’माहेर’चा ’साडी विशेषांक’

on Wednesday 27 April 2011

१२ मार्च १९११. पुण्यातल्या किर्लोस्कर नाटक मंडळीच्या बिर्‍हाडी सकाळपासूनच लगबग सुरू होती. काकासाहेब खाडीलकरांनी लिहिलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा त्या दिवशी पहिला प्रयोग होता. नाटकातली गोविंदराव टेंब्यांची सुरेख पदं सर्वांनाच आवडली होती. नटसंचही जबरदस्त. भरदार देहयष्टीचे नानासाहेब जोगळेकर धैर्यधराच्या भूमिकेत तर गणपतराव बोडस लक्ष्मीधराच्या भूमिकेत होते. भामिनीची भूमिका साकारणार होते बालगंधर्व. किर्लोस्कर नाटक मंडळीनं कायमच आपल्या नाटकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. हे नाटकही इतिहास घडवेल, याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. मात्र सकाळी तालीम संपत आली असतानाच एक तार आली, आणि सर्वांच्या उत्साहावर पाणी पडलं. बालगंधर्वांच्या लाडक्या लेकीचा मृत्यू झाला होता. ही बातमी ऐकताच बालगंधर्व कोसळले. इकडे रात्रीचा प्रयोग रद्द करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या. पण बालगंधर्वांनी प्रयोग रद्द होऊ दिला नाही. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून ते प्रयोगाला उभे राहिले. शेवटी मायबाप प्रेक्षक हे त्यांचं दैवत. प्रेक्षकांना निराश कसं करणार? बालगंधर्व प्रयोगाच्या तयारीला लागले. शुचिर्भूत होऊन भरजरी शालू हाती घेतला. पाण्यानं ओला केला. रंगभूमी हे सर्वांत पवित्र ठिकाण. शरीर आणि वस्त्र शुद्ध केल्याशिवाय रंगमंचावर पाऊल ठेवायचं नाही, हा त्यांचा दंडक होता. शिवाय ओला शालू व्यवस्थित चोपून बसे.

त्या रात्री प्रयोग खासच रंगला. ‘धनी मी, पती वरीन कशी अधना?’ असं म्हणणारी भामिनी प्रेक्षकांना आवडली. ‘नुसत्या पराक्रमावर बायकांचे मनच बसत नाही. मनाची हौस भागेल इतके दागिने घालणारा नवरा बायकांना आवडतो’, अशी ऐट दाखवणारी भामिनी दुसर्‍या अंकात गरीब वनमालेच्या रूपात धैर्यधराचं प्रेम जिंकण्यास निघाली, आणि बालगंधर्वांना प्रेक्षकांनी आपल्या हृदयात कायमचं स्थान दिलं. बालगंधर्वांसारखं दिसणं, बोलणं, वागणं शिष्टसंमत झालं. बालगंधर्व वापरत तशाच साड्या, दागिने वापरू लागल्या. असं म्हणतात की, बालगंधर्वांनी स्त्रियांना साड्या कशा नेसाव्यात, दागिने कसे घालावेत ते शिकवलं. हजारो वर्षांपासून स्त्रियांना साड्या आणि दागिन्यांबद्दल असलेलं हे प्रेम एका पुरुषानं दृढमूल केलं.


                                                                                बालगंधर्व (इ.स. १९२४च्या सुमारास)


बालगंधर्वांच्या भामिनीला यंदा शंभर वर्षं पूर्ण झाली. बालगंधर्वांचं हे ऋण मान्य करत ’माहेर’ आणि ’मेनका’ आपल्यासाठी खास साड्या व दागिने यांना वाहिलेले अंक घेऊन आले आहेत. ’माहेर’च्या मे महिन्याच्या या अंकात साड्यांची विविध अंगांनी ओळख करून देणारा खास विभाग आहे. दक्षिण भारतातली साड्यांची बाजारपेठ, तिथले व्यवहार यांची ओळख करून देणारा खास लेख अश्विनी खाडिलकर यांनी लिहिला आहे. मानुषी यांनी साड्यांचा इतिहास, पेहरावात झालेले बदल यांचा मागोवा ’साडी : इति ते आदी’ या लेखात घेतला आहे. सुजाता राय यांनी त्यांच्या ’साडीवेड्या घरा’बद्दल लिहिलं आहे. शिवाय पूनम छत्रे, मिलिंद गाडगीळ यांच्या बहारदार कथाही आहेत.

