‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’साठी मेनका प्रकाशनाच्या अभ्यासपुस्तिका

on Monday 20 June 2011

विज्ञानाचा ‘शास्त्रशुद्ध’ अनुभव म्हणता येईल अशी लेखी, प्रात्यक्षिक प्रकल्प आणि मुलाखत या चार टप्प्यांची ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा’ दिवसेंदिवस महाराष्ट्रात लोकप्रियत होत आहे. मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणारी ही स्पर्धा स्कॉलरशिप परीक्षेप्रमाणे शैक्षणिक जीवनाचा महत्त्वाचा टप्पा ठरू पाहत आहे. दरवर्षी सहावी आणि नववीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धापरीक्षा घेतली जाते. या परीक्षेत घोकंपट्टीला अजिबात वाव नसतो. लेखी परीक्षेबरोबरच प्रकल्प, मुलाखत यांद्वारे विद्यार्थ्यांच्या विज्ञानवृत्तीला जोखलं जातं. या प्रकल्पांतून विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कल्पनांची व त्यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी अत्यंत आनंददायक असा हा प्रवास असतो. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या हेतूने शिक्षण पद्धतीत दिसणार्‍या बदलांच्या पार्श्वभूमीवर बुद्धिमान मुलांना आव्हानात्मक वाटेल तसेच त्यांची ज्ञानतृष्णा वाढेल, असा पर्याय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध आहे.

यंदा मेनका प्रकाशनातर्फे या स्पर्धेसाठीच्या अभ्यासपुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सहावी व नववीसाठीच्या वेगळ्या पुस्तिका आहेत. स्पर्धेचं स्वरूप, लेखी परीक्षेसाठी व मुलाखत, प्रकल्प यांसाठी तयारी कशी करावी, मागल्या तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरं, स्पर्धेत पूर्वी यशस्वी ठरलेल्या बालवैज्ञानिकांची मनोगतं, संदर्भसूची यांचा अंतर्भाव या पुस्तिकांमध्ये केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या आवडीमधून सृजनशीलता बहरावी या हेतूनं महाराष्ट्रात अनेक वैज्ञानिक आणि संस्था कार्यरत आहेत. त्यांपैकीच एक डॊ. अनिकेत सुळे. . अनिकेत सुळे मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात कार्यरत आहे. विज्ञानचळवळीचा प्रसार हे या केंद्राचं उद्दिष्ट आहे. दरवर्षी आयोजित होणार्‍या विज्ञान विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धांची तयारीही या केंद्रात करून घेतली जाते. खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून अनिकेत काम करतो. अनिकेतच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी गेली काही वर्षं अनेक पदकांची कमाई करून पदकतालिकेत भारताला प्रथमस्थान मिळवून दिलं आहे. याशिवाय व्याख्यानं, लेख यांच्या मदतीनं शालेय विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याचं हे मनोगत -



 महाराष्ट्राची भूमी ही विद्वानांची भूमी म्हणून नावाजलेली आहे. पुरातन काळापासून या भूमीने अनेक तत्त्ववेत्ते, अनेक विचारवंत निर्माण केले आहेत. भारतातील सर्वांत जुन्या विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाची गणना होते. कित्येक नावाजलेल्या संस्थांचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललेले आहे.
भारतातील नवशिक्षणाची (ज्याला काही लोक पाश्चिमात्य शिक्षण असे म्हणतात) सुरुवात ही विद्यापीठांच्या स्थापनेने झाली असे म्हणता येईल. १८५७मध्ये पहिली विद्यापीठे मुंबई, कोलकता व चेन्नई इथे स्थापन झाली. सुरुवातीची काही दशके हुशार तरुणांचा ओढा हा वकील किंवा आय.ए.एस. अधिकारी बनण्याकडे होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जवळजवळ सर्वच नेते हे वकील किंवा आय.ए.एस. अधिकारी होते. लोकमान्य टिळक हे याचे एक मुख्य उदाहरण म्हणता येईल. लोकमान्यांची प्रतिभा चतुरस्र होती. व्यासंग प्रचंड होता. अनेक वैज्ञानिक विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. लोकमान्य राजकारणात गुरफटल्याने भारत एका थोर वैज्ञानिकाला मुकला, असेही आपण म्हणू शकतो.

