जेआरचे ’सामान्य’ फोटो

on Monday 22 August 2011



ला गुलेत हे ट्युनिझियातलं एक बर्‍यापैकी मोठं शहर. खरं म्हणजे ट्युनिझ या राजधानीच्या शहराचं एक उपनगरच. इथला राजवाडा मोठा देखणा. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ट्युनिझियात राज्यक्रांती झाली, त्या वेळी या राजवाड्याची बरीच मोडतोड झाली होती. आतल्या मौल्यवान चीजवस्तूही लुटून नेल्या गेल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला एका सकाळी लोकांना या राजवाड्याच्या भिंतींवर मोठ्ठी चित्रं लावलेली दिसली. ही चित्रं म्हणजे स्त्रीपुरुषांचे भलेमोठे कृष्णधवल फोटो होते. हळूहळू बरीच गर्दी या चित्रांना पाहण्यासाठी जमा झाली. फोटो फार सुरेख होते. सामान्य माणसांचेच होते. पण हे चेहरे काही ओळखीचे वाटत नव्हते. हे फोटो या भिंतींवर कोणी आणि का लावले आहेत, हेही लोकांना कळेना. मग तिथे काही तरुण आले, आणि फोटो लावण्याचा हा प्रकार म्हणजे काहीतरी खोडसाळपणा असावा, अशा समजुतीतून त्या दहाबारा तरुणांनी ती पन्नासेक चित्रं पाच मिनिटांत फाडून टाकली.



ला गुलेतच्या भिंतींवरचे ते फोटो लावले होते जेआर या फ्रेंच कलाकारानं. जेआरचं खरं नाव कुणालाच माहीत नाही. पण त्यानं काढलेले भन्नाट फोटो मात्र जगभर प्रसिद्ध आहेत. १९९९ साली पॅरिसमधल्या एका रेल्वेगाडीत त्याला एक जुना कॅमेरा सापडला. या कॅमेर्‍यानं फोटो काढत युरोपभर हिंडला. या प्रवासात त्याच्या लक्षात आलं की, आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर स्ट्रीट आर्ट, म्हणजे रस्त्यावरची कला, हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. भिंतींवर, रस्त्यांवरची चित्रं लोकांच्या सतत नजरेत राहतात, त्यांच्याशी थेट संवाद साधतात. बान्स्की या इंग्लंडमधल्या थोर कलाकाराचं उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर होतंच. जेआरनं मग अशा काही कलाकारांचा शोध घेतला. सार्वजनिक भिंती, रस्ते रंगवणं हा बहुतेक सगळ्यांच देशांत गुन्हा असल्यानं असे अनेक कलाकार आपली ओळख कधीच जाहीर करत नाहीत. जेआर मात्र त्यांपैकी अनेकांना भेटण्यात यशस्वी ठरला. या अनुभवांच्या शिदोरीवर त्यानं पॅरिसमध्ये कामाला सुरुवात केली. २००२ आणि २००३ साली पॅरिसमधल्या अनेक इमारतींवर त्यानं काढलेले फोटो लोकांना दिसले. हे फोटोही सामान्यांचेच होते. त्यांचे चेहरे, किंवा नुसते नाक, डोळे. पण खिळवून ठेवणारे. लोकांना हे फोटो आवडले तरी ज्या इमारतींच्या भिंतींवर ते चिकटवले होते, त्यांना ते आवडणं शक्यच नव्हतं. नगरपालिकेचाही आक्षेप होताच. हे फोटो मग लगेच काढून टाकू जाऊ लागले. २००६ साली मात्र एक मजेदार घटना घडली. जेआरनं पॆरिसमधल्या गुंडांचे, चोरांचे फोटो काढले, आणि बूर्झ्वा, उच्चभ्रू वस्तीतल्या इमारतींवर चिकटवले. अनेक देखण्या इमारतींच्या भिंतींवर हे मोठ्ठेच्या मोठ्ठे फोटो झळकले आणि एकच खळबळ माजली. जेआरची कलाकारी बघायला एकच झुंबड उडाली. नगरपालांकडे तक्रारीही गेल्या. पण बहुतकरून लोकांना जेआरचे फोटो आवडले. त्याला त्या फोटोंमधून काय सांगायचं आहे, ते लोकांना व्यवस्थित कळलं. लोकांचा प्रतिसाद बघून पॅरिसच्या सिटी कौन्सिलीनं त्यांच्या इमारतीवरही असेच फोटो लावण्याची जाहीर विनंती जेआरला केली, आणि जेआरच्या कलेला अधिकृत संमती मिळाली. परवानगी न घेता इमारतींवर फोटो लावले, म्हणून त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही.



पुढच्याच वर्षी त्यानं इस्रायल आणि पॅलेस्ताइनमध्ये भरवलेलं ’फेस टू फेस’ हे प्रदर्शन मात्र जगातलं सर्वांत मोठं अनधिकृत प्रदर्शन ठरलं. या प्रदर्शनासाठी जेआरनं या दोन्ही देशांत काम करणार्‍या समाजसेवी संस्थांची मदत घेतली. या संस्थांच्या कार्यकर्त्यांसमवेत या देशांतल्या अनेक लहान गावांमध्ये तो तिथल्या लोकांचे फोटो घेत फिरला, आणि एका रात्री हे सारे फोटो या दोन देशांतल्या आठ शहरांतल्या मुख्य इमारतींवर आणि या देशांना अलग करणार्‍या सीमेवरच्या उंचच उंच भिंतींवर लावले गेले. सीमेच्या दोन्ही बाजूंना सारखीच सुखदु:खं असलेली साधी माणसं आहेत. ती दिसतातही सारखीच. कोणाच्या डोक्यावर शिंगं नाहीत, की कोणाला तीन डोळे नाहीत. मग मारामार्‍या का करायच्या? जेआरला जे सांगायचं होतं, ते लोकांनी कदाचित उचलून धरलं. कारण त्याच्या चित्रांविरुद्ध कोणीच तक्रारी केल्या नाहीत. अनेक महिने ती तशीच होती. लोक या चित्रांना बघायला दररोज यायचे. मग सीमावर्ती प्रदेशात अशी गर्दी होणं योग्य नाही, असं सांगत दोन्ही बाजूच्या सरकारांनी ती चित्रं काढून टाकली.



