ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून!!!

on Monday 5 September 2011

पाचसहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एका परिचितांना भेटायला त्यांच्या कोचिंग क्लासात गेलो होतो. बारावीच्या परीक्षेची तयारी या क्लासमध्ये करून घेतली जाई. शंभर मुलांची एक बॅच. सर्व विद्यार्थी दहावीत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले. या मुलांशी सहज गप्पा मारत बसलो होतो. ’तुमच्यापैकी इंजीनियरींगला जाण्याची किती जणांची इच्छा आहे?’ असं विचारल्यावर बहुतेक सर्वांनीच हात वर केले. बारापंधरा मुलांना मेडिकलला जायचं होतं. इंजीनियरींगच का, या प्रश्नावर ’कॉम्प्युटर आवडतो’ (!), असं उत्तर मिळालं. अनेकांनी ’आईबाबा म्हणतात म्हणून’ असंही सांगितलं. डॉक्टर व्हावंसं वाटणार्‍या बहुतेक सर्वांचेच आईवडील डॉक्टर होते. दुसर्‍या दिवशी सहज माझ्या शाळेत डोकावलो तर मुख्याध्यापिकांच्या खोलीत आणि बाहेरही पालकांची बरीच गर्दी होती. चढलेले अनेक आवाज आणि आमच्या मुख्याध्यापिका त्यांना शांत करण्याच्या प्रयत्नात. शाळेत आम्हांला ’गुलमोहर रीडर’ नावाचं एक पाठ्यपुस्तक होतं. इंग्रजीतील उत्कृष्ट पुस्तकांमधले निवडक वेचे, कथा या पाठपुस्तकात होत्या. मुलांना वाचनाची गोडी लागावी, उत्तम इंग्रजी वाङ्मयाशी तोंडओळख व्हावी हा या पुस्तकमालिकेचा हेतू होता. मराठीतल्या ’वाचू आनंदे’सारखीच ही पुस्तकमालिका होती. शाळेच्या परीक्षेत मात्र या पुस्तकातून प्रश्न विचारले जात नसत. नेमकं याच कारणामुळे त्या दिवशी पालकांनी आमच्या शाळेवर चक्क मोर्चा आणला होता. बोर्डाच्या परीक्षेसाठी या पुस्तकाचा काहीच उपयोग नाही, मग हे पुस्तक अभ्यासक्रमात कशाला, असं सर्वच पालकांना वाटत होतं. याबद्दल अगोदरच अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र तरीही या विषयाचा तास शाळेनं सुरूच ठेवला. शाळेवर मोर्चा आणून मुख्याध्यापिकांशी भांडण्याशिवाय त्यामुळे पालकांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी मुलांचं भवितव्य महत्त्वाचं. त्या दिवसानंतर अर्थातच ’गुलमोहर रीडर’ आमच्या शाळेत शिकवणं बंद झालं.

या दोन अनुभवांनी मला बरंच अस्वस्थ केलं. आपल्या मुलाला काय शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे, आयुष्य कशाप्रकारे जगायचं आहे, याचा निर्णय पालकच घेत होते. आपल्या मुलांनाही विचार करता येतो, निर्णय घेता येतात, हे निर्णय कदाचित चुकीचे असतील पण या चुकांतून ते काहीतरी शिकतील याचा या पालकांना सपशेल विसर पडला होता. नंतर लक्षात आलं की, या काही अपवादात्मक घटना नव्हत्या. आपल्या मुलांसाठी रस्ता आखण्याच्या कामात बहुतेक सर्वच पालक गुंतले होते. मुलांची आवड, त्यांचा कल, त्यांची गती या कशाचाच विचार केला जात नव्हता.  इंजीनियर किंवा डॉक्टर व्हायलाच हवं, चुकून मार्कं कमी मिळाले आणि बीएस्सी किंवा बीएला ऍडमिशन घ्यावी लागली तर आपल्या आयुष्यात फक्त अंधार, असा विचित्र ग्रह बहुतेक सर्वच मुलांनी करून घेतला होता. आपल्याला मनापासून आवडणारी गोष्ट आपण करिअर म्हणून निवडू शकतो आणि इंजीनियर किंवा डॉक्टर होता आलं नाही, झालं नाही तरी काहीच बिघडत नाही, हे त्यांना कोणी सांगितलंच नव्हतं. अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडेही एक जग आहे, या जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, चित्रं आहेत, संगीत आहे, खेळ आहे, निसर्ग आहे, याचा सगळ्यांनाच विसर पडला होता. या पार्श्वभूमीवर मला सतत आठवत राहिला तो समित साहनी आणि त्याचं ’सिद्धार्थ घराबाहेर पडला, त्यानं आपली बुद्धी जागती ठेवली, डोळे उघडे ठेवले आणि त्याला बुद्धत्व प्राप्त झालं. आखलेल्या मार्गावरून झापडं लावून चालणं खूप खूप सोपं असतं, आणि दुर्दैवानं आपण तेच चटकन स्वीकारतो’, हे वाक्य.



