्रांतून पुढे बर्याच वर्षांनी ह्या प्रतिमा आढळत गेल्या... कधी गाय, कधी शेळी, कधी खार आणि अगदी कावळ्याच्या चित्रांतूनसुद्धा... आणि त्यांतून मानवातल्या कमतरता, वैगुण्यंसुद्धा प्रतीत होत राहायची. कधी हे प्राणी आळसटलेले दाखवले गेले, तर कधी अवखळ तर कधी खोडकर... कधी चंद्रकोर शंकराच्या जटांमधून दाखवली जायची आणि चित्रातले प्रकाशमान वृक्ष कुठल्या तरी अगम्य सुरावटीवर झुलतायत असं वाटायचं.
***
मनजीतच्या कलाकृतींतून त्याने कृष्णाला विविध रुपांत आणि विविध प्रकारांनी चित्रीत केलं आहे. त्यामुळे पंजाबबाहेरचा मनजीतचा पहिला लांब पल्ल्याचा प्रवास हा ब्रजभूमीचाच घडावा हे विधिलिखित असावं असं वाटतं. दंतकथेनुसार साडेतीन हजार वर्षांपूर्वी कृष्णाने ह्याच भूमीत जन्म घेतला होता, त्यामुळे कृष्णभक्तांकरता हे एक पवित्र तीर्थस्थानच मानलं जातं अन् ब्रजभूमीची यात्रा म्हणजे एक महत्त्वाची तीर्थयात्रा! बाळगोपाळाच्या लीलांनी फक्त त्याच्या भक्तांवर मोहिनी घातली असंच नाही तर कलावंतांकरता, शिल्पकारांकरताही ते निळंसावळं रूप एक प्रेरणास्थान बनलं आहे. भारतातल्या कलाविश्वात कृष्ण हा विविध रुपांतून व्यक्त केला गेला आहे. कधी दूध-लोणी चोरून खाणारा गुटगुटीत बाळगोपाळ, कधी राधेचा साथीसांगाती तर कधी गोपिकांना छेडणारा नटखट कन्हैया...
मनजीत बामिनीबरोबर कधी जन्माष्टमीच्या उत्सवाकरता तर कधी इतर कुठल्या प्रसंगी देवळात जात असे. त्यावेळी तिच्याकडून त्याने मथुरेबद्दल बरंच काही ऐकलं होतं. त्यामुळे मथुरेत आणि वृंदावनात फिरताना तिथले घाट, साधीशी घरं, देवळं, बाजार हे सगळं पाहताना साहजिकच त्याला ते सगळं आठवत होतं. विश्राम घाट, द्वारकाधीशाचं देऊळ आणि गोविंददेव मंदिर पाहिल्यावर त्याला बाबूजींच्या मांडीवर बसून ऐकलेल्या पुराणकथांची आठवण झाली आणि यमुनेच्या काठावरून तिचं विस्तीर्ण पात्र पाहताना तर कालियामर्दनाचा देखावाच त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
पुढील काही वर्षांत कृष्ण हा मनजीतच्या रेखाटनांचा एक स्थायीभाव बनून गेला. कधी बासरी वाजवणारा, कधी गायी हाकणारा, तर कधी एक प्रेमिक... ह्या आणि अशा असंख्य विविध रुपांतून मनजीतच्या चित्रांतून व्यक्त होत गेला. एका चित्रात तर त्याने कृष्णाला उताणं पडलेला, एका बाणामुळे प्राणघातकपणे जखमी झालेला अशा रूपातही दाखवला होता. मथुरा-वृंदावनच्या यात्रेत मनजीतच्याही नकळत त्याच्या मनात वेगवेगळी दृश्यं आणि प्रतिमा इतक्या प्रभावीपणे, कायमच्या ठसल्या गेल्या की त्याच्या कलाकृतींमध्ये त्या प्रतिमांना एक वेगळं स्थान मिळत गेलं.
