कलर्स ऑफ अब्सेन्स

on Monday 12 September 2011जहांगीर साबावालांच्या चित्रांशी ओळख होऊन आता पंधरा वर्षं होतील. अनोळखी, असुरक्षित वाटायला लावणार्‍या वातावरणात त्या चित्रांनी माझ्या मनातली भीती दूर केली होती. मला आश्वस्त केलं होतं. जहांगीर आर्ट गॅलरीत तेव्हा साबावालांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. पेपरात मोठ्ठी बातमी होती. जहांगीर साबावाला हे नाव अपरिचित असलं, तरी त्या बातमीसोबत असलेलं चित्र मला फार आवडलं. बराच वेळ त्या चित्राकडे मी बघत बसलो होतो. मग लगेचच्या रविवारी भर पावसात मी ते प्रदर्शन बघायला गेलो. मुंबईत शिकायला येऊन  तीनचार दिवस झाले होते फक्त. पण त्या बातमीतल्या चित्रानं लावलेली ओढ जबरदस्त होती. प्रदर्शनात जेमतेम पंधरावीस चित्रं मांडली असतील. अनेक चित्रांमध्ये त्रिकोणी, चौकोनी प्रतलं होती. ही प्रतलं म्हणजे डोंगरांचे, चेहर्‍यांचे, झाडांचे हिस्से होते. त्यांचेच भाग होते. त्या वस्तूंचे काप करून ते एकत्र चित्रांत मांडले होते. त्या वस्तूंच्या वेगवेगळ्या बाजू एकाच वेळी समोर आल्या होत्या. एकच वस्तू एकाच वेळी किती वेगवेगळ्या दृष्टीनं बघता येते, हे ती चित्रं सांगत होती. या शैलीला क्यूबिस्ट शैली म्हणतात, हे नंतर कळलं. अर्थात त्या शैलीबद्दल माहीत नसूनही काही फरक पडला नाही. कारण त्या चित्रांमध्ये क्यूबिझमचा इतका भन्नाट वापर केला होता, की शैलीचा अडसर न होता, चित्रकार थेट संवाद साधू शकत होता. तिथल्या प्रत्येक चित्रानं मला खिळवून ठेवलं. खूप आल्हाददायक रंग होते त्यांतले. डोळ्यांना सुखावणारे. आक्रस्ताळेपणा, आक्रमकता त्या चित्रांमध्ये मुळीच नव्हती.

