स्वागत

on Tuesday, 19 April 2011
माहेर’तर्फे तुम्हां सर्वांना मन:पूर्वक अभिवादन!
हे वाक्य लिहिताक्षणी लहानपणी कधीतरी वाचलेली गोष्ट आठवली.

एक गरीब शेतकरी होता. तो मजल-दरमजल करीत आपल्या थोरल्या लेकीला भेटायला गेला. तीही एका शेतकर्‍याचीच बायको होती. लेकीपाशी पोहोचताच त्याला ती सचिंत बसलेली दिसली. बापानं मायेनं काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, "पावसाची वाट बघतेय. नाहीतर पेरलेलं सगळं वाया जाईल". तिला आश्वस्त करीत थोड्या वेळानं बाप आपल्या दुसर्‍या लेकीकडे निघाला. ती कुंभाराची सून होती. तिच्या गावाला पोहोचताच तीही त्याला चिंताग्रस्त दिसली. पुन्हा तोच मायेचा प्रश्न! त्यावर ती म्हणाली, "बाबा, पाऊस पडला तर सुकायला ठेवलेल्या माझ्या गाडग्यामडक्यांचं काय? पोटाचा प्रश्न आहे!" तिच्या मनाला बरं वाटेलसं बोलून शेतकरी परत निघाला खरा, परंतु त्याच्या मनात देवासाठी एकच सवाल होता, ’मी कुणासाठी प्रार्थना करू? पाऊस पडावा म्हणून केली, तर धाकटी लेक नाराज होईल आणि न पडावा म्हणून केली, तर थोरलीचं नुकसान होईल!’

ही गोष्ट आठवण्यामागे एक कारण आहे. १९६२ साली जानेवारी महिन्यात ’माहेर’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. अंकाची किंमत होती एक रुपया. ’ललनांचे नियतकालिक’ असं त्याचं स्वरूप होतं. जगभरात पसरलेल्या मराठी स्त्रियांना या मासिकानं हक्काचं व्यासपीठ दिलं. या पाच दशकांत वाचकांनी या मासिकावर भरभरून प्रेम केलं. गेल्या वर्षी ’मीडियानेक्स्ट’ या कंपनीनं ’मेनका प्रकाशन’ विकत घेतलं आणि ’माहेर’ हे मासिक नव्या रूपात जानेवारी महिन्यापासून येऊ लागलं. 

या पन्नास वर्षांत समाजात कितीतरी मोठे बदल झाले. तसं कालौघात सगळं सगळं थोडंसं बदलत असतंच. माणसं बदलतात, परिसर बदलतो, नाती बदलतात, मित्रमैत्रिणी बदलतात..एवढंच कशाला, आपणही नाही का काळानुसार बदलत जात? ही बदलाची प्रक्रिया कधी थेट तर कधी नकळतपणे, कधी ढळढळीत तर कधी सूक्ष्मपणे घडत असते. बदलांचं प्रमाण तेवढं व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं, एवढंच! त्यामुळे नवी माणसं आली, की बदलही काहीसा अपरिहार्यच. ’माहेर’चं स्वरूपही आता बदललं आहे. अर्थात हे बदल करताना त्या शेतकरी बापाइतका अवघड तिढा नव्हता. कारण जुन्या आणि नव्या वाचकांना सुखावतील असेच हे बदल आहेत. वेगवेगळ्या विचारांना चालना देणारे आहेत. स्त्री-पुरुषांनी, स्त्री-पुरुषांसाठी, स्त्री-पुरुषांच्या मदतीनं चालवलेलं हे मासिक आहे. 

या नवीन स्वरूपात ’माहेर’ आता आपल्याला आंतरजालावर, या पानावर नियमितपणे भेटणार आहे. गेल्या पन्नास वर्षांत ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, अरविंद गोखले, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी ’माहेर’मधून लेखन केलं. या दिग्गजांच्या निवडक कथा-कविता, तसंच नव्या दमाच्या साहित्यिकांचं लेखन इथे आपल्याला वाचता येईल. भवतालचे बदल, नवीन पायंडे, साहित्य-संस्कृती-कलाक्षेत्रातल्या घडामोडी आपल्याला इथे वाचायला मिळतील. दर महिन्याला प्रकाशित होणार्‍या ’माहेर’मधल्या कथा, ललित आणि इतर लेखांची माहिती आपल्याला इथे मिळू शकेल. शिवाय, आपल्यालाही आंतरजालावरील ’माहेर’मध्ये सहभागी होता येईलच. 

जगभरात विखुरलेले आपण या पुढेही ’माहेर’वर असंच प्रेम करत राहाल, याची खात्री आहे. गदिमांनी ’माहेर’च्या पहिल्या अंकासाठी एक कविता लिहिली होती. या कवितेचं शीर्षक होतं ’माहेर’. आंतरजालावरील ’माहेर’चा हा प्रवास आपण त्या पहिल्यावहिल्या अंकातील कवितेपासून करूया. 

नदी सागरां मिळतां,
पुन: येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर.

काय सांगू रे बाप्पांनो
तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराला जाते,
म्हणुनीच जग चाले.

सारें जीवन नदीचें,
घेतो पोटांत सागर
तरी तिला आठवतो,
जन्म दिलेला डोंगर.

डोंगराच्या मायेसाठीं,
रूप वाफेचें घेऊन
नदी तरंगत जाते,
पंख वार्‍याचे लावून.

पुन: होऊन लेंकरूं,
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरां,
आणि येतो पावसाळा.


***


1 comments:

Meenakshi Hardikar said...

वा ! सुरूवात तर छानच झालीये. माहेरच्या ऑनलाइन अंकाला खूप शुभेच्छा!

Post a Comment