अशा ह्या अनुभवसंपन्न यात्रेनंतर मनजीत मथुरेहून निघाला अन् अचानक सोसाट्याचा वारा सुटला. भराभर पेडल मारत मनजीत पुढे काय करायचं ह्या विचारात जात असतानाच थोड्या अंतरावर एका ढाब्याचे दिवे दिसले. त्या साध्याशा जागेत पोचल्यावर त्याला त्याच्याच वयाचा एक मुलगा ट्रकमधून सामानाची ने-आण करताना दिसला. सायकल एका कडेला लावून मनजीत त्या मुलाकडे गेला. तो बहुधा ट्रकचा क्लीनर असावा. जवळ कुठे एखादा गुरुद्वारा आहे का अशी मनजीतने चौकशी करताच त्या मुलाने ढाब्याच्या आतल्या बाजूला अंगुलीनिर्देश केला आणि 'त्यांना विचारा' इतकंच बोलून तिथून पळाला. मनजीतला रात्री राहण्याची सोय करायची होती म्हणून त्या मुलाने सांगितल्यानुसार तो आतल्या बाजूला 'त्यांना' विचारायला गेला. आत 'ते' बसले होते. एक उंच, धिप्पाड, राजेशाही व्यक्तिमत्त्वाचे सरदारजी! पांढर्या शुभ्र कपड्यातल्या सरदारजींची पगडीच काय दाढीसुद्धा पांढरीशुभ्र होती... मनजीतचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं अन् काहीशा उग्र, चिडखोर आवाजात बोलून त्यांनी रात्रीपुरती ढाब्यात जागा देऊ केली... थोड्याच वेळात कुणीतरी मनजीतला ग्लासभर गरम दूध आणि नंतर दाल-सब्जी-परोठा असं जेवणही आणून दिलं. सरदारजी मात्र गप्प होते. एकही शब्द न बोलता ते जवळची व्हिस्कीची बाटली रिकामी करण्याच्या मागे लागले होते. दुसर्या दिवशी सकाळी निघायच्या वेळी पुन्हा तो आदल्या दिवशीचा मुलगा मनजीतला भेटला. त्याच्याकडून आग्र्याला जाण्याचा रस्ता विचारून घेऊन मनजीतने आदल्या रात्रीच्या जेवणाचे पैसे देऊ केले तेव्हा जोरजोरात मान हलवत तो मुलगा म्हणाला, 'साब, मना किया|' ही झाली मथुरेतली कथा... मनजीतचा पुढचा थांबा होता फतेहपूर- सिकरीला- अन् तिथे त्याच्याकरता वेगळंच स्वागत वाढून ठेवलेलं होतं.
धो धो पाऊस पडत होता त्यामुळे मथुरेहून फतेहपूर सिकरीचा प्रवास खूपच अवघड झाला होता. नखशिखांत भिजलेल्या अवस्थेत तसाच पेडल मारत मनजीत रस्ता कापत जात होता. गारठलेल्या, चिंब भिजलेल्या त्या अवस्थेत त्याला फक्त झोपायला स्वच्छ अंथरूण आणि घालायला स्वच्छ, कोरडे कपडे ह्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. काही वेळातच समोर एक डाकबंगला दिसू लागला अन् त्याला काहीसं हुश्श झालं... पावसात अडकलेल्या प्रवाशाला ह्यापरतं सुंदर दृश्य ते काय असणार? डाक बंगल्याचा दरवान त्याला आत घेणार इतक्यात मागून कुठल्या तरी गाडीच्या टायर्सचा कर्कश्श असा आवाज आला.. मनजीत वळून पाहतो तो तिथे एक जीप आलेली दिसली. एक पोलीस अधिकारी खाली उतरला आणि अतिशय कडक स्वरात त्याने मनजीतला पोलीस ठाण्यात चलण्याची आज्ञा दिली. मनजीतने स्वतःची परिस्थिती, सत्य परिस्थिती अधिकार्यापुढे कथन केली. शेवटी बर्याच स्पष्टीकरणानंतर अधिकार्याची खात्री पटली की हा कुणी उडाणटप्पू मुलगा नसून सायकलीवरुन भ्रमंती करणारा एक तरुण प्रवासी आहे आणि मनजीतची सुटका झाली. ते साल होतं १९५८. त्या काळात मनजीतसारखे साहसी, धाडसप्रिय प्रवासी वीर फारच कमी असायचे. पोलीस अधिकार्याचा गैरसमज झाला होता तो याच कारणामुळे!
डाक बंगल्यातल्या दरवानाने मात्र मनजीतचं अगदी छान आदरातिथ्य केलं. स्वतःकरता बनवलेली दाल-रोटी त्याने मनजीतला खाऊ घातली. बंगल्यात त्या दिवशी इतर कुणी वास्तव्याला आलेलं नव्हतं त्यामुळे मनजीतला रात्रीपुरती एक खोलीही चटकन मिळून गेली. दरवानाच्या प्रेमळपणामुळे आणि दयाळू वृत्तीमुळे, त्याच्या आदरातिथ्यामुळे मनजीत अगदी भारावून गेला. डाक बंगला सोडताना दरवानाला काहीतरी द्यावं असं त्याच्या मनात होतं अन् त्याने दिलंही पण पैशाच्या रुपात नव्हे! मनजीतनी त्याला इतर कुणी देणार नाही अशी अनोखी भेटवस्तू दिली... दरवानाचं स्वतः काढलेलं पोर्ट्रेट!