नंतरची दोन वर्षं जेआर स्त्रियांचे फोटो काढत जगभर हिंडला. केनया, ब्राझील, रशियापासून ते दिल्लीपर्यंत असंख्य देशाशहरांमधल्या स्त्रियांना त्यानं आपल्या कॅमेर्‍यानं टिपलं. जगभरात कुठेही राज्यक्रांत्या, युद्धं, आंदोलनं झाली तरी भरडल्या जातात त्या स्त्रियाच. सर्वाधिक दु:खं त्यांच्या वाट्याला येतात. पण सार्‍या पडझडीतून लवकर सावरतातही त्याच. स्वत: तर उभ्या राहतातच, पण देशालाही उभं करतात. हे सांगणारी दोन वर्षांची त्याची सारी मेहनत गेल्या वर्षी कान चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं ’विमेन आर हीरोज’ या नावाच्या प्रदर्शनात तिथल्या रसिकांना बघायला मिळाली. याच दरम्यान ब्राझीलमधल्या, लेबनानमधल्या झोपडपट्ट्या आणि रेल्वेगाड्या, आफ़्रिकेतले बाजार आणि तुटके पूल त्याच्या फोटोंनी सजले.



जेआरनं काढलेले फोटो कलेच्या व्याख्येत बसतात का, या कलेची ’उपयुक्तता’ काय, असे प्रश्न आजवर कोणी उपस्थित केलेले नाहीत. जेआरचे फोटो अस्वस्थ करतात. विचार करायला भाग पाडतात. पण हा विचार ते फोटो बघितल्याक्षणी सुरू होत नाही. हे फोटो आठवणींत रुतून बसतात. एखाद्या फोटोतले भेदक डोळे, कुणाचं निखळ हसू, चेहर्‍यावरची वेदना मनात घर करून राहतात. हे फोटो सतत आठवत राहतात. कोण आहेत हे लोक? कुठे राहतात? त्या एका फोटोतली मुलगी किती सुरेख होती दिसायला, पण तिच्या चेहर्‍यावर हास्य का नव्हतं? आणि त्या आजीबाई..चेहरा सुरकुतलेला, पण किती आनंदी.. हे असलं काय काय डोक्यात येत राहतं. मग लोकांना कळतं की, माणसं इथूनतिथून सारखीच की. आपण सारेच सामान्य. आणि सारखे. जेआरच्या फोटोंनी सामान्यांच्या कथा जगासमोर आणल्या. त्यांनाही आवाज आहे, आणि त्यांनाही काही सांगायचं आहे, हे त्यांनं जगाला सांगितलं. सामान्यांचे आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नाहीत, तरी सामान्यांपर्यंत तरी पोहोचायला नकोत का? शिवाय या कामात त्यानं सामान्यांना सहभागीही करून घेतलं. अनेक देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या हाती कॅमेरा दिला. आपल्या ओळखीच्यांचे फोटो या लोकांनी काढले. म्हणूनच रशियातले कोणी आजोबा आफ्रिकेतल्या एका इमारतीवर जाऊन बसू शकले. अनेक सामान्यांची सामान्यांशी ओळख करून दिली, सामान्यांच्या या कथा फोटोंद्वारे जगासमोर मांडल्या, म्हणूनच कदाचित जेआरच्या कलेची चिकित्सा करायला कोणी धजावत नसेल.

काही महिन्यांपूर्वी ट्युनिझियातली सामान्य जनता रस्त्यावर उतरली, आणि राजेशाही उलथवून टाकली. अरबस्तानाला सापडलेला सामान्यांचा हा आवाज परत दबून जाऊ नये, म्हणून जगभरातल्या सहा फोटोग्राफरांसह जेआरनं ट्युनिझियात फोटो काढले. पूर्वी प्रत्येक शहरात, गावात, प्रत्येक चौकात, इमारतींवर बेन अली या हुकूमशहाचा फोटो असे. आता तिथे जेआरनं काढलेले ट्युनिझियाच्या नागरिकांचे फोटो आहेत. ला गुलेतचे फोटो फाडले गेले म्हणून जेआरनं लोकांना आपला उद्देश समजावून सांगितला. सामान्य माणूस किती मोठा असतो, हेच हे फोटो सांगत आहेत, हे कळल्यावर लोक अतिशय आनंदले. हे फोटो आता कदाचित कायमच त्या भिंतींवर राहतील. सामान्यांचा आवाज दडपण्याची चूक बेन अलीला महागात पडली. जेआरचे फोटो बघितल्यावर ही चूक पुन्हा करण्यास कोणी धजावणार नाही. सामान्यांमध्ये प्रचंड शक्ती असते. लोक सामान्य असले तरी ही शक्ती, हा आवाज असामान्य असतो. या शक्तीची जाणीव मात्र लोकांना नसते. या जगातला प्रत्येक माणूस मूलत: सारखा आहे, त्याच्यातली सुप्त शक्ती जागृत झाली की, सार्‍या अमंगलाचा विनाश होऊ शकतो, हे शिकायचं असेल, तर जेआरचे फोटो बघायलाच हवेत.


0 comments:

Post a Comment