नुकतंच स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण मिळालं. अनेक शतकांपूर्वी मुक्ताबाईंनी स्त्रीस्वातंत्र्याबद्दल, स्त्रियांच्या सबलीकरणाबद्दल लिहून ठेवलं होतं. मुक्ताबाईंच्या या अभंगांची ओळख मधुवंती सप्र्यांनी ’मुंगी उडाली आकाशी’ या लेखात करून दिली आहे. विकिपीडिया या आंतरजालावरील मुक्त ज्ञानकोशानं माहितीची कवाडं उघडी केली. अनेक किचकट विषय, ऐतिहासिक, साहित्यिक तपशील विकिपीडियामुळे लोकांना सहज उपलब्ध झाले. तेही त्यांच्याच मातृभाषेत. जगभरातली मंडळी या ज्ञानकोशाच्या निमित्तानं एकत्र आली. या प्रकल्पावर गेली काही वर्षं काम करणार्‍या संकल्प द्रविड यांनी ’खुलभर दुधाची कहाणी’ या लेखात या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे. ’चाकोरीबाहेर’ या सदरात हेमलकशाच्या जंगलात काम करणार्‍या दिगंत-अनघा या आमटे कुटुंबातल्या तिसर्‍या पिढीचं कर्तृत्व चिन्मय दामले यांनी सांगितलं आहे. जिज्ञासा मुळेकर या अमेरिकेत असणार्‍या तरुण संशोधिकेनं आठवणीतल्या चाफ्याच्या झाडाबद्दल लिहिलं आहे. वळवाच्या पावसाची एक अस्वस्थ करणारी आठवण आपल्याला हणमंत शिंदे यांनी ’वळीव आलाय बया..वळीव’ या कथेत सांगितली आहे. याशिवाय या अंकात आहेत झरोका, सासर ही वाचकप्रिय सदरे आणि गौरी कालेकर , अदिती गोडबोले यांच्या कथा.

१ मेला ’माहेर’चा हा अंक उपलब्ध होईल. ’माहेर’चे वर्गणीदर होण्यासाठी कृपया http://menakaprakashan.com/subscriptions/ हे पान बघा..

नव्या रूपातलं ’माहेर’ कसं वाटलं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय आम्हांला masik.maher@gmail.com या पत्त्यावर कृपया कळवा.

स्वागत

on Tuesday 19 April 2011
माहेर’तर्फे तुम्हां सर्वांना मन:पूर्वक अभिवादन!
हे वाक्य लिहिताक्षणी लहानपणी कधीतरी वाचलेली गोष्ट आठवली.

एक गरीब शेतकरी होता. तो मजल-दरमजल करीत आपल्या थोरल्या लेकीला भेटायला गेला. तीही एका शेतकर्‍याचीच बायको होती. लेकीपाशी पोहोचताच त्याला ती सचिंत बसलेली दिसली. बापानं मायेनं काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, "पावसाची वाट बघतेय. नाहीतर पेरलेलं सगळं वाया जाईल". तिला आश्वस्त करीत थोड्या वेळानं बाप आपल्या दुसर्‍या लेकीकडे निघाला. ती कुंभाराची सून होती. तिच्या गावाला पोहोचताच तीही त्याला चिंताग्रस्त दिसली. पुन्हा तोच मायेचा प्रश्न! त्यावर ती म्हणाली, "बाबा, पाऊस पडला तर सुकायला ठेवलेल्या माझ्या गाडग्यामडक्यांचं काय? पोटाचा प्रश्न आहे!" तिच्या मनाला बरं वाटेलसं बोलून शेतकरी परत निघाला खरा, परंतु त्याच्या मनात देवासाठी एकच सवाल होता, ’मी कुणासाठी प्रार्थना करू? पाऊस पडावा म्हणून केली, तर धाकटी लेक नाराज होईल आणि न पडावा म्हणून केली, तर थोरलीचं नुकसान होईल!’