दुसर्या दिवशी सकाळी हवा एकदम बदलून गेली होती. आदल्या रात्रीच्या पर्जन्यवृष्टीनंतर आकाश स्वच्छ, निरभ्र झालं होतं. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात फतेहपूर सिकरी न्हाऊन निघालं होतं. ते दृश्य अतिशय सुंदर होतं.
पाहणार्याचे डोळे दिपवून टाकेल असं! तटबंदींनं सुरक्षित केलेलं हे शहर १५७१ ते १५८५ ह्या काळात, अकबर बादशहाच्या कारकिर्दीत, मुघलांचं राजधानीचं शहर होतं. फतेहपूर सिकरीचा प्रसिद्ध दर्गा म्हणजे पवित्र अवशेषांवर बांधलेली एक समाधी आहे. ह्या वास्तूत पर्शियन आणि हिंदू नक्षीकामाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. अकबर बादशहाप्रमाणेच आजही अगणित भाविक शेख सलीम चिश्तींच्या ह्या दर्ग्यात येऊन अपत्यप्राप्तीकरता प्रार्थना करतात. तिथल्या संगमरवरी नक्षीदार जाळीवर बांधलेले लाल- पिवळे दोरे (मोली) तिथे येऊन गेलेल्या भक्तगणांच्या आशेचं विश्वासाचं प्रतीकच म्हणता येईल. मनजीत तिथे पोचला तेव्हा दर्ग्यात आणि आसपास अगदी शांतता होती. अजून कुणी भक्तगण आलेले नव्हते. तिथल्या परिसरात फिरत असताना कुठूनतरी हलकेच कव्वालीचे सूर त्याच्या कानावर पडत होते. थोड्या वेळाने भक्तांचा पहिला जथा दर्ग्याच्या दिशेने निघालेला त्याला दिसला. सूफी संत सलीम चिश्तींची स्तुतिगीतं गाणारा तो जथा पाहून मनजीतमधल्या कलाकारानं उचल खाल्ली... तिथेच एका दगडी चौथर्यावर बसून त्याने भराभर रेखाचित्रं काढायला सुरुवात केली. तिथलं वातावरण, दृश्य कागदावर उमटलं ते कोळशाचा वापर करुन काढलेल्या चित्रांच्या रूपात. त्यात दाढीवाले फकीर होते, सूफी गायक होते आणि अर्थात सिकरीतले भग्न अवशेषही. ऐतिहासिक महत्त्वाचं हे शहर ह्या तरुण चित्रकाराच्या मनावर खूप खोलवर प्रभाव करुन गेलं. मनजीतचा पुढचा थांबा होता आग्र्याला. अर्थातच तिथला ताजमहाल हे मुख्य आकर्षण होतं. सम्राट शाहजहानने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ सतराव्या शतकात बांधलेलं हे उत्कृष्ट स्मारक, त्याच्या प्रिय पत्नीची कबर... मनजीत तिथे पोचला तेव्हा सूर्यास्ताची वेळ झालेली होती. खरं तर आग्र्याला पोचेपर्यंतच्या प्रवासाने तो दमून गेला होता, परंतु ताजमहालचा सौंदर्याने त्याच्या मनाचा कब्जाच घेतला होता. ताबडतोब स्केचपुस्तिका उघडून त्याने ते सुंदर दृश्य त्यात उतरवलं... काही वेळापूर्वीचा थकवा तो विसरुनसुद्धा गेला होता.
प्रवाही, अधीरतेने काढलेल्या रेषांचे फटकारे हे त्या काळातल्या त्याच्या रेखाटनाचं वैशिष्ट्य. त्या चित्रांमधून कसली तरी तातडी, निकड, घाई व्यक्त होत आहे असं चित्र पाहिल्यावर जाणवतं. वयापेक्षा जास्त मोठ्या आवाक्यातले विषय चित्रांकरता निवडलेले पाहून त्याच्या मनाच्या अवस्थेचा अंदाज येऊ शकतो. आपलं मूलपण, नुकतंच सरलेलं बालपण मागे टाकून तरुणाईत जेमतेम प्रवेश केलेला मनजीत त्याहीपलीकडे जाऊन अधिक रोमांचक वाटणार्या प्रौढ जगातली आपली वाटचाल लवकरात लवकर सुरु करु पाहत होता.