ही परिस्थिती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बदलू लागली. या बदलांची नांदी कोलकात्याहून झाली. जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद सहा यांचे संशोधन जगभर नावाजले गेले. सर सी. व्ही. रामन यांच्या कारकिर्दीची सुरुवात देखील कोलकाता येथे झाली. प्रफुल्लचंद्र रे यांनी भारतातील रासायनिक संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. याच परंपरेतील पुढचा शिलेदार मात्र वेगळा निघाला. एका सधन पारशी कुटुंबात शंभर वर्षांपूर्वी (३० ऑक्टोबर १९०९) जन्मलेल्या होमी ज. भाभा यांनी पदार्थविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तीसच्या दशकात केंब्रिजला प्रयाण केले व दिगंत कीर्ती मिळवली.

१९३९मध्ये ते सुट्टी घालवण्यासाठी भारतात आले असतानाच युरोपात दुसर्‍या महायुद्धाचा वणवा भडकला आणि भाभांना परत जाणे अशक्य होऊन बसले. या एका घटनेने भारतीय विज्ञानाचा संपूर्ण इतिहास बदलून टाकला. भारतात अडकलेल्या भाभांनी सुरुवातीला काही वर्षे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे नोकरी पत्करली. मात्र देशातील विज्ञानक्षेत्राबद्दल काहीतरी अधिक करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटांशी पत्रव्यवहार करुन मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करणार्‍यांसाठी त्यांच्या मूळ गावी, अर्थातच मुंबईमध्ये, नवीन संस्था उभारण्याची त्यांनी तजवीज केली.
आज जगप्रसिद्ध असलेल्या टीआयएफआर (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च) ही १९४५मधली छोटी सुरुवात होती. सुरुवातीला भाभांच्या आत्याच्या पेडर रोड येथील बंगल्यामधून (केनिलवर्थ) सुरू झालेली ही संस्था लवकरच ओल्ड यॉट क्लब (गेटवेजवळ) हलवली गेली. आज भारतभर पसरलेल्या अणुऊर्जा विभागाचा संपूर्ण कारभार याच जागी उभ्या असलेल्या अणुशक्ती भवनातून चालवला जातो.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी देशाचा हा भाग ’मुंबई इलाखा’ म्हणून ओळखला जात असे. पन्नासच्या दशकात भाभांचे लक्ष भारताला अणुऊर्जासंपन्न करण्यावर केंद्रीत झाले होते. टीआयएफआरच्या तत्कालीन कामांसाठीही मुळात ही जागा अपुरी पडत होती आणि अणुउर्जेसंबंधी प्रयोग करण्यासाठी लोकवस्तीपासून दूर प्रचंड मोठ्या जागेची आवश्यकता होती. भाभांनी नेहरूंकडे टीआयएफआरसाठी कुलाब्यामधील नौदलाच्या ताब्यातील काही जागेची मागणी केली आणि अणुउर्जेच्या प्रयोगांसाठी मुंबई सरकारकडे मानखुर्दच्या निर्जन जंगलांतल्या टेकडीपलीकडचा भाग मागितला.

मुंबई सरकारने या प्रकल्पाचे देशासाठीचे महत्त्व आणि त्याच्या भविष्यातील गरजा ओळखून भाभांनी मागितलेल्या जागेपेक्षा कितीतरी मोठी जागा या प्रकल्पासाठी दिली. आज मुंबई-पुणे महामार्गाला लागून असलेल्या या जागेवर भाभा आण्विक संशोधन केंद्राचा पसारा उभा आहे. 'अप्सरा' ही पहिली प्रायोगिक अणुभट्टी मानखुर्दला उभारल्यानंतर व्यावसायिक अणुऊर्जानिर्मितीचे पहिले केंद्र उभारण्याचा मानदेखील महाराष्ट्रालाच (तारापूर) मिळाला. गेल्या काही वर्षांत अणुऊर्जा विभाग तारापूर अणुभट्टीमध्ये सुधारणा करुन, तसेच नव्या अणुभट्ट्या उभारुन तिची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे.