समित साहनी या पस्तिशीच्या तरुणानं अंदमानला ’बेअरफूट’ या नावानं स्कुबाडायव्हिंग स्कूल सुरू केलं आहे. भारतात स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टर होण्यासाठी प्रशिक्षण देणार्‍या फक्त दोन संस्था आहेत, त्यांपैकी ’बेअरफूट’ ही एक. तिथंच असलेलं त्याचं ’बेअरफूट रेझॉर्ट’ही जगभरात प्रसिद्ध आहे. अंदमानच्या विकासासाठी, स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी, तिथल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गेली सातआठ वर्षं समित अहोरात्र मेहनत करतो आहे. मात्र समित अधिक प्रसिद्ध आहे ते लेखक म्हणून. ’ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून - ट्रॅव्हल्स बॅक टू इंडिया’ हे त्याचं भन्नाट प्रवासवर्णन काही वर्षांपूर्वी बरंच गाजलं. समित इंग्लंडहून भारतात आला त्याची ही गोष्ट. लंडन - दिल्ली हा प्रवास विमानात एकदाही न बसता करायचा, असं समितनं ठरवलं. रेल्वे, बोट, घोडे, पाय अशी प्रवासाची साधनं वापरून सात देशांतून प्रवास करत त्यानं दिल्ली गाठली. त्याच्या प्रवासवर्णनात त्याला आलेले धमाल अनुभव तर आहेतच, पण माणस जोडणं, त्यांना समजून घेणं ही अवघड कला समितनं किती उत्तम साधली, हेही हे प्रवासवर्णन वाचून कळतं. समितनं लिहिलेलं प्रवासवर्णन जितकं रोचक तितकंच त्याचं आयुष्यही.

समितचा जन्म कोलकात्याचा. दहावीपर्यंतचं शिक्षण झालं डून स्कूलमध्ये. तो अकरावीत असताना त्याचे आईवडील चेन्नईला स्थायिक झाले, आणि दिल्लीच्या एका महाविद्यालयात घेतलेला प्रवेश रद्द करून समित आईवडिलांकडे राहायला आला. उदारीकरणाचं वारं त्यावेळी नुकतंच वाहू लागलं होतं. परंपरांना घट्ट चिकटून असणार्‍या चेन्नईनं आपले दरवाजे किलकिले करायला सुरुवात केली होती. १९९० साली चेन्नईत ’डाउन अंडर’ या नावानं पहिला नाईटक्लब सुरू झाला, आणि समितनं या क्लबात डीजे म्हणून नोकरी पत्करली. समित तेव्हा पंधरा वर्षांचा होता. संगीताची आवड लहानपणापासूनच होती. शाळेत असताना त्यानं अनेक गाणी लिहिली होती. उत्तम गिटारवादक म्हणून तो शाळेत प्रसिद्ध होता. दहावीच्या वर्षात त्यानं एका मित्राच्या भावाकडून डीजे होण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा चेन्नईला उपयोग झाला. पुढली पाच वर्षं समितनं त्या क्लबात डीजेइंग केलं. दिवसभर कॉलेज आणि रात्री क्लब. समित सांगतो - ’नाईटक्लबात वाट्टेल ते प्रकार चालतात, तुमचा मुलगा तिथे वाईट संगतीत पडेल, असं माझ्या आईवडिलांना अनेकजण सांगत, पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. नाईटक्लब बंद झाल्यावर सर्व आवरून घरी यायला पहाटेचे तीन वाजत. पण याबद्दलही कधीच त्यांनी नापसंती दाखवली नाही. दारू, सिगारेट, ड्रग्ज यांपासून मी लांब होतो, याची त्यांना खात्री होती. मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी गैरफायदा घेणार नाही, याचीही त्यांना खात्री असावी. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मी डीजे असण्याला अजिबातच विरोध केला नाही. अकरावीपासून बीए होईपर्यंत मी डीजेइंग केलं. अभ्यासाबद्दल एकदाही ते मला बोलले नाहीत. भारतातला मी सर्वांत तरुण डीजे होतो, याचा त्यांना अभिमानच होता.’