ही गोष्ट आठवण्यामागे एक कारण आहे. १९६२ साली जानेवारी महिन्यात ’माहेर’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. अंकाची किंमत होती एक रुपया. ’ललनांचे नियतकालिक’ असं त्याचं स्वरूप होतं. जगभरात पसरलेल्या मराठी स्त्रियांना या मासिकानं हक्काचं व्यासपीठ दिलं. या पाच दशकांत वाचकांनी या मासिकावर भरभरून प्रेम केलं. गेल्या वर्षी ’मीडियानेक्स्ट’ या कंपनीनं ’मेनका प्रकाशन’ विकत घेतलं आणि ’माहेर’ हे मासिक नव्या रूपात जानेवारी महिन्यापासून येऊ लागलं. 

या पन्नास वर्षांत समाजात कितीतरी मोठे बदल झाले. तसं कालौघात सगळं सगळं थोडंसं बदलत असतंच. माणसं बदलतात, परिसर बदलतो, नाती बदलतात, मित्रमैत्रिणी बदलतात..एवढंच कशाला, आपणही नाही का काळानुसार बदलत जात? ही बदलाची प्रक्रिया कधी थेट तर कधी नकळतपणे, कधी ढळढळीत तर कधी सूक्ष्मपणे घडत असते. बदलांचं प्रमाण तेवढं व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं, एवढंच! त्यामुळे नवी माणसं आली, की बदलही काहीसा अपरिहार्यच. ’माहेर’चं स्वरूपही आता बदललं आहे. अर्थात हे बदल करताना त्या शेतकरी बापाइतका अवघड तिढा नव्हता. कारण जुन्या आणि नव्या वाचकांना सुखावतील असेच हे बदल आहेत. वेगवेगळ्या विचारांना चालना देणारे आहेत. स्त्री-पुरुषांनी, स्त्री-पुरुषांसाठी, स्त्री-पुरुषांच्या मदतीनं चालवलेलं हे मासिक आहे. 

या नवीन स्वरूपात ’माहेर’ आता आपल्याला आंतरजालावर, या पानावर नियमितपणे भेटणार आहे. गेल्या पन्नास वर्षांत ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, अरविंद गोखले, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी ’माहेर’मधून लेखन केलं. या दिग्गजांच्या निवडक कथा-कविता, तसंच नव्या दमाच्या साहित्यिकांचं लेखन इथे आपल्याला वाचता येईल. भवतालचे बदल, नवीन पायंडे, साहित्य-संस्कृती-कलाक्षेत्रातल्या घडामोडी आपल्याला इथे वाचायला मिळतील. दर महिन्याला प्रकाशित होणार्‍या ’माहेर’मधल्या कथा, ललित आणि इतर लेखांची माहिती आपल्याला इथे मिळू शकेल. शिवाय, आपल्यालाही आंतरजालावरील ’माहेर’मध्ये सहभागी होता येईलच. 

जगभरात विखुरलेले आपण या पुढेही ’माहेर’वर असंच प्रेम करत राहाल, याची खात्री आहे. 



गदिमांनी ’माहेर’च्या पहिल्या अंकासाठी एक कविता लिहिली होती. या कवितेचं शीर्षक होतं ’माहेर’. आंतरजालावरील ’माहेर’चा हा प्रवास आपण त्या पहिल्यावहिल्या अंकातील कवितेपासून करूया. 

नदी सागरां मिळतां,
पुन: येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर.

काय सांगू रे बाप्पांनो
तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराला जाते,
म्हणुनीच जग चाले.

सारें जीवन नदीचें,
घेतो पोटांत सागर
तरी तिला आठवतो,
जन्म दिलेला डोंगर.

डोंगराच्या मायेसाठीं,
रूप वाफेचें घेऊन
नदी तरंगत जाते,
पंख वार्‍याचे लावून.

पुन: होऊन लेंकरूं,
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरां,
आणि येतो पावसाळा.


***