विज्ञानशिक्षणाच्या क्षेत्रात भारत सरकारने आयआयटीची स्थापना मुंबईमध्ये केल्याने तंत्रज्ञान नकाशावर महाराष्ट्राचे नाव आले. मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात मुंबईमध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (आता 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स') खूप नाव होते. या दोन संस्थांनी गेल्या ५० वर्षांत अनेक हिरे आपल्या देशालाच नव्हे तर जगाला दिले. रसायनशास्त्रातील संशोधनासाठी भारत सरकारने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची निर्मिती पुण्याला केली. त्याचबरोबर प्रजनन संशोधन संस्था, हाफकिन इन्स्टिट्यूट, भारतीय लोकसंख्या विज्ञान संस्था, विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान विभाग (यूडीसीटी, आता 'रासायनिक तंत्रज्ञान संस्था') यांच्यामुळे महाराष्ट्रात विज्ञान संशोधन करु इच्छिणार्‍यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले.
सत्तरच्या दशकात मुंबई विद्यापीठाने भौतिकशास्त्राचा वेगळा विभाग सुरु करुन उत्तमोतम शिक्षकांना आमंत्रित केले. पुढे काही वर्षांनी पुणे विद्यापीठाने तोच कित्ता गिरवत विज्ञानविभागांना नावारुपाला आणले. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने पुणे येथे 'आयआयएसईआर' (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च, जिला 'आयसर' असंही म्हटलं जातं) आणि मुंबई विद्यापीठांतर्गत 'सीबीएस'ची (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस) सुरुवात करुन विज्ञान शिक्षणाचे नवे दालन उघडले आहे.

ह्याच काळात टीआयएफआरची प्रगती धडाक्यात चालू होती. मूलभूत संशोधन करता करता येथील शास्त्रज्ञांनी अनेक इतर उपक्रम हाती घेतले. प्रा. उदगांवकरांसारखे वरिष्ठ प्राध्यापक संशोधन करता करता शहरांतील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग घेत होते आणि आंतरराष्ट्रीय अणुप्रसारबंदी चळवळीमध्ये (पगवॉश चळवळ) हिरीरीने सीएमसी कंपनीची निर्मिती झाली. टीआयएफआरमधील शास्त्रज्ञांची ग्रामीण वा इतर प्रगतीशील शालेय विद्यार्थ्यांना योग्य तर्‍हेने विज्ञान शिकवण्याची तळमळ होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राला जन्म देऊन गेली.

मात्र आजच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बदलली आहे. कर्नाटक व तामिळनाडूने अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण केल्यावर महाराष्ट्रानेही तेच मॉडेल अवलंबले. व्यावसायिक शिक्षणाचे खूप पर्याय उपलब्ध झाल्याने दर्जाचा विचार न करता हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला अशा महाविद्यालयांमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. अर्थातच मूलभूत विज्ञानाकडे येणार्‍या चांगल्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. विद्यार्थीसंख्या कमी होऊ लागल्याने आणि हुशार विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने मूलभूत विज्ञानशिक्षणात सर्वच घटकांकडून ढिलाई दाखवली जाऊ लागली. यातूनच मग अभ्यासक्रमांत गरजेपेक्षा जास्त पाणी घालणे, मुलांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षकांचा दर्जा घसरवणे, विषयांतील मूलभूत घटक बाजूला ठेवून तांत्रिक व उपयोजित घटक शिकवणे, कॉलेजांना सरकारी मदत वेळेवर न मिळणे, शिक्षकांचे पगार वेळेवर न मिळणे असे प्रकार सुरू झाले.

या अशा पाणीदार अभ्यासक्रमाच्या छायेत वाढलेले विद्यार्थी उत्तम शिक्षक बनू शकत नाहीत आणि जे काही थोडेफार चांगले विद्यार्थी मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात असतात ते सरकारची शिक्षणाविषयी अनास्था पाहून शिक्षक होण्यास कचरतात. गेल्या दोन वर्षांतील बातम्यांवर नजर टाकली तर एक विदारक चित्र समोर येते. २००८नंतर आयआयटी, आयआयएम, आयसर व केंद्रिय विद्यापीठे मिळून ३०-४० नवीन संस्था केंद्र सरकारने जाहीर केल्या. त्यांतील महाराष्ट्राच्या वाट्याला किती? शून्य! आज महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये एकतर अजिबात संशोधन होत नाही किंवा होणारे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाचे नसते (पुणे विद्यापीठ हा एक सन्माननीय अपवाद!).

आज अनेक नव्या दमाचे शास्त्रज्ञ बंगालमधून येताना दिसतात याचे कारण म्हणजे तिथे मूलभूत विज्ञान शिक्षणास कोणाकडूनच कमी लेखले जात नाही. आयसर, पुणे, किंवा सीबीएस, मुंबई, यांसारख्या महाराष्ट्रातील संस्थांमध्ये प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे असतात. आज इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससारख्या एके काळच्या नावाजलेल्या संस्थेला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतर संस्थांपुढे हात पसरावा लागतो किंवा टीआयएफआरला नवीन जागेच्या शोधात आंध्र प्रदेशात जावे लागते. महाराष्ट्राला हे नक्कीच भूषणावह नाही.
मग मी विज्ञानाकडे का वळलो?

मी फार वयस्कर नाही पण तरीही जिच्या शालेय जीवनास कधी केबल टीव्हीचा किंवा इंटरनेटाचा स्पर्श झाला नाही अशा पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. घरात टीव्ही असणे हीच मुळात अपूर्वाई होती. डीडी आणि डीडी मेट्रोचे प्रसारण २४ तास होत नसे. आमच्या घरात केबल टीव्हीने प्रवेश साधारण मी नववी/दहावीत असताना केला. मी वापरलेला पहिला कंप्यूटर हा ३८६ होता आणि अकरावीत असताना मला पहिल्यांदा 'इंटरनेट' नावाची काहीतरी एक नवी गोष्ट आहे आणि व्हीएसएनएलकडून विद्यार्थ्यांना 'टेक्स्ट ओन्ली' (मजकुरासाठी फक्त) इंटरनेट स्वस्तात मिळते, याचा शोध लागला. सांगण्याचा मुद्दा हा की, त्या काळात 'स्वत:ला शोधायला' मुलांकडे वेळ होता. अर्थात स्वत:ला शोधायचे म्हणजे एकावेळी दहा-पंधरा 'हॉबी क्लास' आणि 'पर्सनॅलिटी डिव्हलपमेंट क्लास'ना जायचे असे नाही. पाचवीत असताना एकदा मला आईबाबांनी सहज म्हटले की, सायनला हौशी खगोल अभ्यासकांचा एक गट आहे. तुला शाळेत गणित आणि विज्ञान आवडते तर कदाचित तुला खगोलशास्त्र आवडेलही! जाऊन बघायचे का? नाही आवडले तर नंतर परत नको जाऊया. माझ्या खगोलशास्त्राशी झालेल्या मैत्रीची ती सुरुवात होती.

बारावीला पोहोचेपर्यंत ही आवड एवढी मनात पक्की बसली होती की, चांगले मार्क असूनही मी हट्टाने इंजिनीअरिंगचा फॉर्म भरला नाही आणि बी.एस्सी फिजिक्सला प्रवेश घेतला. आयआयटीमधून एम. एस्सी फिजिक्स केल्यावर पीएच. डीसाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. जर्मनीमध्ये खगोलशास्त्राबरोबरच अनेक गोष्टी शिकत गेलो. कामाच्या वेळात शेजारच्या टेबलवरील माणसांशी गप्पाही न मारणारे, रात्री बारा वाजताही रस्ते रिकामे असताना सिग्नलचा मान राखणारे जर्मन, हे मनावर एक वेगळा परिणाम करुन गेले. पीएच. डीनंतर मुंबईला परत येऊन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये (होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन) कामाला सुरुवात केली. टीआयएफआरने या केंद्राची स्थापना विज्ञानशिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने केली आहे.

होमी भाभा विज्ञान केंद्रात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांतील आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिंपियाडसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी देशभरात दरवर्षी जानेवारी महिन्यात हजारभर केंद्रांमध्ये परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून आम्ही ३०० मुलांची निवड करतो, व मे महिन्यात या मुलांची अजून एक परीक्षा घेऊन त्यांपैकी पस्तीस विद्यार्थ्यांना एका शिबिरासाठी आमंत्रित करतो. या शिबिरात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र व खगोलभौतिकी हे विषय शिकवले जातात. ऑलिंपियाड स्पर्धांसाठी यांपैकी पाच विद्यार्थ्यांची निवड होते. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं, शिबिरासाठी समन्वयन करणं, शिकवणं, ऑलिंपियाडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेणं, ही सगळी माझी जबाबदारी असते.

आपल्याकडे शाळांमधून खगोलशास्त्र हा विषय शिकवला जात नाही. याचा एक फायदा असा की, विद्यार्थी आमच्याकडे येतात तेव्हा त्यांची पाटी अगदी कोरी असते. चुकीचं असं काही ते शिकलेले नसतात. या विद्यार्थ्यांना विषय योग्य प्रकारे समजावून सांगणं त्यामुळे खूप सोपं जातं. खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये गेली पाचसहा वर्षं भारतीय विद्यार्थी सातत्यानं चमकदार कामगिरी करत आहेत. अनेक पदकांची कमाई करून सांघिक विजेतेपदावरचा हक्क आपण कायम ठेवला आहे. यावर्षीही भारतीय संघ पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता.

मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, म्हणून वेळोवेळी मी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. शाळांमध्ये खगोलशास्त्र हा विषय शिकवला जावा यासाठी सध्या माझे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण करण्याच्या कामात मी सध्या गुंतलो आहे. आपल्याकडे अनेक हौशी मंडळींनी भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासाबद्दल लिहिलं आहे. या लिखाणात योग्य ते संदर्भ व अभ्यास या दोहोंचा अभाव असल्यानं आपल्या पूर्वजांबद्दल आपल्या काहीशा अवास्तव अशा कल्पना आहेत.
आपण फार प्रगत होतो, आपल्या पूर्वजांनी अणुबॉम्ब तयार केले होते, असे बरेच समज पसरले आहेत. आपले पूर्वज त्या काळाच्या मानाने निश्चितच प्रगत होते, त्यांनी खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता, पण या सगळ्या अभ्यासाचं योग्य पद्धतीनं दस्तऐवजीकरण होणं आवश्यक आहे. भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास वैज्ञानिक पद्धतीनं मांडला जायला हवा, आणि त्या दिशेने माझे प्रयत्न सुरू आहेत.

आज भारताला शास्त्रज्ञांची प्रचंड गरज आहे, आणि हे लक्षात घेता या केंद्राच्या कार्याचे महत्त्व वाढले आहे. देशाच्या शिक्षण आणि संशोधन क्षेत्रांतील अग्रणींच्या आशा या केंद्रावर आहेत. विज्ञानाचा अभ्यास करता करता जर अजून अनेक विद्यार्थ्यांना आपण शिकवण्यातून विज्ञानाकडे आकर्षित करु शकलो तर दुहेरी उद्देश साध्य होतो, याचा विचार करुन मी होमी भाभा विज्ञान केंद्राची निवड केली. मला हे खात्रीने सांगता येते की, मी पैसे मिळावे म्हणून काम करत नाही, तर मनाला आनंद मिळावा म्हणून काम करतो आणि ते काम करण्याचे मला पैसे मिळतात. कदाचित आयटीवाल्यांइतके ते जास्त नसतीलही! पण कामामध्ये मिळणारे समाधान आपण नोटांमध्ये मोजू शकतो का?