बारावीनंतर समितनं चेन्नईच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिरस्त्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा मेडिकलला न जाता त्यानं अर्थशास्त्रात पदवी मिळवायचं ठरवलं. बारावीत उत्तम गुण मिळवले असूनही. संगीताची आवड असली, एक उत्तम डीजे म्हणून भारतभरात नाव झालं असलं तरी गिटार वाजवणं, डीजेइंग करणं यांत त्याला करिअर करण्याची इच्छा नव्हती. पदवी मिळवल्यानंतर व्यवस्थापनक्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यानं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी घेतला. घरच्या घरी अभ्यास करून त्यानं एमबीएची प्रवेशपरीक्षा दिली आणि अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत त्याला प्रवेश मिळाला. समितनं अहमदाबादमधली दोन वर्षंही अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक उद्योग करण्यात घालवली. जमेल तेवढा गुजरात त्यानं सायकलीवरून पालथा घातला. तिथल्या लोककलांचा अभ्यास केला. सारंगी वाजवायला शिकला.

अभ्यासक्रम संपत आला आणि समितनं नोकरीसाठी परदेशात जायचं ठरवलं. परदेशी जाऊन भरपूर पैसा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका वेगळ्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून. तीनचार वर्षं परदेशात राहायचं, भरपूर भटकायचं आणि भारतात परत यायचं, असा त्याचा बेत होता. त्या काळी परदेशी कंपन्यांनी भारतात शिरकाव करायला सुरुवात केली असली तरी अशा कंपन्यांमध्ये आयआयएमच्या विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळवणं सोपं नव्हतं. या कंपन्या आयआयएमच्या कॅम्पसला मुलाखतींसाठी येत नसत. समितनं एकाही भारतीय कंपनीत नोकरीसाठी अर्ज तर केला नाहीच, पण दोन अमेरिकन कंपन्यांनी देऊ केलेल्या नोकर्‍याही नाकारल्या. त्याला जायचं होतं इंग्लंडला, कारण तिथे राहून युरोप पालथा घालणं, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन संस्कृतींशी तोंडओळख करून घेणं शक्य होतं. ’अर्न्स्ट ऍण्ड यंग’ या कंपनीत समितला नोकरी मिळाली आणि तो इंग्लंडला गेला. पहिल्या वर्षभरातच त्यानं ऑक्सफर्ड विद्यापीठातून चार्टर्ड अकांउंटन्सीची एक पदविकाही मिळवली.

’इंग्लंडमध्ये मी पाच वर्षं राहिलो’, समित सांगतो. ’तिथे माझ्या लक्षात आलं की, परदेशात नोकरीसाठी किंवा शिकायला येणारे भारतीय आपल्याच कोषात राहतात. नवीन संस्कृतीशी ओळख करून घेणं, त्या संस्कृतीतील उत्तम गोष्टी अंगिकारण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हणजे किती छान आणि सोपं आहे. पण तसे कुठलेच प्रयत्न केले जात नाहीत. अनेक वर्षं वेगळ्या देशात राहूनही आपण त्यांची भाषा शिकत नाही, त्यांचे पारंपरिक पदार्थ चाखून बघत नाही. त्यांचा इतिहास, त्यांच्या लोककला यांकडे तर आपण ढुंकूनही बघत नाही. त्यामुळे असेल कदाचित पण इंग्लंडमध्ये मी फार कमी भारतीयांशी मैत्री करू शकलो. भटकलो मात्र मी भरपूर. मी रोज कमीत कमी दोन तास ओव्हरटाइम करत असे. या जादा कामाचे पैसे न घेता वर्षाच्या शेवटी या जास्तीच्या तासांचा हिशोब करून तेवढी सुट्टी मी घेई. या ओव्हरटाइममुळे दरवर्षी कमीत कमी दोन महिन्यांची सुट्टी मला मिळत असे. या सुट्टीचा मी चांगलाच उपयोग करून घेतला. मी अख्खा युरोप पालथा घातला. नोकरीत मला बर्‍यापैकी चांगला पगार होता. माझ्या गरजा अतिशय कमी. त्यामुळे प्रवासही कमी खर्चात होई. इंग्लंडमधल्या पाच वर्षांपैकी एक अंपूर्ण वर्ष मी अशाप्रकारे भटकण्यात घालवलं.’

इंग्लंडमधली पाच वर्षं संपली आणि समितला ब्रिटिश सरकारकडून एक पत्र आलं. त्याला इंग्लंडमध्ये राहण्याचा व नोकरी करण्याचा कायमचा परवाना देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती.  इंग्लंडमध्ये राहून नोकरीची पाच वर्षं पूर्ण करणार्‍या सर्वच उच्चशिक्षित परदेशी नागरिकांना असं पत्र पाठवलं जात असे. अशा कर्मचार्‍यांची इंग्लंडला तेव्हा गरज होती. बहुतेक सर्वच भारतीय या पत्राची आतुरतेनं वाट बघत असत. समितनं मात्र ते पत्र मिळाल्यावर भारतात परत जायचं ठरवलं. त्याला परदेशात स्थायिक होण्यात अजिबातच रस नव्हता. युरोप पुरेसा बघून झाला होता. पाच वर्षांत त्यानं भरपूर पैसे कमावले होते. आता भारतात परत गेलो नाही, तर पुढे कधीच परत जाता येणार नाही, हे तो जाणून होता. पत्र मिळाल्याच्या दुसर्‍या दिवशी त्यानं नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि भारतात परत जायची तयारी सुरू केली.