मनातल्या अशा प्रकारच्या विचारप्रवाहामुळेच की काय अचानक त्याने आपली सायकल यात्रा आटोपती घेऊन घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मनाने चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन त्यातूनच स्वतःचं भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला होता, पण घरच्या मंडळींना हे विचार पटवून देणं हे त्याच्यापुढचं मोठं आव्हानच होतं, हे तो पक्कं जाणून होता. त्याला कारणही तसंच होतं. आग्रा-मथुरेच्या सायकल प्रवासाला निघण्याआधी त्याच्या परीक्षेचा निकाल लागला होता. त्याला मिळालेलं घवघवीत यश ही कुटुंबाकरता अतिशय आनंदाची गोष्ट. त्याची ताई निर्मला आणि जिजाजींनी ह्या निमित्ताने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या वेळच्या प्रथेनुसार त्यांनी ती पार्टी जवळच्या - धुरीच्या - रेल्वेस्टेशनच्या कँटीनमध्ये ठेवली होती. धुरी स्टेशनावरून अगदी कमी गाड्यांची ये-जा असे आणि दोन गाड्यांच्या वेळात बरंच अंतर असे. त्यामुळे बरेच वेळा स्थानिक लोक समारंभाकरता त्या कँटीनचा वापर करत. कारण त्या काळात हॉटेलं, रेस्टॉरंट्स फारशी नसायची आणि दुसरा पर्याय होता ढाब्याचा...परंतु तिथे असे समारंभ वगैरे साजरे करणं जरा कमीपणाचं मानलं जाई. त्यामुळे मित्र परिवार, कुटूंबातले सदस्य, नातेवाईक ह्यांच्याबरोबर ’एक शाम मस्तानी’करता कॅंटीन अगदी सुयोग्य ठरायचं! मद्य आणि सामिष पदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यजमानांची असायची, बाकी सर्व इंतजाम म्हणजे जेवण, काटे-चमचे, टेबलं खुर्च्या असं सगळं पुरवण्याची जबाबदारी कॅंटीनची !
ताई आणि जिजाजींनी दिलेल्या त्या पार्टीत त्यांचा सगळा मित्रपरिवार उपस्थित होता. सगळेजण ’साला बाबू’ अर्थात मेहुण्याची म्हणजे मनजीतची भरपूर थट्टा करत होते. काही काळापूर्वी हाच मनजीत धुरीला ताईकडे राहत असताना त्याची उनाड बहकलेला अशी कीर्ती त्या मंडळींच्या कानावर गेली होती. तेव्हाचा मनजीत आणि त्या दिवशीचा यशश्री खेचून आणणारा मनजीत या दोघांतला फ़रक पाहून पाहुणे स्तिमित होऊन गेले होते...त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पार्टी मजेत चालू होती. परंतु उत्सवमूर्ती मनजीतच्या मनात मात्र प्रचंड खळबळ चालू होती, तो विचारात गढला होता. ह्यापुढच्या काळात कुटुंबियांची त्याच्याकडून काय अपेक्षा होती त्याला चांगलं माहीत होतं. योग्यसा अभ्यासक्रम निवडून, शिक्षण पूर्ण करून त्याने चांगली कमाई करावी आणि उदरनिर्वाह चालवावा. इकडे मनजीतचं मन चित्रकलेच्या क्षेत्राकडे झेपावरत होतं...त्याच्या कुटुंबातला, अशा प्रकारच्या कल्पना उराशी बाळगणारा, मळलेली वाट सोडून नव्या मार्गावर चालू पाहणारा तो एकटाच...आजवर कुणीच त्या रस्त्याने गेलं नव्हतं.
सायकलचे पेडल मारत मारत दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना अचानकपणे काळ्या मेघांनी आकाशात गर्दी केली...मनजीतच्या मनातल्या भावनांचे गडद रंगच जणू आकाशात उमटले होते अन् काही वेळातच ’कोसळती धारा’चं सत्र सुरू झालं. अरुंद रस्ते, वाटेवरची शेतं तळी सगळं त्या धारांमुळे भरून गेलं. पावसाचा जोर इतका जास्त होता की चक्क तीन बसेस पाण्यात अडकल्या होत्या. आतल्या चालक आणि प्रवाशांचं धाबं दणाणलं होतं. ह्या पुरात वाहून जाण्याच्या भीतीने सगळेजण गारठले होते. रस्ते दुथडी भरून वाहू लागले होते. मनजीतच्या स्वभावातला फ़ाजील धीटपणा त्याला फ़ार काळ रस्त्याच्याकडेला थांबवून ठेवू शकला नाही. पाउस जऽऽरा कमी होतोय न होतोय तोच हा वीर पाण्याच्या तळ्यातून पलीकडे जायला निघाला. फरक एवढाच होता की सायकलीवर स्वार होण्याऐवजी तो सायकल हातात घट्ट धरून चालत होता.