ही चित्रं रेखाटणारे साबावाला गॅलरीच्या एका कोपर्‍यात उभे होते. भवताली चाहत्यांचा गराडा. पण चेहर्‍यावर प्रौढीचा लवलेशही नाही. लुकलुकणारे डोळे, साल्वादोर दालीच्या मिशीसारखी मिशी, सिल्कचा व्यवस्थित खोचलेला शर्ट आणि कॅराव्हॅट असे साबावाला त्यांच्या चित्रांइतकेच लोभस वाटत होते. साबावाला आणि त्यांची चित्रं मग मला बरेच दिवस पुरले. साबावाला नंतर भेटले ते त्यानंतर पाच वर्षांनी. मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पिकासोच्या अस्सल कलाकृतींचं प्रदर्शन भरलं होतं. अलोट गर्दी लोटली होती. बराच वेळ रांगेत उभं राहून मी दालनात प्रवेश केला, आणि समोर साबावाला दिसले. लहान मुलांना पिकासोची चित्रं समजवून सांगण्यात गुंग झाले होते ते. तीनचार तासांनी माझं प्रदर्शन बघून झालं तरी ते त्याच उत्साहानं नव्यानं आलेल्या रसिकांना पिकासो, मातिझ, त्यांची क्यूबिस्ट शैली असं सगळं समजावून सांगत होते. साबावालांची चित्रं मग मला जास्तच आवडू लागली.साबावालांची सुरुवातीच्या काळातली चित्रं विलक्षण होती. या चित्रांमधल्या मानवी आकृत्या स्पष्ट नव्हत्या. बरेचदा चित्रांमध्ये त्यांचा केवळ भास व्हायचा, किंवा कॅनव्हासाचा अगदी थोडा भाग त्यांनी व्यापला असायचा. ही चित्रं नीरव शांततेची, एकटेपणाची जाणीव करून द्यायची. मग हळूहळू साबावालांच्या चित्रांतली माणसं ठळक होत गेली. त्यांचे अवयक क्वचित स्पष्ट दिसू लागले. पण तरीही ही चित्रं बघताना या चित्रांमधली माणसं फार दूर आहेत, त्यांना एकटंच राहावंसं वाटतं, असंच जाणवत राहायचं. या माणसांना त्यांच्या चिंता, काळज्या आहेत, हेही कळायचं. ही माणसं कमकुवत असतील, लवकर मोडून पडणारी असतील अशा काय काय शक्यता जाणवायच्या. पण या माणसांची द्वंद्वं, त्यांच्या लढाया, दु:खं कधी अंगावर यायची नाहीत. भडकपणे ती प्रेक्षकाला हादरवायची नाहीत. साबावालांची एक्स्प्रेशनिस्ट आणि क्यूबिस्ट शैलीतली लॅण्डस्केपंही प्रचंड गाजली. त्यांनी चितारलेला समुद्रही अनेकांना भावला. त्यांच्या लॅण्डस्केपांमधले रंग अतिशय सौम्य होते. ही चित्रं बघितली ही मन शांत होई. त्यांनी काढलेल्या समुद्राचं पाणीही नितळ असे. रंग आणि प्रकाशाचा सुरेख मिलाफ या चित्रांमध्ये असायचा. एक आभा या चित्रांमधल्या डोंगरांभोवती, नद्यांभोवती, समुद्रांभोवती, ढगांभोवती असायची. त्यामुळे हा निसर्ग कालातीत वाटे. मजा म्हणजे, ही चित्रं क्यूबिस्ट शैलीशी जवळीक दाखवणारी असली, तरी ती या मातीतली, अस्सल भारतीय वाटत. क्यूबिझमचा संबंध हा मोडतोडीशी असतो. वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळ्या बाजू दाखवताना चित्राच्या विषयाची मोडतोड होते. हा विध्वंस बरेचदा क्यूबिस्ट चित्रांमध्ये उठून दिसतो. हा विध्वंस काहीतरी नवं घडवण्याचा प्रयत्न करत असतो. साबावालांच्या चित्रांमधला विध्वंस मात्र थेट जाणवायचा नाही. त्यांच्या चित्रांमध्ये या विध्वंसातून नव्या कल्पनांना जन्म दिलेला असायचा. नवा विचार मांडलेला असायचा. हा नवा विचार प्रेक्षकांपर्यंत विध्वंसाची जाणीव करून न देता पोहोचे. साबावालांच्या चित्रांमधले रंग ही एक खास बाब होती. आधी लिहिल्याप्रमाणे ते भारतीय होते, सौम्य होते. पण तरीही त्यांचं एक खास वेगळेपण होतं. हे रंग कधीकधी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व जाणवून देत.

साबावालांची चित्रं पलायनवादी असतात, असाही आरोप केला गेला. खर्‍या भारताशी त्यांच्या संबंध नाही, सतत उच्चभ्रू समाजात वावरल्यामुळे त्यांच्या चित्रांत लोकांच्या समस्या दिसत नाहीत, कायम बेगडी रोमॅण्टिसिझमच ते रंगवतात, असं त्यांचे टीकाकार म्हणत. पण हे फारसं खरं नव्हतं. साबावालांनी भारतातल्या समस्यांचं दर्शन जरी घडवलं नाही (प्रत्येक चित्रकारानं आपल्या चित्रांतून समाजातली दु:खं चितारलीच पाहिजेत, असं म्हणणं मूर्खपणाचंच आहे!), तरी त्यांच्या चित्रांत इथली माणसं होती. इथला भवताल होता. इथला संघर्षही होता. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातले बदल साबावालांनी बघितले होते. त्या काळच्या ताणतणावांचे ते साक्षीदार होते. हा काळही त्यांच्या चित्रांमध्ये उमटला. काळाप्रमाणे त्यांची चित्रंही बदलली. अगदी निसर्गचित्रांमध्येही हा बदल संयतपणे दिसून आला. साबावालांच्या नंतरच्या चित्रांतलं आभाळ हे छपरासारखं दिसतं. विश्वाला सामावून घेणारं.साबावालांची चित्रं त्यांच्या समकालीनांच्या चित्रांपेक्षा जरा वेगळी होती. एम. एफ. हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून बदलता भारत दाखवला. असंख्य वेगवेगळे विषय हाताळले. तय्यब मेहतांसारख्या काहींनी भारतातले सामाजिक कप्पे समोर आणले. सहा दशकांच्या कारकिर्दीत साबावालांनी मात्र निसर्ग, माणसं आणि या दोहोंच्या अनेक शक्यता कॅनव्हासावर जिवंत केल्या. त्यांच्या चित्रांमध्ये क्यूबिझमनं अस्सल देशी रंगसंगतीशी मस्त घरोबा केला होता. अतिशय जिवंत, ताज्या, भारतीय रंगांमधली ती चित्रं होती.

जहांगीर साबावालांचा जन्म १९२२ साली एका गर्भश्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मातुल आजोबा म्हणजे सर कोवासजी जहांगीर. तंबाखूच्या व्यापारात या कुटुंबानं अमाप पैसा मिळवला होता. मुंबई विद्यापीठातल्या अनेक इमारती, लंडनमधली अनेक कारंजी या कुटुंबानं बांधली होती. मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी, पुण्याचं जहांगीर रुग्णालय यांना सर कोवासजी जहांगीर यांचंच नाव दिलं आहे. साबावालांच्या मातु:श्री, बाप्सी साबावाला हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. बाहुल्यांचा प्रचंड मोठा संग्रह त्यांनी केला होता. ताज महाल हॉटेलाच्या जिन्यावर त्यांनी एकदा घोडा चढवला होता. साबावाला त्यामुळं वैचारिकदृष्ट्या अतिशय मुक्त अशा वातावरणात वाढले. नवनव्या कल्पनांना त्यांच्या घरात मुक्त प्रवेश होता. विचार करण्यावर आडकाठी नव्हती.  आपल्या आईबरोबर लहानपणी साबावालांनी भरपूर प्रवास केला. भारत, युरोप त्यांनी पालथा घातला. या प्रवासातच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. औपचारिक कलाशिक्षणासाठी त्यांनी नंतर जे. जे. कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी मिळवल्यानंतर साबावाला काही काळ लंडनमध्ये राहिले, आणि नंतर त्यांनी पॅरिस गाठलं. इथे त्यांच्यातल्या चित्रकाराला मोकळं आकाश मिळालं. क्यूबिस्ट शैलीशी चांगलीच ओळख झाली. तर्‍हतर्‍हेची माणसं त्यांना तिथे भेटली. अनेक नव्या ठिकाणांशी त्यांची मैत्री झाली. नव्या कल्पनांचं, विचारांचं स्वागत करणार्‍या या शहरानं खर्‍या अर्थानं साबावालांमधल्या चित्रकाराला प्रेरणा दिली. पॅरिसमध्ये असतानाच १९५२ साली त्यांची काही चित्रं व्हेनिसच्या द्वैवार्षिक कलाप्रदर्शनातही मांडली गेली.१९५७ साली साबावाला आपल्या पत्नीसह भारतात परतले, आणि समकालीन कलाचळवळीत आपलं स्थान निर्माण केलं. भारतातल्या कलाप्रेमींना त्यांच्या चित्रांबद्दल आपुलकी निर्माण झाली होतीच. १९५२ साली साबावालांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन मुंबईच्या ताज महाल हॉटेलातल्या एका खोलीत भरलं होतं. एम. एफ. हुसेनांच्या मदतीनं त्यांनी आपली चित्रं मांडली होती. हे पहिलंच प्रदर्शन तसं बर्‍यापैकी गजाली. काही चित्रंही विकली गेली. मग नंतर देशविदेशात त्यांच्या चित्रांची पन्नासेक प्रदर्शनं भरवली गेली. २००५ साली दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात त्यांच्या चित्रांचं सिंहावलोकन आयोजित करण्यात आलं. त्यांची अनेक चित्रं भरपूर किमतीला विकली गेली. ’आता मला मी मोठा चित्रकार झाल्यासारखा वाटतो आहे’, असं ते तेव्हा गमतीत म्हणाले होते. साबावाला खूप मोठे चित्रकार झाले, तरी त्यांनी त्यांचं माणूसपण सोडलं नाही. त्यांचा मूळचा ऋजु स्वभाव कधी लोपला नाही. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांतल्या लोकांशी ते कायम आपुलकीनंच वागले. त्यांचं हे प्रेमळ वागणं कधीच कोणाला खोटं वाटलं नाही. ’एक सहृदय कलाकार’ अशीच त्यांची ओळख कायम राहिली.

सां जुआं द ला क्रूझची एक कविता साबावालंना फार आवडे.

The conditions of a solitary bird are five: The first, that it flies to the highest point; the second, that it does not suffer for company, not even of its own kind; the third, that it aims its beak to the skies; the fourth, that it does not have a definite colour the fifth, that it sings very softly.

या कवितेतल्या पक्ष्याचं वर्णन साबावालांना चपखल लागू होतं. आकाशात उंचच उंच भरारी घेणार्‍या, ऋजु, स्वत्व जपणार्‍या पक्ष्यासारखे असलेले साबावाला आपल्या चित्रांमधून कायम स्मृतीत राहतील.(लेखात वापरलेल्या चित्रांचा प्रताधिकार संबंधितांकडे सुरक्षित. चित्रं वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घेतली आहे.)

0 comments:

Post a Comment