भारतात गेल्यावर काय करायचं, हे मात्र अजून ठरलं नव्हतं. त्यामुळे हाताशी भरपूर वेळ होता. सरळ लंडन - दिल्ली विमान पकडून भारतात परतणं समितला मंजूर नव्हतं. लंडनला विमानात बसून काही तासांत भारतात पोहोचण्यात काय मजा? भारतात परत जाताना विमानप्रवास करायचाच नाही, असं त्यानं ठरवलं. इंग्लंडहून भारतात येण्यासाठी तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असा एक मार्ग आहे. तुर्कस्तान आणि इराणमधून हजारो वर्षांपासून भारतात व्यापारी येत होते. मुघल राजे भारतात आल्यानंतर इंग्लंडहून अनेक विद्वान, व्यापारी, राजदरबाराचे दूत याच मार्गानं घोड्यांवरून किंवा चालत भारतात आले. समितला मात्र या मार्गानं येणं शक्य नव्हतं. समित भारतीय. त्याला अफगाणिस्तानाचा आणि पाकिस्तानाचा व्हिसा मिळणं अशक्य होतं. मग समितनं दुसरा मार्ग शोधला. इंग्लंडहून डेन्मार्क, नॉर्वे, सायबेरिया, मंगोलिया या देशांतून चीनमध्ये जायचं. तिथून विक्रम सेठच्या पावलांवर पाऊल टाकत तिबेट, नेपाळ आणि भारत. (चीनच्या नानजिंग विद्यापीठात शिकत असताना सुप्रसिद्ध लेखक श्री. विक्रम सेठ यांनी तिबेट - नेपाळ - भारत असा प्रवास केला होता. ’फ्रॉम हेवन लेक’ या नावानं त्यांनी सुरेख प्रवासवर्णन लिहिलं आहे.) पाच वर्षांत जमा केलेलं सर्व सामान त्यानं विकून टाकलं, पाठीवरच्या सॅकमध्ये मावतील इतकेच कपडे बरोबर घेतले आणि इंग्लंडला कायमचा रामराम ठोकला.




समितनं त्याचा परतीचा प्रवास ’ऑल द वर्ल्ड इज अ स्पिटून - ट्रॅव्हल्स बॅक टू इंडिया’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. पेंग्विन पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकात अनेक मराठी प्रवासवर्णनांमध्ये असते तशी ऐतिहासिक किंवा स्थलदर्शनाची माहिती खच्चून भरलेली नाही. हे पुस्तक म्हणजे समितला आलेल्या अनुभवांचं, भेटलेल्या असंख्य माणसांचं सुरेख शब्दचित्र आहे.   समित जगाकडे अतिशय निकोप नजरेनं पाहतो. माणसांच्या रंगावरून, भाषेवरून, पेहरावावरून तो त्यांना लेबलं चिकटवत नाही. तो या माणसांशी मनापासून संवाद साधतो, त्यांच्यातलाच एक बनून राहतो. त्यामुळे त्याला आलेले अनुभवही अस्सल आहेत. या संपूर्ण प्रवासात समितनं आपली खरी ओळख क्वचितच कोणाला करून दिली. तो शाळेत होता तेव्हा त्याच्या आवडत्या शि़क्षिकेनं त्याला सांगितलं होतं - ’यू कॅन बी व्हॉट यू वॉन्ट टू बी’. हे वाक्य कायम लक्षात ठेवणारा समित कधी भारतातला योगशिक्षक झाला, तर कधी बॉलिवूडच्या मसालापटांचा दिग्दर्शक. कधी अणुशास्त्रद्न्य तर कधी चिन्यांना इंग्रजी शिकवणारा शिक्षक. नॉर्वेत हेलसिंकीला हॉटेलात जागा न मिळालेला समित एका बागेतल्या बाकड्यावर झोपला होता. पहाटे चार वाजता त्याला पोलिसांनी उठवलं. तिथे त्याच्यासारखेच काही प्रवासी झोपलेले. कोणी स्पॅनिश तर कोणी अमेरिकन. पोलिसांनी समितची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की, समित हा भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार. त्याचं विमान चुकलं, म्हणून त्याला नाइलाजानं बागेत येऊन झोपावं लागलं. ’कबड्डी’ हा खेळ कसा खेळतात हे त्या पोलिसांना ठाऊक नव्हतं. समितनं मग त्यांना कबड्डीचे धडे दिले. बागेतले इतर प्रवासीही त्यांना सामील झाले, आणि सकाळी पाच ते सात या वेळेत नॉर्वे पोलिस विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड असा कबड्डीचा सामना रंगला.

ट्रान्स-सायबेरियन रेल्वेतल्या प्रवासात समितला भारतीय चित्रपट आणि त्यातही मिथुन चक्रवर्ती आणि भप्पी लहिरी यांची महती कळली. जगातल्या सर्वांत लांब रेल्वेमार्गावरून प्रवास करताना, आणि पुढे रशियात अनेक ठिकाणी समितला मिथुनसारखा ’डिस्को’ करण्याचा आग्रह झाला. ’जिमी जिमी’ हे गाणं तर त्यानं शेकडो वेळा म्हणून दाखवलं. किंबहुना रशियाच्या सीमेवर पोलिसानं त्याला ’जिमी जिमी’ म्हणून दाखवल्यानंतरच प्रवेश करू दिला. मंगोलियातल्या भटक्या घोडेस्वारांबरोबर समित मनसोक्त भटकला. त्यांच्या वस्तीवर जाऊन राहिला. चीनमधली प्रेक्षणीय स्थळं तर बघितलीच, पण चिनी मनोवृतीही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तिबेटच्या मार्गावर भेटलेल्या पाकिस्तान्यांशी बोलला. त्यांच्यातला एक पाकिस्तानी ट्रक ड्रायव्हर भारताला शिव्या देऊ लागताच त्याला ’शांततेचे धडे’ देऊन गप्पही केलं. तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीयांना परवाना मिळवणं अतिशय अवघड. विक्रम सेठनं परवाना देणार्‍या कार्यालयात ’आवारा हूं’ हे गाणं म्हणून परवाना मिळवला होता. समितनंही हेच गाणं म्हणून परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या अधिकार्‍यानं परवाना नाकारल्यावर ’जिमी जिमी’ म्हणून बघितलं. तरीही परवाना मिळत नाही म्हटल्यावर तो एका अमेरिकनाच्या परवान्यावर आपला फोटो लावून तिबेटला गेला. मानससरोवर, तिबेटी लोक, ल्हासा यांचं अतिशय धमाल आणि क्वचित हृद्य वर्णन समित्नं केलं आहे.

नेपाळला पोहोचल्यावर समितनं आपल्या प्रवासाबद्दल शांतपणे विचार केला. इथून तिथून माणसं सारखीच, हे त्याला पुरेपूर कळलं. प्रेमानं आदरातिथ्य करणारे मंगोल, ’एकेकाळी आमचा देश केवढातरी मोठा होता..आमची संस्कृतीसुद्धा सर्वश्रेष्ठ’, असं म्हणणारे रशियन, नातीच्या लग्नाच्या काळजीत असलेले चिनी आजोबा समितला फार जवळचे वाटले. भारतीयांचा ’चलता है’ म्हणून आयुष्यातल्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावही मग त्याला खटकला. अवतीभवती काय घडतं आहे, त्याचे किती भयानक परिणाम होऊ शकतात, यांचा विचार न करता आपण भारतीय निर्णय घेतो, किंवा निर्णय घेणं टाळतो, स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्याला किंमत देत नाही, वेगळं पडण्याच्या भीतीनं वेगळं बोलण्याचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं टाळतो, हे समितला उमगलं. समित दिल्लीला आला तो अनेक अनुभव जमा करून. ’या अनुभवांमुळे शहाणं होण्यास मात्र अजून बराच वेळ लागेल’, असं त्यानं लिहून ठेवलं.

समित भारतात परतला तेव्हा ’आता पुढे काय’, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. पुन्हा नोकरी करण्यात त्याला रस नव्हता, पण नक्की काय करायचं, हेही त्याला कळत नव्हतं. भारतात परतल्यावर वर्षभरानं समितनं आपल्या प्रवासाबद्दल लिहायचं ठरवलं. लंडनहून परतीच्या प्रवासात आलेले अनुभव मित्रांना, नातेवाइकांना सांगत असताना त्याला हे सगळे अनुभव लिहून काढण्याचा आग्रह होत असे. आपण पुस्तकबिस्तक लिहून लोकांच्या घरातली रद्दी वाढवायची नाही, असं त्याने पक्कं ठरवलं होतं. ’तू तुझ्या प्रवासाबद्दल लिही’, असं कोणी म्हटलं की तो सरळ विषय बदले. मग हळूहळू लोकांचा आग्रह थांबला तसं त्याला प्रवासवर्णन लिहावंसं वाटू लागलं, आणि चार कपडे पाठीवरच्या सॅकमध्ये टाकून पुस्तक लिहिण्यासाठी तो परत घराबाहेर पडला. पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं समितनं भारत उभाआडवा पिंजून काढला. तीन महिने हिमालयात जाऊन राहिला. समित इंग्लंडला होता त्या काळात भारतात बरेच बदल झाले होते. या नव्या, बदललेल्या भारताशी नव्यानं ओळख करून घेत समितनं पुस्तक लिहायला सुरुवात केली. पुस्तकाचा शेवटचा भाग त्यानं अंदमानला लिहिला. समितच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा. त्याच्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा.



२००२ साली समित अंदमानला गेला तेव्हा तिथे पर्यटकांची अजिबातच गर्दी नसे. आठवड्याला तीन विमानं पोर्ट ब्लेअरला उतरत. तिथले सगळे समुद्रकिनारे आपल्या खाजगी मालकीचे असल्यासारखे वाटत. समित अंदमानच्या प्रेमात पडला. तिथला समुद्र, तिथली बेटं, माणसं या सगळ्यांनी त्याला भुरळ घातली. तिथे राहून त्यानं आपलं पुस्तक पूर्ण केलंच, शिवाय ’पुढे काय?’ या प्रश्नाचं उत्तरही शोधलं. सहा महिन्यांनी समित अंदमानला कायमचा स्थायिक होण्यासाठी आला. तिथे राहून तिथल्या पर्यटनाला चालना देण्याची, स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करण्याची त्याची योजना होती. अंदमानच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना मात्र समितला हे करणं जमेल, याबद्दल खात्री नव्हती. आवश्यक ती मदत करण्याची त्यांची तयारी होती, पण ’अंदमानला राहणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, इथे मुद्दाम कोण पर्यटनासाठी येईल?’ असा त्यांचा सवाल होता. समितनं प्रयत्न करण्याचं ठरवलं. भारत सरकारच्या पर्यटन खात्यानं समितला पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दाखवली. तरीही सगळ्या परवानग्या घेण्यात, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात दोन वर्षं गेली. २००५ साली समितचं ’बेअरफूट रेझॉर्ट’ अंदमानच्या हॅवलॉक बेटावरच्या राधानगर समुद्रकिनार्‍यावर सुरू झालं. निसर्गाशी असलेली बांधिलकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून रेझॉर्टची नाव ’बेअरफूट’.



पस्तीस खोल्यांचं हे रेझॉर्ट जगभरातल्या प्रवाशांचं आवडतं आहे. पर्यटकांमुळे, पर्यटनामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी इथे विशेष काळजी घेतली जाते. या रेझॉर्टला जोडूनच समितनं एक स्कुबाडायव्हिंग स्कूल सुरू केलं आहे. स्कुबाडायव्हिंगचा काहीच अनुभव नसलेले पर्यटक इथे येतातच, शिवाय स्कुबाडायव्हिंग शिकवण्यासाठी प्रशिक्षकांनाही इथे तयार केलं जातं. गेल्या काही वर्षांत समितच्या संस्थेतून वीस स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टरांनी प्रशिक्षण घेतलं आहे. स्कुबाडायव्हिंगची वाढती लोकप्रियता आणि लोकांच्या हातातला वाढता पैसा यांमुळे अनेक तरुणांचा ओढा स्कुबाडायव्हिंग इन्स्ट्रक्टर होण्याकडे आहे. अंदमानला येणारे पर्यटकही समुद्राखालचं जग बघण्यास उत्सुक असतात. समुद्रातल्या प्रवाळांना, इतर जिवांना त्रास न देता त्यांचं सौंदर्य न्याहाळण्यास समित पर्यटकांना शिकवतो. समित अंदमानला गेला त्याला आता सात वर्षं झाली. अंदमान आता बरंच बदललं आहे. रोज आठ विमानं पोर्ट ब्लेअरला उतरतात. पर्यटकांचा ओघ दरवर्षी वाढतोच आहे. स्थानिकांनाही आता या पर्यटनातून पैसा मिळतो आहे. या सार्‍यांत समितचा मोठा वाटा आहे. अंदमानला परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले आहेत. असंख्य भारतीय पर्यटकही समितच्या रेझॉर्टला पुन:पुन्हा भेट देतात. पर्यटनामुळे निसर्गाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून समितनं पर्यटकांना आखून दिलेले नियम आता अंदमानातले बरेच रेझॉर्टचालक पाळतात.

समितचा एकूणच प्रवास मोठा विलक्षण आहे. त्यानं स्वत:चा मार्ग स्वत: शोधलाच, पण हे करताना समाजाचाही विचार केला. पर्यावरणरक्षणासाठी, अंदमानाच्या विकासासाठी त्यानं जे प्रयत्न केले आहेत, त्याला खरंच तोड नाही. समित सांगतो - ’मी काही खूप मोठं काम केलेलं नाही. अंदमानला आलो, तेव्हा इथलं सौंदर्य दिसलंच, पण इथली गरिबीही दिसली. भारताचा भाग असूनही अगदी वेगळा पडलेला हा प्रदेश होता. सरकारी अधिकारीही इथे यायला नाखूश असत. जे थोडेफार पर्यटक येत, त्यांचीही गैरसोय व्हायची. इथल्या प्रशासनालाही परिस्थिती बदलण्याची इच्छा नव्हती. सुरुवातीची दोन वर्षं मला बरीच धावपळ करावी लागली. पण त्यामुळे माझ्यानंतर अंदमानला येऊन पर्यटनक्षेत्रात काम करणार्‍यांचा मार्ग सोपा झाला. आता पर्यटकांची संख्या खूप वाढली आहे, तसंच निसर्गरक्षणाबद्दलची जाणीवही वाढीस लागली आहे. स्कुबाडायव्हिंग करताना आपण प्रवाळांचं नुकसान करू शकतो, हे प्रत्येक पर्यटकाच्या डोक्यात मी घट्ट बसवलेलं असतं. त्यामुळे पर्यटक खूप काळजीपूर्वक वावरतात. निसर्गाची काळजी घेणं, हे सर्वांत महत्त्वाचं, आणि तेच आम्ही अंदमानला करत आहोत.’

’अनेकांना माझ्या एकंदर आयुष्याबद्दल कुतुहल असतं. म्हणजे आधी डीजे, मग अहमदाबादच्या आयआयएमसारख्या जगविख्यात संस्थेतून पदवी, ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदविका, लंडनमधलं कॉर्पोरेट क्षेत्र, माझं पुस्तक आणि आता अंदमान. मी काही वेगळं करायचं, असं ठरवून निर्णय घेतले नाहीत. त्या त्या वेळी मला जे योग्य वाटत गेलं, तेच मी केलं. यांत माझ्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे. निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयांची जबाबदारी पेलण्याची क्षमता मला आईवडिलांकडून मिळाली, असं मला वाटतं. त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, आणि त्या स्वातंत्र्याची किंमतही मला शिकवली. माझ्या निर्णयांमध्ये त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. पण प्रत्येक निर्णय घेताना परिणामांचा विचार करण्याची सवयही त्यांनी लावली. आज माझे मित्र कोट्यवधी रुपये कमावतात, पण मी काही गमावलं आहे, असं मला अजिबात वाटत नाही. उलट मला बरेच वेगवेगळे अनुभव घेता आले, जगभरात भटकता आलं, माणसं बघता आली, याचं खूप समाधान आहे. सध्या जग इतकं झपाट्यानं बदलतं आहे. रोज आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाणं मला माझ्या प्रवासामुळे खूप सोपं झालं. अंदमानात म्हणूनच मी खूप सुखी आहे.’

समितला जाणवलेले काळानुरुप होणारे बदल हे स्वाभाविक असतात. या चांगल्यावाईट बदलांचा समाजावर परिणाम होतच असतो. या बदलाचा वेगही कमीजास्त होतो. बदलाचा वेग भोवंडून टाकणारा असेल तर स्वतःची ओळख शोधण्यासाठीही वेळ मिळत नाही. आपल्याला स्वतंत्र विचारशक्ती लाभली आहे, आपण आपली स्वतःची वाट शोधू शकतो, स्वतःचं वेगळं विश्व उभारू शकतो याचा मग आपल्याला विसर पडतो. आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटातली पिढी याचं उत्तम उदाहरण आहे. केबल, मोबाइल, इंटरनेट, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यांच्याशी फार लवकर ओळख झालेली ही पिढी. त्यामुळे असेल कदाचित, पण वेग आणि स्पर्धा यांना तोंड देणं हे या पिढीचं एक महत्त्वाचं काम होऊन बसलं. पुढे जाताना श्वास घेण्यासाठी थांबणंही अवघड झालं. आपल्याला काय येतं, काय आवडतं, काय करायला आवडेल, यांचा विचारच केला गेला नाही. 'स्कोप' कशाला आहे आणि कुठल्या क्षेत्रात 'सॅच्युरेशन' झालेलं नाही, यांवर कॉलेजातली, शाळेतली मुलं आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवू लागली. यात कोणालाही काही गैर वाटलं नाही, कारण आमची ही पिढी भरपूर पैसा मिळवत होती, आहे. वाढत्या मागणीमुळे हा भरघोस मेहनताना मिळतो, हे मात्र कुणालाच कळलं नाही. ती आपली कुवतच आहे, असा समज करून घेण्यात आला. त्यामुळे काहीशा उद्दामपणे या पिढीची वाटचाल सुरू राहिली. माहिती-तंत्रज्ञानाचं युग अवतरलं, बाजारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. कामाचं स्वरूप चाकोरीतलं असल्यानं आणि इतर क्षेत्रांचा विचार करायला पुरेसा वावच नसल्यानं एकांगीपणा, आत्मकेंद्रीपणा वाढत गेला. साचलेपणा आला. वैचारिक वाढ खुंटली. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, आमच्या पिढीत मूलभूत अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माणच झाली नाही. शाळा-कॉलेजांत प्रगती करणार्‍यांनी नोकरी-व्यवसायांतही प्रगती केली. पण या भौतिक प्रगतीच्या जोडीनं बौद्धिक प्रगती क्वचितच झाली.

तसंही भौतिक प्रगतीच्या मागे धावणारा समाज व्यक्तीतील उपजत गुणांचा विकास होऊ देण्यास घाबरतो. खेळ, साहित्य, कला यांच्यामुळे भौतिक प्रगती होत नसल्याच्या समजातून त्यांच्याकडे आपसूकच समाज दुर्लक्ष करतो. असा समाज एकांगी असतो. या समाजानं भौतिक प्रगती केली तरी त्या समाजाचं खुजेपण लपत नाही. या खुजेपणातून पुढच्या पिढीनंही वेगळी वाट धरू नये, यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्याकडे खेळ, संगीत, नृत्य यांतल्या प्रावीण्यापेक्षा परीक्षेतले मार्क अधिक महत्त्वाचे समजले जातात. बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा मेडिकलला प्रवेश न घेता कलाशाखा किंवा विज्ञानशाखा निवडणारा विद्यार्थी निर्बुद्ध समजला जातो. चित्रकलेत रस असणार्‍याला सॉफ्टवेअरमध्ये 'काहीतरी' करण्याचा आग्रह धरला जातो. दुर्दैव असं की, बहुतेक तरुण या दबावाला बळी पडतात. लहानपणापासून स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हळूहळू गमावलेली असतेच. त्यातच पैसा हे मोठं आकर्षण असल्यानं आपल्याला नक्की काय आवडतं, हा विचार केलाच जात नाही, करू दिला जात नाही. खरं म्हणजे आपल्याला हव्या त्या क्षेत्रात उत्तम काम करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत आणि या आवडत्या क्षेत्रात काम करून भरपूर पैसेही कमावता येतात. पण दुर्दैवानं समोर पडलेल्या लाकडापासून प्रत्येकजण एकसारख्या खुर्च्या तयार करतो. त्या लाकडापासून सुंदर शिल्पही तयार करता येतं, हे फार थोड्यांना कळतं. कुठलीही दोन माणसं कधीच सारखी नसतात. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, त्यांच्यात असलेली कौशल्यं वेगळी. मग प्रत्येकानं सारखंच काम केलं पाहिजे, हा आग्रह का?

कॉलेजात असताना मी दुर्गाबाई भागवतांकडून एक गोष्ट ऐकली होती. श्री. गो. रा खैरनारांना एकदा दुर्गाआजींनी विचारलं, "खैरनार, तुम्ही इतकं काम करता, अनेकांच्या इमारती जमीनदोस्त करता, तुम्हांला ही शक्ती मिळते कुठून?" खैरनार म्हणाले, "दुर्गाबाई, मी लहान होतो तेव्हा माझे वडील मला नेहमी सांगायचे, ’तू तुला हवं ते कार आयुष्यात, पण जे करायचं ते प्रामाणिकपणे आणि उत्तम कर. तुला कोणी दादरच्या चौपाटीवर उभं राहून लाटा मोजायला सांगितलं, तरी त्या कामाला तू नाही म्हणू नकोस. पण लाटा अशा मोज की प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, लाटा मोजाव्यात त्या खैरनारांच्या पोरानंच’". दुर्गाबाईंनी जे सांगितलं तेच राजवाड्यातलं सुख त्यागून घराबाहेर पडलेल्या सिद्धार्थनंही सांगितलं - ’आयुष्याचं ध्येय शोधणं हेच खरं आयुष्याचं ध्येय’. बुद्धीला झापडं लावली नाहीत, तर हे ध्येय शोधणं फार अवघड नाही!

1 comments:

Harshal said...

Khupach sundar lekha aahe....kharach...aapan kharech jagato kaa?...ki nuste divas dhakalato...smruddha jivanaachi vyaakhyaa durusta karanyaachi vel aali aahe...

ashokagaikwad@gmail.com

Post a Comment