अत्यंत अवघड असा तो प्रवास शेवटी एकदाचा संपला. त्यापैकी शेवटचं दीडशे कि.मी. अंतर पार करायला मनजीतला सतरा तास लागले होते. ह्या सगळ्या प्रवासाच्या रंजक रोमांचक साहसकथा रंजनला सांगितल्याशिवाय त्याला राहवेना. त्यामुळे घरी बीजी-बाबूजींना भेटायला न जाता प्रथम त्याने रंजनचं घर गाठलं तेव्हा कुठे त्याला जरा बरं वाटलं. त्यातून प्रत्येक कहाणीगणिक रंजनच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे, कौतुकाचे भाव बघून तर त्याला अगदी सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं, मूठभर मांसच त्याच्या अंगावर चढलं होतं जणू! खरं तर मनजीतला असं स्वत:च स्वत:ची परीक्षा बघणं, क्षमता आजमावून बघणं हे मनापासून आवडायचं आणि रंजनसारखा कौतुकाने सगळं ऐकणारा, बघणारा प्रेक्षकही!
ह्या भ्रमंतीतल्या विविध अनुभवांचा ठेवा त्याच्या पुढच्या आयुष्यात खूपच कामी येत गेला. भटकण्याची, फिरण्याची, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची ओढ लागलेला मनजीत, घराबाहेर कुठल्याही परिस्थितीत जमवून घेऊ शकत असे. कधी कुठल्या खेड्यापाड्यातून गावातून प्रवास करतानासुद्धा जराही न बिचकता तो एखाद्या गाववाल्याकडून काही मदत जरूर लागल्यास घेत असे...त्याचा शहरीपणा त्याच्या कधीच आड आला नाही कारण पूर्वीच्या अनुभवांनी त्याला खात्री दिली होती की, वेळ पडल्यास अगदी गरीब खेडूत देखील आपली मीठभाकर त्याच्याबरोबर वाटून खाईल. त्याच्या भ्रमंतीच्या अनुभवांचा दुसरा फायदा म्हणजे अगदी तरुण वयातच तो निडर, निर्भय बनून गेला...भिती त्याला जणू ठाउकच नव्हती कारण तो कायम फ़िरायचा रानावनात अन् तेही एकट्याने!
रंजनकडून घरी परतल्यावर मात्र त्याच्या लक्षात आलं की वारे जरा वेगळ्याच दिशेने वाहत होते. त्याला भविष्यात काय करायचा मानस आहे ह्याबद्दल मनमोहननी त्याच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्यांना मनजीतच्या भविष्याबद्दल काळजी होती. त्याला आपल्या आवडीचा मार्ग निवडता यावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. स्वत: मनमोहनना आणि दुसरे बंधू सुखदेवना शिक्षण सोडून नोकरी धरायला लागली होती. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीत आर्थिक आधार देणं त्यांना आवश्यक होतं, परंतु मनजीत आयुष्याच्या त्या टप्प्यावर येईपर्यंत परिस्थिती थोडीशी सुधारली होती. मनजीतच्या मनाचा ओढा कलाक्षेत्राकडे आहे ह्याची मनमोहनना पूर्ण जाणीव होती. शिवाय त्याचं चित्रकलेतलं कसबही त्यांनी ओळखलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी मनजीतच्या भविष्याबद्दलची चर्चा स्वत:च्या अंकुशाखाली ठेवली. ’मनजीत दिल्ली कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेणार आहे’ असं एक दिवस त्यांनी जाहीर केलं. मनमोहनच्या विरोधात कुणीच काही बोललं नाही, बोलू शकलं नाही आणि मनजीतचा पुढचा मार्ग मोकळा झाला. कलेच्या साधनेत तो स्वतःला झोकून देणार होता. त्याच्या मोठ्या भावाचा वरदहस्त त्याच्यावर होता - आता त्याला भविष्याची बिलकूल चिंता नव्हती.
***
इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट
मनजित बावा
शब्दांकन - इना पुरी
अनुवाद - स्वाती देशपांडे
मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या - ३४२
किंमत - रुपये ३२०
***
हे पुस्तक विकत ऒनलाइन विकत घेण्यासाठी - http://kharedi.maayboli.com/shop/In-Black-and-White.html
किंवा http://menakaprakashan.com/category/books/ इथे बघा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment